पिंपरी –रक्षाबंधन साजरे करण्यासाठी माहेरी गेलेल्या महिलेला सासरी परतण्यास उशीर झाल्याने चिडलेल्या पतीने तिच्यावर चाकूने वार केले. ही घटना मंगळवारी (दि. 20) रात्री एमआयडीसी भोसरी येथील संभाजीनगर परिसरात घडली.
ज्योती संतोष आवळे (वय 29), असे जखमी महिलेचे नाव असून त्यांनी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यांचे पती संतोष तुकाराम आवळे (वय 42, रा. संभाजीनगर, एमआयडीसी, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी ज्योती या आपल्या माहेरी रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. त्या सायंकाळी उशिरा घरी आल्या. या कारणावरून चिडलेल्या संतोष यांनी ज्योती यांना शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. त्यानंतर चाकुने ज्योती यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर मारून जखमी केले. पोलीस हवालदार कोतवाल याबाबत अधिक तपास करीत आहेत.