Satara: जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा वाजला बिगुल, संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी 1 नोव्हेंबरला मतदान
Satara संचालक मंडळाच्या उमेदवारांचे भवितव्य 2019 मतदार ठरवणार आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच जिल्ह्यातील सहकार आणि राजकीय क्षेत्रातील हालचालींना वेग आला आहे.

Satara: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बहुप्रतिक्षीत निवडणुकीचा बिगुल अखेर आज वाजला. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे राज्य सचिव अशोक गाडे यांनी बुधवारी बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार जिल्हा बँकेच्या 21 संचालकांच्या निवडीसाठी दि. 1 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.
संचालक मंडळाच्या उमेदवारांचे भवितव्य 2019 मतदार ठरवणार आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच जिल्ह्यातील सहकार आणि राजकीय क्षेत्रातील हालचालींना वेग आला आहे.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळातील 21 जागांसाठी विविध मतदारसंघांतून प्रतिनिधी निवडले जाणार आहेत. यामध्ये कृषी पतपुरवठा व विकास सेवा सोसायट्या, महिला, अनुसूचित जाती- जमाती, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती- भटक्या जमाती व विशेष मागासवर्गीय तसेच कृषी पणन, शेतीमाल प्रक्रिया, नागरी बँका व पतसंस्था, गृहनिर्माण, दूध उत्पादक, औद्योगिक, विणकर, मजूर व पाणीपुरवठा सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरदरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. दाखल अर्जांची यादी दररोज सायंकाळी चार वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. अर्जांची छाननी 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता होईल. वैध अर्जांची अंतिम यादी 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता जाहीर केली जाणार आहे.
उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याची मुदत 6 ते 21 ऑक्टोबरदरम्यान आहे. निवडणूक चिन्हांचे वाटप करून अंतिम उमेदवार यादी 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता प्रसिद्ध केली जाईल. दि. 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 3 नोव्हेंबर रोजी पूर्ण झाल्यानंतर निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मतमोजणीचे स्थळ नंतर जाहीर केले जाणार आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) संजयकुमार सुद्रिक यांची, तर जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून विभागीय सहनिबंधक (कोल्हापूर) डॉ. महेश कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महायुतीच्या समन्वयाची कसोटी
जिल्हा बँकेची निवडणूक केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित नसल्याने आता राजकीय पातळीवरील समीकरणांनाही महत्त्व प्राप्त झाले आहे. जिल्ह्यात महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट आणि शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट यांच्यातील स्थानिक समन्वयाची कसोटी या निवडणुकीत लागणार आहे. त्याचवेळी विविध मतदारसंघांतील स्थानिक गट, संस्थांचे पदाधिकारी आणि विद्यमान संचालकांची भूमिका उमेदवारी निश्चितीमध्ये महत्त्वाची ठरणार आहे.
विशेषतः कोणत्या मतदारसंघातून कोणाला संधी द्यायची, विद्यमान संचालकांना पुन्हा संधी मिळणार का, स्थानिक पातळीवरील गटांचे समीकरण कसे जुळणार आणि पक्षीय राजकारणापेक्षा संस्थात्मक संबंधांना किती महत्त्व दिले जाणार, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज दाखल होण्याच्या कालावधीत होणार्या गाठीभेटी आणि मतदारसंघनिहाय बैठका यामुळे चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जिल्ह्यात पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असतानाच जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरु होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या नियमित कामकाजाबरोबरच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित निर्णय आणि हालचालींवरही लक्ष राहणार आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर होणार्या या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय वातावरण पुढील काही आठवड्यांत अधिक तापण्याची चिन्हे आहेत.





