पुणे जिल्हा : चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे 4 ते 5 किमीपर्यंत वाहतूक कोंडी…

पुणे : मागच्या 24 तासांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात पावसाने थैमान घातले आहे. शिक्रापूर रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे खड्ड्यात रस्ता की रस्त्यावर खड्डा अशी काहीशी परिस्थिती या राज्य महामार्गावरती आहे. या महामार्गावरून प्रवास करताना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दिवसाला चार ते पाच छोटे-मोठे अपघात घडत आहेत.
गेले कित्येक दिवसांपासून पडलेल्या या खड्ड्यांमुळे अनेक प्रवाशांना आणि दुचाकी चालकांना मोठी दुखापतही झाली आहे तरीही हे खड्डे बुजविण्यासाठी कोणतीही प्रशासकीय यंत्रणा जागी होताना दिसत नाही.या खड्ड्यांमुळे फक्त अपघातात होत नाहीये तर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे.
शेलगाव ग्रामपंचायत च्या हद्दीतील चाकण शिक्रापूर रस्त्यावरील सह्याद्री हॉटेलच्या समोर गेल्या कित्येक महिन्यांपासून मोठ मोठाले खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे महामार्गावर चार ते पाच किलोमीटरच्या रांगा लागल्या असून वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली आहे.





