Census-2027: घरबसल्या करा जनगणना; १० जानेवारीपासून ऑनलाइन नोंदणी
२५ जानेवारीपासून प्रगणकांच्या गृहभेटी

पिंपरी – जनगणना-२०२७ साठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन सज्ज होत असून, नागरिकांना यंदा प्रथमच डिजिटल स्वगणनेची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. १० ते २४ जानेवारी २०२७ या कालावधीत नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने कुटुंबाची माहिती नोंदविता येणार आहे.
त्यानंतर २५ जानेवारी ते २८ फेब्रुवारीदरम्यान प्रगणक घरोघरी भेट देऊन माहिती संकलित करणार आहेत. नागरिकांनी अचूक माहिती देऊन या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
जनगणनेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी मुंबईतील सह्याद्री अतिथिगृह येथे राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यास महापालिका आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी उपस्थित होते. या बैठकीत जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्याचे नियोजन आणि जनजागृतीबाबत चर्चा करण्यात आली.
स्वगणनेसाठी नागरिकांना १० ते २४ जानेवारीदरम्यान se.census.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. कुटुंबाची माहिती भरल्यानंतर ‘P’ अक्षराने सुरू होणारा ११ अंकी स्वगणना ओळख क्रमांक (SE ID) मिळेल. हा क्रमांक जतन करून ठेवावा. प्रगणक घरी आल्यानंतर तो दाखविल्यास माहिती पडताळणी सुलभ होणार आहे. स्वगणनेनंतर १ ते ५ मार्चदरम्यान पुनरीक्षण फेरी होणार आहे.
जनगणनेत संकलित होणारी माहिती जनगणना कायदा १९४८ अंतर्गत गोपनीय ठेवली जाणार आहे. जनगणनेच्या नावाखाली ओटीपी, पिन किंवा अनावश्यक कागदपत्रे मागितली जात नाहीत. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माध्यमांचाच वापर करावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नागरिकांनी स्वगणनेचा लाभ घेऊन प्रगणकांना अचूक माहिती द्यावी, असे आवाहन केले. जनगणनेविषयी माहितीसाठी www.censusindia.gov.in किंवा १८५५ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.
Wedding season: सुरू झाला रेशीमगाठी जुळण्याचा काळ; मंगल कार्यालयांचे बुकिंग फुल्ल!




