Top 10 News : शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ते भारतात कोरोनाची पुन्हा एन्ट्री…; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या
Top 10 News : Top 10 News : शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ते भारतात कोरोनाची पुन्हा एन्ट्री...; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या

Top 10 News : 1) 50 हजारांऐवजी 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार, शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा केलीय. महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत 50 हजार रुपयांपर्यंत मिळणारा लाभ आता थेट 2 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. तसेच प्रोत्साहनपर अनुदानासाठी 2026-27 चे पीक कर्ज वेळेत फेडण्याची अटही रद्द करण्यात आलीय. या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. फडणवीस म्हणाले, कर्जमाफी ही परिस्थितीची गरज असून शेतकऱ्यांना सावकारांकडे जावे लागू नये हा यामागील उद्देश आहे. यापूर्वी अटींमुळे वंचित राहणारे शेतकरी आता पात्र ठरणार आहेत. 2026 पूर्वीच्या तीन वर्षांपैकी किमान दोन वर्षे कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार असून, हा निर्णय यापूर्वी कधीही घेण्यात आला नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केलंय. (Top 10 News)
2) ‘आमदाराची पत्नी संपादकांना धमक्या देते’; जयंत पाटलांचा विधानसभेत खळबळजनक आरोप
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत बोलताना गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली. “एका आमदाराची पत्नी संपादकांना फोन करून धमक्या देते. मुख्यमंत्री यांनी चौकशी करून ती कोणत्या आमदाराची पत्नी आहे, हे पुढील अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जाहीर करावे,” अशी मागणी त्यांनी केली. दूध भेसळ, कायदा-सुव्यवस्था आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. राज्यातील गुन्हेगारी वाढल्याचा आरोप करत “महाराष्ट्र बिहार होत आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ठाणे आणि साताऱ्यातील घटनांचा उल्लेख करत पोलिसांवरील जनतेचा विश्वास कमी झाल्याचेही ते म्हणाले. जयंत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर त्यांचा रोख नेमका कोणाकडे होता, याबाबत राजकीय चर्चांना उधाण आलेय. (Top 10 News)
3) शरद पवारांच्या भेटीवरून एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधान परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत शिवसेना ठाकरे गटाला लक्ष्य केले. शरद पवार यांनी रुग्णालयात त्यांची घेतलेली भेट आणि त्यानंतर व्यक्त झालेल्या प्रतिक्रियांवर बोलताना शिंदे म्हणाले, “पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा सन्मान करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे.” देवेंद्र फडणवीस आणि आपल्या नात्यात फूट पाडण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “किती मिरच्या, किती जळजळ, किती मळमळ… विरोधकांना जलोशील नव्हे, जमालगोटाच पाहिजे,” असा टोला त्यांनी लगावला. मी रुग्णालयात असतानाही काम सुरूच होते, आम्ही खोटी सहानुभूती दाखवणारे नाही, असे सांगत शिंदे यांनी सरकारवरील टीकेलाही जोरदार प्रत्युत्तर दिले. (Top 10 News)
4) चंद्रपुरात भीषण अपघात, शेतजमुरांचे वाहन पलटी; 4 ठार, कुटुंबीयांचा आक्रोश
चंद्रपूर जिल्ह्यातील शेतमजुरांवर तेलंगणात भीषण दुर्घटना ओढवलीय. भात लावणीच्या हंगामी कामासाठी गेलेल्या सिंदेवाही तालुक्यातील पवना चक येथील मजुरांचे वाहन रामगुंडम परिसरात पलटी झाल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 27 जण गंभीर जखमी झालेत. शेतातील काम आटोपून निवासस्थानी परतत असताना हा भीषण अपघात घडला. मृतांमध्ये अतुल सोनले, अर्चना सोनले, प्रभा मोहर्ले आणि रंजना शेंडे यांचा समावेश आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तातडीने बचावकार्य राबवत जखमींना रामगुंडम येथील रुग्णालयात दाखल केले. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे चंद्रपूर जिल्ह्यात शोककळा पसरली असून मृतदेह गावी आणण्यासाठी आणि जखमींना मदत पोहोचवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. (Top 10 News)
5) मी पोलिसांवर विश्वास ठेवला, पण मलाच दोष दिला; करूर दुर्घटनेवर विजय यांचं मोठं विधान
तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी करूर येथील चेंगराचेंगरीच्या घटनेबाबत प्रथमच सविस्तर प्रतिक्रिया देत तत्कालीन सरकार आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. सप्टेंबर 2025 मध्ये त्यांच्या रॅलीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 41 जणांचा मृत्यू झाला होता. करूर दौऱ्यात बोलताना विजय म्हणाले, “मी गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांवर विश्वास ठेवला होता, तरीही या घटनेसाठी मलाच जबाबदार ठरवण्यात आले.” परिस्थिती बिघडत असल्याची पूर्वकल्पना दिली असती तर दुर्घटना टळली असती, असा दावा त्यांनी केलाय. या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या स्मरणार्थ स्मारक उभारण्याची घोषणाही त्यांनी केलीय. मुख्यमंत्री विजय यांच्या या वक्तव्यानंतर करूर दुर्घटनेची चर्चा पुन्हा एकदा राजकीय स्तरावर सुरू झालीय. (Top 10 News)
6) भारतात कोरोनाची पुन्हा एन्ट्री! 46 वर्षीय रुग्णाचा मृत्यू
देशात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबाबत पुन्हा चिंता वाढवणारी घटना आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यात समोर आलीय. मासापेटा येथील 46 वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. श्वास घेण्यास त्रास, तीव्र खोकला आणि न्यूमोनियाची लक्षणे असलेल्या रुग्णावर चार दिवस उच्च डोस अँटीबायोटिक्सद्वारे उपचार करण्यात आले, मात्र प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यानंतर सीटी स्कॅन आणि तपासणीत कोविड-19 संसर्गाची पुष्टी झाली. अधिकाऱ्यांनी रुग्णाची दोन्ही फुफ्फुसे गंभीररीत्या बाधित झाल्याचे सांगितले. मृत्यूनंतर परिसरात निर्जंतुकीकरण, संपर्क शोध आणि इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने सुरू करण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि लक्षणे आढळल्यास त्वरित तपासणी करून वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन केलेय. (Top 10 News)
7) रशियाचा भारताला मोठा झटका! सवलतीचं तेल बंद; आता प्रीमियम दराने पुरवठा
रशियाने भारताला कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबाबत मोठा धक्का दिल्याची माहिती समोर आलीय. अमेरिकेच्या निर्बंधांकडे दुर्लक्ष करून भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली. मात्र इराण-अमेरिका संघर्षानंतर रशियाने भारताला सवलतीच्या दराऐवजी प्रीमियम दराने कच्चे तेल विकण्यास सुरुवात केल्याचे समोर आलेय. अहवालानुसार, 2026 मध्ये भारताच्या एकूण तेल आयातीपैकी सुमारे 40 टक्के तेल रशियाकडून आले असून, त्याच्या आयातमूल्यात तब्बल 83 टक्क्यांची वाढ झालीय. दुसरीकडे अमेरिका आणि व्हेनेझुएलाकडून आयात केलेले तेल तुलनेने स्वस्त ठरल्याचेही स्पष्ट झालेय. दरम्यान, रशियाने पाकिस्तानला कमी दरात तेल पुरवण्याची तयारी दर्शवल्याची माहिती समोर आल्याने या घडामोडींना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. (Top 10 News)
8) Samsung Galaxy S26 Ultra वर 21 हजारांची मोठी सूट! Flipkart GOAT सेलमध्ये प्रीमियम फोन स्वस्तात
Flipkart GOAT सेल 2026 मध्ये Samsung Galaxy S26 Ultra वर मोठी ऑफर जाहीर करण्यात आलीय. फेब्रुवारीमध्ये 1,39,999 रुपयांना लॉन्च झालेला हा फ्लॅगशिप स्मार्टफोन आता तब्बल 21 हजार रुपयांच्या सवलतीनंतर 1,18,999 रुपयांना उपलब्ध आहे. ब्लॅक, व्हाईट आणि कोबाल्ट व्हायोलेट रंगांवर ही ऑफर लागू असून, बँक ऑफर्समुळे किंमत आणखी कमी होऊ शकते. फोनमध्ये 6.9 इंचाचा Dynamic AMOLED 2X डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, Snapdragon 8 Elite Gen 3 प्रोसेसर आणि 200MP मुख्य कॅमेऱ्यासह क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच 5000mAh बॅटरी, 60W फास्ट चार्जिंग आणि S Pen स्टायलसचा सपोर्टही मिळतो. प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही ऑफर आकर्षक मानली जातेय. (Top 10 News)
9) राजपाल यादवच्या अडचणी वाढल्या! चेक बाऊन्स प्रकरणी पुन्हा तुरुंगवास
बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव यांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने चेक बाऊन्स प्रकरणात त्यांच्यावरील शिक्षा कायम ठेवत तीन महिन्यांच्या तुरुंगवासाचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने अभिनेत्याच्या वर्तनावरही ताशेरे ओढत दंडाची शिक्षा सुनावलीय. हे प्रकरण 2010 मधील ‘आता पता लपता’ चित्रपटासाठी घेतलेल्या 5 कोटी रुपयांच्या कर्जाशी संबंधित आहे. चित्रपट अपयशी ठरल्यानंतर कर्जाची परतफेड न झाल्याने वाद न्यायालयात पोहोचला. 2018 मध्ये दंडाधिकारी न्यायालयाने राजपाल यादव आणि त्यांच्या पत्नीला दोषी ठरवत शिक्षा सुनावली होती, जी 2019 मध्ये सत्र न्यायालयानेही कायम ठेवली. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. विविध प्रकरणांमध्ये त्यांच्यावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज थकीत असल्याची माहिती समोर आली आहे. (Top 10 News)
10) सलग पराभवांनंतर बीसीसीआय ॲक्शन मोडमध्ये; प्रशिक्षक अन् खेळाडूंचे मोजमाप होणार!
कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध सलग दोन टी-२० मालिका गमावाव्या लागल्या आहेत. ६ पैकी ५ सामने हरल्यामुळे भारताचे जागतिक क्रमवारीतील ‘नंबर-१’ चे स्थानही धोक्यात आले आहे. या लाजिरवाण्या कामगिरीनंतर बीसीसीआय कडक पावले उचलण्याच्या तयारीत आहे. बीसीसीआय सूत्रांनुसार, बोर्ड लवकरच खेळाडूंसह मुख्य प्रशिक्षक आणि कोचिंग स्टाफच्या कामगिरीचे कडक पुनरावलोकन करणार आहे. सूर्यकुमार यादवला हटवून श्रेयस अय्यरकडे कप्तानी सोपवण्याचा निवडकर्त्यांचा निर्णय आता पूर्णपणे अंगलट आल्याचे दिसत आहे. (Top 10 News)





