Satara: अल्पवयीन मुलाकडून चाकू हल्ला साताऱ्यात हॉटेलमध्ये थरार; लघुटंकलेखक जखमी
Satara अल्पवयीन मुलगा आजीकडे राहत असून त्याने येथील एका महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घेतला आहे. या मुलाच्या बॅगमध्ये चाकू आढळल्याने पोलीस गांभीर्याने तपास करत आहेत.

Satara: भूविकास बँक चौक परिसरातल हॉटेलमध्ये शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास नाश्ता करण्यासाठी गेलेल्या जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील लघुटंकलेखक संगम नारायण घोळसे (वय ३३, रा. दौलतनगर) यांच्यावर अल्पवयीन मुलाने अचानक चाकू हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले.
घोळसे यांच्या डाव्या बरगडीखाली चाकूचा वार झाल्याने त्यांना तातडीने साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूविकास बँक चौकातील एका हॉटेलमध्ये घोळसे सकाळी नाश्ता करण्यासाठी गेले होते. ते एका बाजूला बसून नाश्ता करीत होते. त्यांच्या पाठीमागे १६ वर्षीय अल्पवयीन मुलगा बसला होता. नाश्त्याच्या बिलाचे पैसे जवळ नसल्याने त्याने आजीला फोन केला. मात्र, आजीने फोन उचलला नाही. त्यावेळी आलेल्या रागातून त्यांनी घोळसे यांच्यावर हल्ला केल्याची माहिती पोलीस तपासातून स्पष्ट होत आहे. हा अल्पवयीन मुलगा आजीकडे राहत असून त्याने येथील एका महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घेतला आहे. या मुलाच्या बॅगमध्ये चाकू आढळल्याने पोलीस गांभीर्याने तपास करत आहेत.
अचानक झालेल्या या प्रकारामुळे हॉटेल परिसरात गोंधळ उडाला. रक्तबंबाळ अवस्थेत घोळसे यांना पाहून नागरिकांनी तातडीने धाव घेतली. हल्ल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या अल्पवयीन मुलाला पकडून नागरिकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याच्याकडील चाकूही ताब्यात घेतला आहे. जखमी संगम घोळसे सातारा प्रशासकीय इमारतीतील जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात लघुटंकलेखक म्हणून कार्यरत आहेत. हल्ल्यामागील नेमके कारण, मुलाकडे चाकू कसा आला आणि हल्ल्याचा पूर्वनियोजित हेतू होता का, याचा तपास शाहूपुरी पोलिसांनी सुरू केला आहे.





