Rickshaw shutdown: रिक्षा बंदमुळे पुण्यात प्रवाशांचे हाल
Rickshaw shutdown:

मेट्रो, पीएमपीवर वाढला भार; परिवहनमंत्री सरनाईक यांच्या राजीनाम्याची मागणी
Rickshaw shutdown: बाइक टॅक्सीला परवानगी देणारे धोरण रद्द करण्यासह विविध मागण्यांसाठी रिक्षा चालक संघटनांनी सोमवारी (दि. २३) पुकारलेल्या राज्यव्यापी संपाला पुण्यातील रिक्षा चालकांसह कॅब चालकांचाही मोठा प्रतिसाद मिळाला.
शहरातील बहुतांश भागांत रिक्षा आणि कॅब रस्त्यावर न उतरल्याने नागरिक, नोकरदार आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली. याशिवाय रस्त्यांवरील वाहनांची वर्दळ काही प्रमाणात कमी झाल्याचे चित्र दिसून आले.
संपामुळे पीएमपी बस आणि मेट्रो सेवेकडे नागरिकांचा ओढा वाढल्याने या सेवांवरील प्रवाशांचा भार वाढला. मात्र, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करूनही अनेकांना इच्छित ठिकाणी पोहोचण्यासाठी रिक्षांची कमतरता जाणवली. विशेषतः रेल्वे स्थानके, बसस्थानके आणि मेट्रो स्थानकांपासून पुढील प्रवासासाठी प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. रिक्षा आणि कॅब सेवांसाठी मुख्य स्थानकांपैकी एक असलेल्या पुणे रेल्वे स्थानकावर शुकशुकाट जाणवला.
राज्यात रॅपिडो आणि उबरसारख्या कंपन्यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या बाईक टॅक्सी सेवांना रिक्षा संघटनांचा विरोध आहे. बाइक टॅक्सीमुळे पारंपरिक रिक्षा व्यवसायावर परिणाम होत असून, चालकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होत असल्याचे रिक्षा पंचायतीचे नितीन पवार म्हणाले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या धरणे आंदोलनात राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या राजीनाम्याची मागणी पुणे जिल्हा रिक्षा चालक मालक संघटनेच्या कृती समितीने केली.
या मागण्यांसाठी पुण्यात परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयांसमोर निदर्शने करण्यात आली. आंदोलनकर्त्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधताना माधुरी मिसाळ यांनी गुरुवारी संघटनांशी चर्चा करण्याचे. तसेच पुढील आठवड्यात मंत्रिमंडळातील सदस्यांसोबत बैठक घडवून आणण्याचे आश्वासन दिले.
बाइक टॅक्सी आणि ॲप आधारित ॲग्रिगेटर सेवांविरोधात रिक्षा आणि कॅब चालकांकडून सातत्याने आंदोलन केले जात आहे. मात्र, सरकारने दिलेल्या आश्वासनांवर अपेक्षित कारवाई न केल्यामुळे झालेल्या या संपामुळे नागरिकांचे हाल झाले.





