Hinjewadi Police : हिंजवडी पोलिसांची मोठी कारवाई; ९ दुचाकींसह सराईत चोरटे गजाआड, १० गुन्हे उघड
Hinjewadi Police : पोलीस गस्त घालत असताना संशयास्पदरीत्या आढळला तरुण; पोलिसी खाक्या दाखवताच १० गुन्ह्यांची दिली कबुली.

Hinjewadi Police – चैनीसाठी दुचाकी चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून ४ लाख २५ हजार रुपये किमतीच्या ९ दुचाकी, एक लॅपटॉप आणि मोबाइल फोन जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे हिंजवडी, वाकड आणि चिंचवड परिसरातील १० वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
आदित्य संतोषकुमार पटेल (वय २३, रा. बोडकेवाडी, माण, मूळ छत्तीसगड) आणि ओम किशोर चिस्तळकर (वय १९, रा. बोडकेवाडी, माण, मूळ वाशिम) अशी अटक आरोपींची नावे आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनचोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस पथक गस्त घालत होते.
२० एप्रिल रोजी बोडकेवाडी फाट्याजवळ एक तरुण विनानंबर प्लेटच्या दुचाकीसह संशयास्पदरीत्या उभा असल्याचे आढळले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला. तपासात आरोपींनी केवळ मौजमजेसाठी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ८, वाकडमध्ये १ आणि चिंचवडमध्ये १ असे एकूण १० गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले.
पोलीसांनी त्यांच्या ताब्यातून चोरीच्या ९ दुचाकींसह इतर साहित्य जप्त केले. ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, निरीक्षक (गुन्हे) ऋषिकेश घाडगे, सहायक निरीक्षक सोमनाथ पांचाळ, दुर्गानाथ साळी, नरेश बलसाने व त्यांच्या पथकाने केली.





