Pimpri : पावसाने जनजीवन विस्कळीत; भुशी धरण ओव्हरफ्लो, पवना धरणातून विसर्ग वाढविला

मावळ/माथेरान : सध्या राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मावळ तालुका आणि माथेरान परिसरामध्ये पावसाचा जोर वाढला असून या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पवना धरण पूर्ण भरले असून धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. मावळ तालुक्यात वाहणाऱ्या सर्व नद्या दुथडी भरुन वाहत असल्याने कोथुर्णे पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे काही गावांचा संपर्क देखील तुटला आहे.
मुसळधार पावसामुळे भुशी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. धरणाच्या पायऱ्यांवरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी संभाव्य अपघात टाळण्यासाठी पोलिसांनी पर्यटकांना धरण परिसरात प्रवेशबंदी केली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने येत्या २४ तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आवश्यकता असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अन्यथा घरीच थांबावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.
लोणावळ्यात शाळांना दोन दिवसांची सुट्टी
लोणावळा – धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे धरणाबाहेरील पूल पाण्याखाली गेला आहे. परिणामी लायन्स पॉइंट, टायगर पॉइंट आणि सहारा सिटीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. शहरातील काही भागांत पाणी साचल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवनही विस्कळीत झाले आहे. विशेषतः तुंगारली भागातील बद्री विशाल सोसायटीत घरात पाणी शिरल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. हवामान विभागाने पुढील दोन दिवस घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना बुधवारी (दि.२०) आणि गुरुवारी (दि.२१) स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
माथेरानमध्ये भिंत कोसळली
माथेरान – निसर्गरम्य माथेरानमध्ये पावसाचा संततधार सुरू असून परिसर धबधब्यांनी गजबजला आहे. हवामान खात्याने २५ ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिल्याने खबरदारी म्हणून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सकाळपासून दुपारपर्यंत तब्बल १०२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, पावसाच्या तडाख्यात प्राथमिक शाळेजवळ आणि काळोखी परिसरात झाडांच्या फांद्या कोसळल्या, बाजारपेठेतील रस्त्याची भिंत कोसळली तसेच नेरळ माथेरान घाटात मोठे खड्डे पडले आहेत. वॉटर पाइपजवळील संरक्षण जाळीजवळ दुपारी भला मोठा दगड कोसळला असून सुदैवाने जीवितहानी टळली.
कोथुर्णे पूल पाण्याखाली
पवनानगर – पवना धरणातून एकूण ७१६० क्युसेक्स विसर्ग करण्यात आला आहे. पाण्याचा विसर्ग वाढल्याने कोथुर्णे, वारू, मळवंडी ठुले, वाघजईवाडी या गावांचा संपर्क तुटला असून नागरिकांना शिवली किंवा ब्राम्हणोली पूलमार्गे पवनानगरला यावे लागत आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर दुग्धव्यवसाय व नोकरदार वर्ग असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दुध संकलनासाठी दररोज पवनानगरला येणाऱ्यांनाही पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. सततच्या पावसामुळे पवनानगर चौकातील वर्दळही लक्षणीयरीत्या कमी झाली असून प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
नदीकाठच्या भागात पूरस्थितीची शक्यता
कार्ला – गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आपला जोर कायम ठेवला आहे. सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. सदापुर, पाथरगाव, कामशेत या भागांत नदीचे पाणी धोक्याच्या पातळीवर पोहोचून नदीपात्राबाहेर वाहत आहे. जर अशीच पावसाची स्थिती कायम राहिली, तर नदीकाठच्या घरांमध्ये तसेच मळवली परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.





