India Enter Final : शफाली वर्माच्या शतकाच्या जोरावर भारताने बांगलादेशचा उडवला धुव्वा! आशियाई स्पर्धेत रौप्यपदक केले पक्के
India Enter Final : आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताने बांगलादेशला पराभूत केले. या विजयासह भारतीय महिला संघ आता अंतिम फेरीत पोहोचला आहे. सुवर्णपदकासाठी त्यांचा सामना श्रीलंकेशी होईल.

Asian Games 2026 Shafali Verma Historic Century India Beat Bangladesh Enter Final : जपानमधील नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने अंतिम फेरीत धडक मारत देशाचे आणखी एक पदक निश्चित केले आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने बांगलादेशचा ११४ धावांच्या मोठ्या फरकाने फडशा पाडला. या विजयासह भारताने किमान रौप्यपदक पक्के केले असून आता सुवर्णपदकासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ बाद १९५ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरात बांगलादेशचा डाव अवघ्या १५.४ षटकांत ८१ धावांवर गारद झाला.
शफाली वर्माचा ऐतिहासिक धमाका; ४९ चेंडूंत ठोकले वादळी शतक!
सलामीवीर शफाली वर्माने (Shafali Verma) मैदानावर चौकार-षटकारांची आतषबाजी करत अवघ्या ४९ चेंडूंत नाबाद १०० धावांची ऐतिहासिक खेळी साकारली. यात ३ चौकार आणि तब्बल ९ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधील हे तिचे पहिलेच शतक असून, आशियाई स्पर्धेच्या इतिहासात शतक झळकावणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे. याशिवाय स्मृती मानधनाने ३७ (१९ चेंडू) आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने ४० धावांचे मोलाचे योगदान दिले.
नंदनी आणि दीप्तीची फिरकी; बांगलादेशचा अवघ्या ८१ धावांत खुर्दा!
India storm into the final of the #AsianGames2026 with a comprehensive win over Bangladesh, powered by Shafali’s explosive century and a commanding all round bowling display 🇮🇳🔥#INDWvBANW #ACC pic.twitter.com/cLzjZbpfYi
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) September 20, 2026
प्रत्युत्तरात १९६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात अत्यंत दयनीय झाली. सलामीवीर जुएरिया फिरदौस पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यानंतर ठरावीक अंतराने विकेट्स पडत राहिल्या. दिलारा अख्तर (२७) वगळता इतर फलंदाजांना भारतीय गोलंदाजीसमोर टिकता आले नाही. भारताकडून नंदनी शर्मा आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी ३ विकेट्स घेत बांगलादेशचे कंबरडे मोडले.
२२ सप्टेंबरला महाअंतिम सामना; सुवर्णपदकासाठी भारताचा श्रीलंकेशी मुकाबला!
𝐁𝐢𝐠 𝐌𝐚𝐭𝐜𝐡 𝐏𝐥𝐚𝐲𝐞𝐫 👏
📷: @indiancricketteam#AsianGames2026 #INDWvBANW #ACC pic.twitter.com/TyyexoYXEG
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) September 20, 2026
पहिल्या उपांत्य फेरीत पाकिस्तानचा ८ गडी राखून पराभव करणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध भारताची सुवर्णपदकासाठी (Gold Medal Match) लढत २२ सप्टेंबर रोजी रंगणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ सुवर्णपदकावर नाव कोरेल, तर पराभूत संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागेल. दुसरीकडे, कांस्यपदकासाठी पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात सामना होईल.





