Rohit Sharma Record : रोहित शर्माने रचला इतिहास! पाकिस्तानच्या इंजमाम-उल-हकचा मोडला १७ वर्षांचा रेकॉर्ड
Rohit Sharma Record : रोहित शर्माने वनडे क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम-उल-हक याला मागे टाकले आहे.

Rohit Sharma Breaks Inzamam Ul Haq Record Most Runs ODI Cricket List IND vs ENG 2nd ODI : भारत आणि इंग्लंड यांच्यात कार्डिफ येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने इतिहास रचला आहे. ‘हिटमॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहितने या सामन्यात अवघ्या ९ धावा करताच रोहितने वनडे क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम-उल-हक याला मागे टाकले आहे. यासह रोहित आता जगात सर्वाधिक वनडे धावा करणाऱ्या फलंदाजांच्या एलिट यादीत सातव्या स्थानावर पोहोचला आहे.
इंजमाम-उल-हकचा १७ वर्षांचा मोडला रेकॉर्ड
पाकिस्तानच्या इंजमाम-उल-हकने ३७८ वनडे सामन्यांमध्ये ३९.५२ च्या सरासरीने ११,७३९ धावा केल्या होत्या, ज्यात १० शतके आणि ८३ अर्धशतकांचा समावेश होता. त्याने १९९१ ते २००७ या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवले. कार्डिफ वनडेमध्ये रोहितने इंजमामला मागे टाकत आपल्या खात्यात ११,७४० हून अधिक धावा जमा केल्या आहेत. रोहितचा हा २८७ वा वनडे सामना असून, त्याच्या नावावर ३३ शतके आणि ६२ अर्धशतकांची नोंद आहे. २००७ मध्ये पदार्पण केलेला रोहित आता भारतासाठी केवळ एकदिवसीय फॉरमॅट खेळतो.
सचिन तेंडुलकर अव्वल, तर विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर –
Rohit Sharma gets out by playing 10 dot balls on trott, a very poor knock came to end.
If Rohit Sharma is really selfless then he would let Yashasvi Jaiswal play in ODIs who has 2 100s in last 3 games. Its time to hang your boots Rohit, you can’t play ODI WC at age of 41 in… pic.twitter.com/B9ExIBrAky
— Rajiv (@Rajiv1841) July 16, 2026
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने ४६३ सामन्यांत १८,४२६ धावा केल्या आहेत. या यादीत दुसऱ्या स्थानावर भारताचाच विराट कोहली असून, त्याने ३१२ सामन्यांत १४,८०२ धावा केल्या आहेत. विराट हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५० हून अधिक शतके ठोकणारा जगातील एकमेव फलंदाज आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा कुमार संगकारा (१४,२३४ धावा) आणि चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग (१३,७०४ धावा) आहे.
सामन्यात भारताची सावध सुरुवात –
दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडने नाणेफेक (टॉस) जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. रोहित शर्मा आणि कर्णधार शुबमन गिल यांनी भारताला ४४ धावांची सावध सलामी दिली. गिल ३० चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीने ३१ धावा करून बाद झाला, तर रोहित शर्मा ४७ चेंडूत २६ धावा करुन बाद झाला.





