Pune : स्लॉट बुक करूनच पर्यटनाचा घ्या आनंद!

पुणे – पावसाळ्यात पर्यटनस्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता असते. एकाच वेळी मोठ्या संख्येने पर्यटक आल्यावर तेथील यंत्रणेवरही ताण येऊन वाहतूक कोंडी होते. त्यामुळे अशावेळी पर्यटनस्थळे बंद ठेवावी लागतात. त्यामुळे स्थानिक लोकांचा रोजगार बुडतो.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पुढाकार घेतला असून, पर्यटन स्थळांवर गर्दीवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा उभारण्याची योजना जिल्हा प्रशासनाने आखली आहे. त्यासाठी ऍप तयार करण्यात येणार असून, त्यावर पर्यटकांना आधी वेळ (स्लॉट बुक) ठरवावी लागणार आहे.
जिल्ह्यातील मुळशी, मावळ, भोर, राजगड, खेड, जुन्नर आणि आंबेगाव या तालुक्यांतील विविध पर्यटनस्थळी पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. पर्यटक धबधबे, डोंगरभाग आदी ठिकाणांना भेटी देत असतात. शनिवारी व रविवारी या सुट्टीच्या दिवशी तर एकाच ठिकाणी हजारो पर्यटक जमतात.
मुळशी येथील अंधारबन येथे मोठ्या संख्येने पर्यटक आल्याने हे स्थळ बंद ठेवण्याचे आदेश वन विभागाने जारी केले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पर्यटनस्थळांवर सोयीसुविधा वाढविण्यांबरोबरच शुल्क आकारणे अशा विविध उपाययोजना करण्यासाठी पर्यटन विकास आराखडा तयार केला असून, पर्यटकांच्या सोयीसाठी ॲप विकसित करण्यात येणार आहे.
याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, की वन विभाग आणि स्थानिक रहिवाशांच्या मदतीने ही यंत्रणा उभारणे शक्य आहे. गर्दी मोठ्या प्रमाणावर झाल्यास एका वेळेस किती पर्यटकांना सोडायचे, याचे नियोजन या यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात येईल. त्यासाठी पर्यटनस्थळांच्या ठिकाणी गेट उभारण्यासह आवश्यक त्या सुविधा उभारण्यासाठी नियोजन सुरू आहे. जेणेकरून पुढील पावसाळ्यापर्यंत ही सर्व यंत्रणा उभी राहील.
‘जिल्ह्यातील २५ पर्यटन स्थळे निश्चित करण्यात आली आहे. लवकरच त्या ठिकाणी ही सिस्टिम लागू करण्यात येणार असून, त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.’ -जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी





