पुणे जिल्हा | पर्यटण वारी : बाराही महिने पर्यटकांना आकर्षित करणारे पवनमावळ

पवनानगर, {निलेश ठाकर} – गेल्या काही वर्षांपासून पवन मावळ भागातील पर्यटन स्थळांना पर्यटकांची चांगलीच पसंती मिळत आहे. जवळपास लोणावळा – खंडाळा सारखी प्रसिद्ध पर्यटन स्थळे असतानाही पर्यटकांची पाऊले पवन मावळ भागात वळताना दिसत आहे.
आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसाने पवन मावळातील डोंगर दऱ्यांवरील धबधबे प्रवाहित झाले असून हिरवा शालू नेसलेले डोंगर पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी येथे होत आहे.
पवन मावळ परिसरात पिंपरी-चिंचवड शहरासह मावळवासियांसाठी वरदान असलेले पवना धरण, किल्ले लोहगड, विसापुर, तुंग, तिकोणा यांसारखे ऐतिहासिक डोंगरी किल्ले, प्रतिपंढरपुर सारखी धार्मिक स्थळे, बेडसे लेणी, आजिवली वनराई, प्राचीन वाघेश्वर शिवमंदिर अशी अनेक पर्यटनस्थळे आहेत.
जोडीला परिसरात होणारी भात शेती हाही कृषी पर्यटनाचा भाग पर्यटकांना आकर्षित करतो. एकेकाळी रस्त्यांची दुर्दशा असणारा हा विभाग आता रस्ते, वीज, पाणी सारख्या पायाभूत सुविधायुक्त झाल्याने पर्यटकांची पाऊले इकडे वळू लागली आहेत.
सध्या जोरदार पावसामुळे पवना धरण परिसरातील डोंगरांवरून फेसाळलेले धबधबे वाहत आहेत. ते पाहण्यासाठी आणि वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी राज्यभरातून पर्यटक येथे येत आहेत. सकाळी दहा वाजलेपासून येथे गर्दी होताना दिसते.
दिवसभर पाण्यात भिजणे, सेल्फी-फोटो काढणे, परिसरातील हॉटेल्स खाणावळीत खमंग जेवणाचा आस्वाद घेणे आणि अनंत आठवणी घेऊन घरी परतणे, असा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने सहकुटुंब पर्यटक येथे येत असतात.
आंबेगाव परिसरातील धबधबे पसंतीचे –
पवना धरण परिसरात आंबेगाव जवळील धबधबे हे पर्यटकांच्या सोईचे आणि पसंतीचे आहेत. त्यामुळे येथे नेहमीच गर्दी होत असते. येथूनच पुढे लोहगड, विसापूर, प्रतिपंढरपूर कडे जाण्यासाठी रस्ता असल्याने सर्वाधिक पर्यटक या भागात जमा होतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच पर्यटनाकरिता हा भाग सुरक्षित आहे.
पर्यटकांनी काळजी घ्यावी –
१. धरणाच्या पाण्यात उतरू नये
२. मद्यपान करून वाहन चालवू नये
३. धोकादायक ठिकाणी सेल्फीचा मोह टाळावा
४. धबधब्यावर बसून मद्यपान करू नये
५. रस्त्यावर वाहने पार्क करू नये
६. आरडाओरडा, हॉर्न वाजवून हुल्लडबाजी करू नये





