Shweta Tiwari : आता पंजाबचे शिक्षणमंत्री राजीनामा कधी देणार? प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पोस्टने खळबळ
Shweta Tiwari : या सगळ्या घडामोडी घडत असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीने सोशल मीडियावरून केलेल्या एका पोस्टमुळे खळबळ उडाली आहे.

Shweta Tiwari : कॅाक्रोच जनता पार्टीने पुकारलेल्या लढ्याला अखेर मोठं यश आलं आहे. काल एक मोठी घडामोड घडली. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी पोस्ट करत राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. यानंतर आता मोदी सरकारमधील मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षणमंत्री पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
आगामी काळात शिक्षणमंत्री पदी कोणत्या नेत्याला संधी मिळणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. या सगळ्या घडामोडी घडत असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीने सोशल मीडियावरून केलेल्या एका पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमधून प्रतिक्रिया समोर येत आहेत. अभिनेत्री श्वेता तिवारीने इन्स्टाग्रावर पोस्ट शेअर करत दिल्लीत धरणे आंदोलन करणारा हा पक्ष पंजाबच्या शिक्षणमंत्र्यांविरुद्ध आंदोलन कधी सुरू करणार असे म्हणत थेट पंजाबच्या शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा कधी? असा सवाल केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Shweta Tiwari’s Instagram post
अनेक आठवड्यांपासून सुरू असलेले विद्यार्थी आंदोलन आणि पेपरफुटी वादाच्या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे जंतर मंतरवरील आंदोलन संपले असले तरी, राजकीय वातावरण आणखी तापले आहे.
श्वेता तिवारी इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये काय म्हणाली?
अभिनेत्री श्वेता तिवारीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर करत CJP च्या पुढील हालचालींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तिने ‘कॅाक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आणि लिहिले, “आता पंजाबचे शिक्षणमंत्री राजीनामा कधी देणार? आणि कॅाक्रोच जनता पार्टी, तुम्ही लोक तिथे आंदोलन कधी करणार आहात?” श्वेताच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.
अभिनेत्रीने तिच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अभिजीत दीपके यांचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या व्हिडिओत “या आंदोलनाने देशाला दाखवून दिले आहे की, जर कोणताही कॅबिनेट मंत्री आपले कर्तव्य योग्यरित्या पार पाडण्यात अपयशी ठरला, तर जनता आणि विद्यार्थी एकत्र येऊन त्यांच्या राजीनाम्याची मागणी करू शकतात आणि त्यांना पदावरून हटवूही शकतात.” असे ते म्हणताना दिसत आहेत.
विद्यार्थी आंदोलनापुढे सरकार झुकले
गेल्या महिनाभरापासून नीट पेपरफुटी प्रकरणी देशभरातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. विशेषतः स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमितता आणि नीट-यूजी पेपरफुटीवरून तरुणांचा संतापाचा उद्रेक समोर आला. नवी दिल्लीच्या जंतर मंतरसह अनेक प्रमुख शहरांमध्ये सातत्याने आंदोलने झाले. विद्यार्थी संपूर्ण उत्तरदायित्व आणि परीक्षा पद्धतीत मोठ्या सुधारणांची मागणी करत होते. अखेरीस, शनिवारी विद्यार्थ्यांची सर्वात मोठी मागणी मान्य झाली आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा देणे भाग पडले.





