Pimpri : भुशी धरणात दोनजण बुडाले

लोणावळा : येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या भुशी धरणात रविवारी दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला. वर्षापर्यटनासाठी लोणावळ्यात आलेले हे पर्यटक भुशी धरणाच्या प्रतिबंधित क्षेत्रात गेले व तिथे बुडाले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मोहम्मद जमाल आणि साहिल शेख अशी धरणात बुडून मृत्यू पावलेल्या तरूणांची नावे आहेत. दोघेही उत्तर प्रदेशातील मिरजापूर येथील रहिवासी असून सध्या थेरगाव, पुणे येथे कामाला होते. आठ मित्रांसोबत ते लोणावळा येथे आले होते. दुपारी दोनच्या सुमारास भुशी धरणाच्या बॅकवॉटर भागात असलेल्या वॉटरफॉलजवळ ते गेले आणि बॅकवॉटर भागात बुडाले.
स्थानिकांनी तत्काळ ही माहिती लोणावळा पोलीस आणि शिवदुर्ग मित्र यांना दिली. लोणावळा पोलीस, शिवदुर्ग मित्रचे आपदा मित्र आणि स्थानिक युवक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
अर्धा तास शोध कार्य केल्यानंतर दोन्ही युवकांचे शव पाण्याबाहेर काढण्यात आले. याबाबत लोणावळा शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून महादेव म्हेत्रे हे अधिक तपास करीत आहे. दरम्यान, या दुर्घटनेमुळे लोणावळा, भुशी धरण परिसरात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.





