पिंपरी | मुळशीत पर्यटन बंदी फक्त कागदावरच

हिंजवडी, {रमेश ससार} – जिल्ह्यात मागील आठवडा भरापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्हा प्रशासनाने मुळशी, मावळ तालुक्यांतील पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी घातली आहे.
मात्र मुळशी, टेमघर व कासरसाई धरण परिसरात पर्यटक आणि पर्यटनस्थळां शेजारील काही हॉटेल्स व्यवसायिकांनी जिल्हा प्रशासनाच्या या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. काही ठिकाणी काही व्यावसायिकांनीच आपल्या नेहमीच्या पर्यटकांनी छुपे रस्ते दाखवून आपल्या हाॅटेल्स व दुकानाचे मागील दरवाजे उघडून दिल्याचे आरोप होत आहेत.
पावसाचे प्रमाण कमी होताच शनिवार रविवारी ( दि. २८ ) शासनाच्या या आदेशाकडे दुर्लक्ष करत कासरसाई, मुळशी, टेमघर या पर्यटनस्थळी शेकडो पर्यटकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार मावळ-मुळशीचे उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी काढलेल्या पर्यटन बंदीच्या आदेशाला पर्यटकांसह तेथील व्यवसायिकांनी पध्दतशीरपणे केराची टोपली दाखवली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
मुळशी धरण परिसरात आठवडाभर झालेला अति मुसळधार पाऊस, धबधब्यांना आलेला पूर, आदरवाडी, लव्हासा आदी ठिकाणी झालेले भुस्खलन , लवासा भागांतील रस्ते खचणे, जमिनींना भेगा पडणे असे प्रकार घडल्याने जिल्हा प्रशासनाने पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पर्यटन बंदी जाहीर केली आहे.
अति पावसामुळे वेगाने वाहत असलेले धबधबे, भूस्खलानाची भीती असे अनेक धोके असतानाही काही अति उत्साही पर्यटक नियमांना डावलून आपला जीव धोक्यात घालत असल्याचे दिसून आले. पर्यटकांच्या अति उत्साहामुळे प्रशासनावर अतिरिक्त ताण येत आहे. तर प्रतिकूल परिािस्थतीत आपला जीव धोक्यात त्यांना वाचविण्याची वेळ स्थानिक तरुणांवर येत आहे.
मागील दरवाजे खुले
दरम्यान प्रसिद्ध ताम्हिणी घाटातील पळसे धबधब्याचे बाहेरचे बाजुस पर्यटन स्थळ बंद असल्याचा फलक लावला होता. मात्र प्रशासनाचा डोळा चुकवून काही पर्यटक पळसे धबधब्याचे पाण्यात उतरल्याचे दिसून आले.
याबाबत अधिक चौकशी केली असता काही नवख्या पर्यटकांना नियम दाखवून पर्यटनस्थळापासून परत पाठवण्यात येत होते. मात्र काही व्यावसायिकांनी ‘त्यांच्या’ ‘ खास निवडक ग्राहकांसाठी’ पर्यटनस्थळापर्यंत जाण्याच्या सोयीसाठी मागच्या दरवाजाचा मार्ग स्वीकारला होता.
व्यावसायिकांची दुकाने बाहेरुन बंद तर खास ग्राहकांसाठी वाढीव दराने मागील दाराने पर्यटन खुले असा संदेश पर्यटकांमध्ये जात होता. पर्यटनाच्या नावाखाली लूटमार करण्याचे असे प्रकार नेहमीच होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित व्यावसायिक ‘ ते पर्यटक आमच्याकडे आलेले माहीत नाही, नजर चुकवून गेले असतील, कसे गेले ते माहीत नाही. हे आत कसे आले. आमचा संबंध नाही.’ अशी उडवाउडवीची कारण देत होते.
‘पर्यटन बंदीचे उल्लंघन करण्याचे कोणतेही प्रकार खपवुन घेतले जाणार नाहीत. असे प्रकार निदर्शनास
आल्यावर नागरिकांनी तात्काळ त्याची माहिती पोलिसांना व प्रशासनाला द्यावी. मी स्वतः पोलिसांना कारवाई करण्याबाबतचे पत्र देखील दिले आहे.पोलीस सर्व संबंधितांवर योग्य ती कारवाई करतील. सुरेंद्र नवले ( उपविभागीय अधिकारी मुळशी मावळ )





