TOP News: मनोज जरांगे मराठा समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप ते ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होणार? जाणून घ्या आजच्या Top 10 News…
TOP 10 News : राज्य, देश-विदेश, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील ताज्या घडामोडी

1. मनोज जरांगे मराठा समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप
मराठा आंदोलनात आता उभी फूट पडली असून मनोज जरांगे पाटील आंदोलन करून मराठा समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. मनोज जरांगे करत असलेल्या आंदोलनाला आमचा पाठिंबा नसून 50 टक्क्यांच्या आत आरक्षण द्या, या मागणीसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा राज्यभर आंदोलन उभारणार, असं मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक सुनील नागणे यांनी सांगितले.
मनोज जरांगे यांनी आपल्या बैठकीत हे आंदोलन सरसकट मराठा समाजासाठी नसून, ज्यांच्या कुणबी नोंदी सापडत आहेत, त्यांच्यासाठी असल्याचं स्पष्ट केल्याचा दावा नागणे यांनी केला. २०१३-१४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी १६ टक्के आरक्षण देऊन समाजाची फसवणूक केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आणि आता मनोज जरांगे यांची भूमिका देखील मराठा समाजाच्या अपेक्षांशी विसंगत असल्याचे नागणे यांनी म्हटले आहे.
2. दहीहंडीच्या उत्सवाला मिळणार वरुणराजाची साथ
आज दहीहंडीच्या उत्सवाला वरुण राजाची साथ मिळणार आहे. महाराष्ट्रात रात्रीपासून पावसाची रिमझिम पाहायला मिळत असून आज उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत विजांसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर इतर भागांत तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे.
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नाशिक, तसेच मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात आज काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागांत दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या सुमारास वातावरणात बदल होऊन विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी येऊ शकतात. तर काही भागात दिवसभर ढगाळ वातावरण, अधूनमधून ऊन आणि सावलीचा खेळ सुरू राहू शकतो.
3. आदिवासी विकास विभागाचा मोठा निर्णय
निवासी शाळांची तपासणी आणि मान्यता रद्द करण्यासाठी नवी कार्यपद्धती जाहीर
राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी नागपूर, पुणे आणि नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. याच पार्श्वभूमीवर आता आदिवासी विकास विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. नामांकित निवासी शाळांची तपासणी आणि मान्यता रद्द करण्यासाठी नवी कार्यपद्धती जाहीर करण्यात आली आहे.
तक्रारी प्राप्त झाल्यास किंवा शाळेला 60 पेक्षा कमी गुण मिळाल्यास या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार असल्याची माहिती आहे. आवश्यक भौतिक व पायाभूत सुविधांचा अभाव आढळल्यासही कारवाई करण्यात येणार आहे. अपर आयुक्तांकडून अधिकाऱ्यांचे चौकशी पथक गठित केले जाणार असून गंभीर त्रुटी आढळल्यास शाळेला सुधारणा करण्यासाठी मुदत देण्यात येणार असल्याचीही माहिती आहे. तर त्रुटी दूर न केल्यास मान्यता रद्द करण्याची देखील शिफारस यात केली जाणार आहे.
4. छुप्या पद्धतीने डीजे लावला तर थेट गुन्हे; पोलिसांचा दहीहंडीनिमित्त तगडा बंदोबस्त
दहीहंडीनिमित्त शनिवारी मध्यभागासह शहरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. ध्वनीक्षेपकांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पोलिसांकडून काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे. ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त ध्वनीक्षेपक वापरल्यास पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला आहे.
“ध्वनीक्षेपक यंत्रणेतील प्रेशर मिड, प्लाझ्मा साउंड या उपकरणांचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. नियम धुडकाविल्यास मंडळांविरुद्ध थेट गुन्हे दाखल करून यंत्रणा जप्त करण्यात येईल. दहीहंडी आणि गणेशोत्सवासह वर्षभरातील सर्वच सण-उत्सवांमध्ये आवाजासाठी चार बास, चार टॉप वापर करण्यासाठी परवानगी राहणार आहे,” असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले आहे.
5. मुख्यमंत्री थलपती विजय यांचा पहिला परदेश दौरा ठरला
तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांचा पहिला परदेश दौरा ठरला आहे. या दौऱ्याला केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यांच्यासोबत एक शिष्टमंडळही युनायटेड किंगडम (यूके) येथे जाणार आहे. ११ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री विजय चार दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर जाणार आहेत.
मुख्यमंत्री विजय हे या ब्रिटन दौऱ्यात काही गुंतवणूकदारांना भेटणार असून, यादरम्यान संभाव्य गुंतवणूकदारांसोबत १.०२ लाख कोटींचे सामंजस्य करार होण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असल्याने या दौऱ्याची औपचारिक घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. ८ सप्टेंबर रोजी अधिवेशन संपल्यानंतर संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.
6. …तर ड्रायव्हिंग लायसन्सच रद्द होणार; नितीन गडकरींनी दिली माहिती
भारतातील ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र संदर्भात मोठे बदल होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. वाहतूक खात्यात ग्रेडेड पॉईंट सिस्टीम लागू करण्याचा विचार करत असून याबद्दलची माहिती
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. त्यानुसार आता तुम्ही वाहतूक नियम मोडल्यास त्याचा परिणाम थेट तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सवर होणार आहे.
या प्रस्तावित यंत्रणेमध्ये वाहतुकीचा नियम मोडल्याची नोंद होईल आणि ड्रायव्हिंग लायसन्समधून ठराविक पॉईंट्स वजा केले जातील. पेनल्टीचे हे पॉईंट्स एका विशिष्ट मर्यादेपलीकडे गेले तर विभागाला संबंधित चालकाचे लायसन्स सस्पेंड किंवा कायमस्वरुपी रद्द करण्याचाही अधिकार असेल. परंतु वाहतूक नियमांचे पालन करुन जबाबदारीने गाडी चालवणाऱ्यांना लायसन्सधारकांना बक्षीस म्हणून विमा कंपन्यांकडून विशेष सवलती दिल्या जाण्याची शक्यता आहे.
7. नेपाळ महापूरात अद्यापही ५,००० लोक बेपत्ता
नेपाळ-तिबेट सीमेवर आलेल्या विनाशकारी ढगफुटी आणि महापुरामळे मोठे संकट निर्माण झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत अडकलेल्या १६६ भारतीय नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून २७५ भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषदेत ही अधिकृत माहिती दिली.
याशिवाय, चीनच्या तिबेट स्वायत्त क्षेत्रात अडकलेले १,९०७ भारतीय नागरिक सुरक्षितपणे नेपाळच्या हद्दीत परतले असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नेपाळी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महापुरातील मृतांचा आकडा १३४४ वर पोहोचला आहे. आतापर्यंत १२,००० हून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले असून, अजूनही सुमारे ५,००० लोक बेपत्ता आहेत. बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि बचाव पथके रात्रंदिवस शोधमोहीम राबवत आहेत.
8. ‘RSSच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाका’, लंडनमध्येही मोहन भागवतांच्या दौऱ्याला विरोध
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० व्या वर्धापन दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय स्तरावर जनजागृती अभियानाचा भाग म्हणून सरसंघचालक मोहन भागवत यांचा अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनमध्ये दौरे आयोजित करण्यात आले आहेत. परंतु अमेरिकेपाठोपाठ आता लंडनमध्ये देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाला विरोध होऊ लागला आहे.
आरएसएसच्या कार्यक्रमांवर ग्रेटर लंडन अथॉरिटी या शासकीय संस्थेने बहिष्कार टाकावा, अशी मागणी करणारे पत्र विविध संस्थांनी लंडनचे महापौर सादिक खान यांना लिहिले आहे. “भागवत यांच्या दौऱ्यामुळे युकेमधील आरएसएस संबंधित संघटनांना चिथावणीखोर भाषणं देण्याचं बळ मिळेल.
भारतीय समुदायामध्ये अधिक ध्रुवीकरण होईल आणि देशातील संवेदनशील घटकांमध्ये भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण होईल”, असे पत्रात म्हटले आहे. लेबर पार्टीचे माजी नेते जेरेमी कॉर्बिन यांनीही आरएसएसच्या कार्यक्रमाला विरोध दर्शवला आहे.
9. दक्षिण आफ्रिकेच्या पठ्ठ्याने अवघ्या २० व्या वर्षी ठोकले वादळी शतक
दक्षिण आफ्रिकेचा युवा सलामीवीर फलंदाज लुआन-ड्रे प्रिटोरियसने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये आपले पहिलेवहिले शतक झळकावून नवा इतिहास रचला आहे. नामिबियाविरुद्धच्या तिरंगी मालिकेतील अंतिम सामन्यात या २० वर्षीय डावखुऱ्या फलंदाजाने अवघ्या ५२ चेंडूंत तुफानी शतक ठोकण्याची किमया केली. अवघ्या २० वर्षे आणि १६१ दिवसांच्या वयात हे वादळी शतक झळकावून प्रिटोरियसने जागतिक विक्रमाला गवसणी घातली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या पूर्ण सदस्य देशांमध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक ठोकणारा तो जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. त्याने अफगाणिस्तानच्या हजरतुल्ला झाझाईचा तब्बल सात वर्षे जुना विश्वविक्रम मोडीत काढला. यासह दक्षिण आफ्रिकेकडून टी-२० मध्ये शतक झळकावणारा तो नववा फलंदाज बनला.
10 . “प्रामाणिकपणे काम केलं तर सेलिब्रिटी बनतात”; मनोज वाजपेयींचा वक्तव्य चर्चेत
बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांनीही महाराष्ट्र अन्न सुरक्षा विभागाचे प्रमुख तुकाराम मुंढे यांच्या कामाच्या पद्धतीचं कौतुक केलं आहे. मनोज वाजपेयी म्हणाले की, “एखादा पोलीस अधिकारी किंवा तुकाराम मुंढे यांच्यासारखे सनदी अधिकारी यांची विशिष्ट काम करण्यासाठी नियुक्ती केली जाते, तेव्हा ही व्यक्ती आपलं कर्तव्य पूर्ण प्रामाणिकपणानं आणि निष्ठेनं पार पाडतात, तेव्हा लोक आश्चर्य व्यक्त करतात आणि ते अधिकारी सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागतात आणि तिला ‘सेलिब्रिटी’चा दर्जा मिळतो.
ही परिस्थिती आपल्या समाजाची अवस्था दर्शवते, जिथे केवळ सामान्य आणि प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणंही लोकांना थक्क करते. आजच्या काळात प्रामाणिकपणा हा इतका दुर्मिळ झाला आहे की, नियमानुसार काम करणाऱ्या अधिकाऱ्याला कौतुकाचा विषय बनावं लागत आहे. कर्तव्य बजावणं हा आता चर्चेचा विषय का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. याद्वारे मनोज वाजपेयी यांनी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन आश्चर्यचकित करणारा ठरतोय, यावर भाष्य केले आहे.
हेही वाचा:
Satara: अल्पवयीन मुलाकडून चाकू हल्ला साताऱ्यात हॉटेलमध्ये थरार; लघुटंकलेखक जखमी








