पुणे : शहरात सोमवारी पहाटेपासून झालेल्या मुसळधार पावसाने पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत केले. सोलापूर रस्ता, येरवडा, तसेच इतर सखल भाग जलमय झाले. वाहतूक ठप्प झाली, नागरिक त्रस्त झाले, मात्र महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभाग मात्र झोपेत असल्याचे चित्र दिसले. शहरातील रस्त्यांवर पाणी साचून वाहतूक कोंडी झाली असतानाही सकाळी कोणत्याही ठिकाणी पालिका कर्मचाऱ्यांची हालचाल दिसून आली नाही. “रस्ते झालेत पण पाणी वाहून जाण्यासाठी गटारेच नाहीत, थोडासा पाऊस आला तरी शहर बुडते,” असा संताप नागरिकांनी व्यक्त केला. दरम्यान, चौकाचौकांत वाहतूक पोलीस कोंडी सोडविण्यासाठी झटत होते, परंतु महापालिकेकडून कोणतीही तत्पर उपाययोजना झाली नाही. झाडे कोसळली, रस्ते बंद झाले, वाहने अडकली तरीही पालिका यंत्रणा बघ्याची भूमिका घेत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पावसाळा दरवर्षी येतोच; तरीही नालेसफाई, गटारव्यवस्था आणि पाणी उपशाची यंत्रणा व्यवस्थित का केली जात नाही, असा ज्वलंत सवाल पुणेकरांनी उपस्थित केला आहे.