“ऍमेनिटी स्पेस”चा विषय लांबणीवर; सूचनांचा समावेश न केल्याने राष्ट्रवादीचा विरोध

पुणे – राष्ट्रवादी कॉंग्रेसने केलेल्या घूमजावामुळे भाजपने ऍमेनिटी स्पेस भाडेतत्त्वावर देण्याचा विषय गुरुवारी महापालिका मुख्यसभेत पुढे ढकलला. बुधवारी खासदार वंदना चव्हाण यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर मध्यरात्रीपर्यंत या विषयात नाट्यमय घडामोडी घडल्या आणि राष्ट्रवादीने घातलेल्या अटी भाजपने मान्य न केल्याने राष्ट्रवादीने या विषयाला विरोध करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाजपने माघार घेत मुख्य सभाच तहकूब केली.
ऍमेनिटी स्पेसचा विषय गुरुवारी मुख्य सभेच्या कार्यपत्रिकेवर होता. तो मंजूर करण्याच्या इराद्याने भाजपने सदस्यांना व्हिप काढला होता. एकूणच महापालिकेत भाजपचे बहुमत असतानाही हा विषय आणण्याचे धारिष्ट्य भाजपने दाखवले नाही, आणि मुख्य सभाच पुढे ढकलून सभा तहकूबच करून टाकली.
वित्तीय तूट भरून काढणे आणि अतिक्रमण रोखणे यासाठी पुणे महापालिकेच्या आरक्षित 85 आणि अनारक्षित 185 ऍमेनिटी स्पेस 30 वर्षे कराराने भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला होता. प्रामुख्याने सत्ताधारी भाजप हा प्रस्ताव मुख्य सभेतही मंजूर व्हावा, यासाठी आग्रही होते. बहुमत असल्याने स्थायी समिती मध्ये मंजूर झालेल्या या प्रस्तावाला विरोधी पक्षांसह विविध संघटनांनीही विरोध केला होता.
या प्रस्तावाला विरोध होऊ नये यासाठी महापालिका सभागृह नेते गणेश बिडकर यांनी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रमुखांशी चर्चा करत होते. त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी “सशर्त’ या प्रस्तावाला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आणि खासदार वंदना चव्हाण आणि प्रवक्ते अंकुश काकडे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
ऍमेनिटी स्पेसमधील 33 टक्के जागांवर सामाजिक सहभागातून “अर्बन फॉरेस्ट’अंतर्गत वृक्षलागवड करायची. यासंदर्भात धोरण ठरवणे, या ऍमेनिटी स्पेसवर उभ्या राहणाऱ्या सुविधा सर्वसामान्य नागरिकांना सहज सुलभ उपलब्ध व्हाव्यात, अशी उपसूचना देण्याची तयारी बिडकर यांनी दर्शवल्यास या विषयाला पाठिंबा देणार असल्याचे या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. मात्र, तसे न झाल्याने रात्रीतून हा निर्णय बदलला आणि त्याला राष्ट्रवादीने विरोध केला, तर आमचा आधीपासूनच याला विरोध होता. आम्ही तीच भूमिका कायम ठेवली असती, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस गटनेते आबा बागूल आणि शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी दिली.
मुख्य सभेतील घडामोडी…
राष्ट्रवादी कॉंग्रेसने सकाळी अटी मान्य न केल्याने प्रस्तावाला विरोध असल्याची अधिकृत भूमिका जाहीर केली. त्यानंतरही बिडकर यांनी त्यांचे प्रयत्न सुरू ठेवले होते. मात्र ते सफल झाले नाही. त्यामुळे सभा सुरू झाल्यानंतर सभागृह नेते गणेश बिडकर यांनी गुरुवारची सभा 8 सप्टेंबरपर्यंत तहकूब करण्याची तहकुबी मांडली; महापौरांनी ती मंजूर करत सभा तहकूब केली. या विषयाला मोठा विरोध होऊ शकतो, असे वाटून भाजपने एक पाऊल मागे घेत हा प्रस्ताव पुढे ढकलला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसने काही अटी ठेवल्या होत्या. परंतु, रात्री साडेअकरा वाजता बिडकर यांनी उपसूचना तयार करून पाठवल्या. त्यामध्ये आम्ही मांडलेल्या सूचनांचा समावेश नव्हता. त्यामुळे आम्ही प्रस्तावाला विरोध करण्याची आधी घेतलेली भूमिका कायम ठेवली.
– प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस





