Pepco Paper Mills Company: कामगारांना थकीत देणी मिळण्याचा मार्ग मोकळा
३० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर न्यायालयीन लढ्याला यश

खालापूर – पेपको पेपर मिल्स कंपनीतील कामगारांना हक्काची थकीत देणी मिळवण्यासाठी ३० वर्षे न्यायालयाचे उंबरठे झिजवावे लागले. त्यानंतर अखेर कामगारांना थकीत रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या काही दिवसांत पहिल्या टप्प्यात १८ ते २० टक्के रक्कम जमा होणार असून, उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने कामगारांच्या खात्यावर जमा होईल, अशी माहिती देण्यात आली.
व्यवस्थापन आणि युनियनमधील संघर्षामुळे पेपको पेपर मिल्स कंपनी बंद पडली. कंपनीत जवळपास ५०० हून अधिक कामगार कार्यरत होते. मात्र कंपनी बंद झाल्यानंतर त्यांना हक्काची देणी मिळाली नव्हती. न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत आतापर्यंत २०० हून अधिक कामगारांचा मृत्यू झाला आहे.
कंपनीची स्थावर आणि जंगम मालमत्ता बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत तारण होती. या मालमत्तेच्या लिलावातून आलेली सुमारे ४३ कोटी रुपयांची रक्कम विविध बँकांनी २१ मार्च २००७ रोजी परतफेडीच्या बोलीवर उचलली होती. कामगारांचा पूर्ण हिशोब झाल्यानंतर ही रक्कम परत देण्याचे ठरले होते. तसेच सर्वोच्च न्यायालयाने ७ मे २०१३ रोजी कंपनीच्या कामगारांची देणी देण्याचा निर्णय दिला होता.
मात्र त्यानंतरही सुनावण्यांना विलंब होत राहिला. कंपनीतील कामगार भालचंद्र पालकर, तुळशीराम घारे, हाळूराम पिंगळे, संकेत देशमुख, रामदास घरत, मारुती तावडे, विनोद इंगळे आणि विशाल भारती यांनी पाठपुरावा सुरू ठेवला.
अखेर न्यायालयीन प्रक्रियेतून सकारात्मक निर्णय झाल्यानंतर घोडीवली येथे जवळपास २५० कामगार आणि हयात नसलेल्या कामगारांच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
यावेळी कामगारांना मदत करणाऱ्या पल्लवी वाडगावकर यांच्यासह न्यायालयीन वकील उपस्थित होते. हयात असलेल्या कामगारांनी आवश्यक कागदपत्रे जमा करावीत. तसेच मृत कामगारांच्या वारसांनी आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले. अधिक माहितीसाठी भालचंद्र पालकर (८५५२९७७१००) किंवा तुळशीराम घारे (९२०९६२५४२५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘कंपनी व्यवस्थापन आणि युनियनमधील वादामुळे कारखाना बंद झाल्यानंतर कामगारांना त्यांच्या हक्काची थकीत रक्कम मिळावी, यासाठी दीर्घकाळ प्रयत्न सुरू होते. अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार येत्या काही दिवसांत पहिल्या टप्प्यात जवळपास १८ ते २० टक्के रक्कम मिळणार असून, उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.’ – भालचंद्र पालकर, कामगार प्रतिनिधी
‘एकूण ५०० कामगारांपैकी जवळपास २०० हून अधिक कामगार हयात नाहीत. त्यामुळे हयात असलेल्या कामगारांनी बँक आणि न्यायालयात सादर करण्यासाठी स्वतःची आवश्यक कागदपत्रे जमा करावीत. मृत कामगारांच्या वारसांनी संबंधित कामगाराचा मृत्यू दाखला आणि अन्य आवश्यक पुरावे जमा करावेत.’ – तुळशीराम घारे, कामगार प्रतिनिधी.
Kartiki Ekadashi : कार्तिकी एकादशी यात्रेसाठी महापालिकेचा सहकार्याचा हात!




