Heavy Rainfall Alert | राज्यात जोरदार पाऊस: कोकण, पुणे, सातारा आणि घाट विभागासाठी ऑरेंज अलर्ट

प्रभात वृत्तसेवा
पुणे – राज्यात पुढील तीन दिवस बहुतांश जिल्ह्यांत मेघर्गजना आणि वादळी वाऱ्यासह जोरदार तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. कोकण-गोव्यातील रायगड आणि रत्नागिरी जिल्हा तर सातारा आणि पुणे जिल्ह्यातील घाट विभागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता असल्याने या जिल्ह्यातील घाट विभागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात मागील आठ दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि कोकण-गोव्यात दमदार हजेरी लावली. त्यामुळे पुढील तीन दिवस राज्यातील विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण-गोव्यात बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
त्यामुळे पुढील तीन दिवस घाट विभागासाठी तसेच अन्य जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दि. १४ आणि १५ सप्टेंबरला कोकणातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल. तर, दि. १५ सप्टेंबरला सातारा जिल्ह्यातील घाट विभागात मेघगर्जनेसह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल.
त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुढील दोन दिवस कोकणात रत्नागिरी, ठाणे, मुंबई या ठिकाणी मुसळधार पाऊस पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट दिला आहे. तर, अन्य जिल्ह्यांमध्येही हलका ते मध्यम पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.




