Shafali Verma Record : शफाली वर्माची आशियाई स्पर्धेत ऐतिहासिक खेळी! ४९ चेंडूंत वादळी शतक ठोकत लावली विक्रमांची रांग
Shafali Verma Record : भारतीय महिला क्रिकेट संघाची धडाकेबाज सलामीवीर फलंदाज शफाली वर्माने २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बांगलादेशविरुद्धच्या उपांत्य फेरीत वादळी शतक झळकावले.

Asian Games 2026 Shafali Verma Historic 49 Ball Century Equals Harmanpreet Kaur Record : जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) च्या उपांत्य फेरीच्या लढतीत भारतीय महिला क्रिकेट संघाची स्फोटक सलामीवीर शफाली वर्माने (Shafali Verma) आपल्या बॅटने नवा इतिहास रचला आहे. बांगलादेशविरुद्ध खेळताना तिने अवघ्या ४९ चेंडूंत ३ चौकार आणि ९ गगनचुंबी षटकारांच्या जोरावर नाबाद १०० धावांची धडाकेबाज खेळी साकारली. तिच्या या तुफानी शतकाच्या जोरावर भारताने २० षटकांत ४ बाद १९५ धावांचा डोंगर उभा केला. या खेळीसह तिने आंतरराष्ट्रीय महिला टी-२० मध्ये भारतासाठी सर्वात जलद शतक झळकावण्याच्या कर्णधार हरमनप्रीत कौरच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
आशियाई स्पर्धेच्या इतिहासातील पहिले शतक; डियांड्रा डॉटिन अव्वल स्थानी!
गेल्या वर्षी भारतीय संघात पुनरागमन केल्यानंतर जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या शफालीने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात शतक झळकावणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरण्याचा बहुमान पटकावला. तसेच आयसीसीच्या पूर्ण सदस्य (Full Member) देशांमध्ये हे संयुक्तपणे चौथे सर्वात जलद शतक ठरले आहे. या यादीत अव्वल स्थानी वेस्ट इंडिजची डियांड्रा डॉटिन (३८ चेंडू) असून, एलिसा हिली (४६ चेंडू), टॅमी ब्यूमॉन्ट, लॉरा वोल्वार्ड आणि आयशा जफर (प्रत्येकी ४७ चेंडू) यांच्यानंतर शफाली व हरमनप्रीतचा संयुक्त क्रमांक लागतो.
महिला T20I मध्ये शतक झळकावणारी तिसरी भारतीय फलंदाज!
Shafali Verma turns on the power and brings up a magnificent hundred! 🥵
Watch India vs Bangladesh semi-final match at the Asian Games 2026, LIVE NOW on Sony Sports Network TV channels & Sony LIV.#SonySportsNetwork #SonyLIV #AsianGames #AichiNagoya2026… pic.twitter.com/CuEynV9TNy
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) September 20, 2026
बांगलादेशच्या गोलंदाजांची पिसं काढत अवघ्या ४९ चेंडूंत शतक पूर्ण करताच शफाली महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक ठोकणाऱ्या फलंदाजांच्या एलिट यादीत पोहोचली आहे. याआधी भारताकडून स्मृती मानधनाने दोन शतके आणि हरमनप्रीत कौरने एक शतक झळकावले होते. आता या दिग्गजांच्या पंक्तीत बसणारी शफाली वर्मा ही देशाची केवळ तिसरी महिला खेळाडू ठरली आहे.
सुवर्णपदकाकडे कूच; फायनलमध्ये श्रीलंकेला नमवण्याचा निर्धार!
शफालीच्या या अविस्मरणीय शतकाच्या जोरावर भारताने बांगलादेशचा धुव्वा उडवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. हरमनप्रीत कौरच्या २०१८ मधील न्यूझीलंडविरुद्धच्या ४९ चेंडूंतील विक्रमाची बरोबरी करणाऱ्या शफालीच्या या वादळी खेळीमुळे भारतीय संघ आता सुवर्णपदक जिंकण्याच्या प्रबळ आत्मविश्वासाने २२ सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध मैदानात उतरणार आहे.





