पिंपरी | मनाई आदेश धुडकावणाऱ्या पर्यटकांना दणका

लोणावळा, (वार्ताहर) – भुशी धरण येथे काही दिवसांपूर्वी घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर प्रशासनाने पर्यटकांसाठी सविस्तर नियमावली जाहीर केली. तसेच सुरक्षित पर्यटनासाठी पोलिस प्रशासनही जागोजागी लक्ष ठेवून आहे. लोणावळा शहरातील भुशी धरण मार्गावर असलेल्या सहारा पुलाच्या पुढे असणाऱ्या तीन धबधब्यांच्या वरील बाजूस डोंगरकड्यावर तसेच लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट, घुबड तलाव, भुशी धरण येथील निर्जन ठिकाणी किंवा धोकादायक धबधब्यावर, पाण्याच्या ठिकाणी जाण्यास प्रशासनाचे मनाई आदेश आहेत.
असे असतानाही मनाई आदेश धुडकावून पर्यटक धोकादायक रित्या डोंगर चढून जाऊन स्वतःचा जीव धोक्यात घालतात. अशा पद्धतीने धोकादायक पर्यटन करणाऱ्या ४८ पर्यटकांवर आतापर्यंत वनविभाग आणि लोणावळा शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.
भुशी धरणावर झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर तीन आठवड्यापूर्वी पुणे जिल्हाधिकारी यांनी स्वतः आदेश काढत धोकादायक पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी घातलेली आहे. यात सहारा पुलाच्या समोरच्या बाजूला असलेल्या तीन छोट्या धबधब्याच्या वरच्या बाजूला जाण्यासाठी पूर्णवेळ तसेच इतर काही पर्यटन स्थळांवर ठिकाणी जाण्यास सायंकाळी ६ नंतर पूर्णपणे प्रतिबंध घालण्यात आला आहे.
पोलिस, वनखाते फलक लावून, लाऊडस्पीकरवरून तशा सूचना पर्यटकांना देत असतात. मात्र तरीही या सुचनांकडे कानाडोळा करून अनेक अतिउत्साही पर्यटक नको ते धाडस करायला जातात. त्यामुळे आता या अशा नाठाळ पर्यटकांवर थेट कारवाई करण्याचे पाऊल पोलीस प्रशासन आणि वनखात्याने उचलले असून भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम २२३ प्रमाणे या पर्यटकांवर कारवाई केली जात आहे.
मागील आठवड्यात १७ पर्यटकांवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी आयपीएस सत्यसाई कार्तिक मार्गदर्शनाखाली तसेच लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या नेतृत्वाखाली वरील प्रतिबंधित क्षेत्रात आढळून आलेल्या पर्यटकांवर या आठवड्याच्या शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीनही दिवस सलग कारवाया करण्यात आल्या. शुक्रवारी २४, शनिवारी ५ तर रविवारी २ अशा एकूण ३१ जणांवर आणि आतापर्यंत ४८ पर्यटकांवर कारवाई करण्यात आली आहे.





