Top 15 News: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला पूर्णविराम? , ‘२०२९ आधी सगळ्यांनाच नजरकैदेत ठेवणार?’ आणि अभिनेत्री प्रिया भवानी शंकर विवाहबंधनात, वाचा टॉप १५ बातम्या
Top 15 News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला पूर्णविराम?
‘माझ्यासाठी तो विषय तेव्हाच संपला’; सुप्रिया सुळे यांचे मोठे विधान
Top 15 News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. ‘कसले एकत्रीकरण? माझ्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही. माझ्याशीही याबाबत कोणी बोललेले नाही,’ असे त्या म्हणाल्या. अजित पवार यांच्या निधनानंतर विलीनीकरणाच्या विषयाला आपण पूर्णविराम दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अजित पवार यांना महायुतीतून बाहेर पडायचे होते, असा दावा काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला. मात्र, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हा दावा फेटाळून लावला.
‘रोहित पवार म्हणजे बँडवाले!’ राम शिंदेंची खोचक टीका;
म्हणाले, ‘मतदारसंघ सोडून राज्यभर फिरतात’
विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘रोहित पवार म्हणजे बँडवाले आहेत. कुठेही आंदोलन असले की, मी वाजवायला येऊ का, असे विचारतात,’ असा टोला त्यांनी लगावला. तसेच स्वतःच्या मतदारसंघातील जनतेला वाऱ्यावर सोडून ते राज्यभर फिरत असल्याचा आरोप केला. जामखेडमधील दीपावली फराळ कार्यक्रमात बोलताना शिंदे यांनी टँकर, दहीहंडी आणि नागरिकांना चष्मे वाटपाच्या मुद्द्यांवरूनही रोहित पवारांना लक्ष्य केले. त्यांच्या या टीकेमुळे जामखेडमधील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
‘राजकारणात काहीही घडू शकतं!’
दोन शिवसेना एकत्र येण्यावर भरत गोगावलेंचं मोठं विधान
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू असतानाच आता दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चांनाही वेग आला आहे. यावर मंत्री भरत गोगावले यांनी सध्या दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता वाटत नसली, तरी राजकारणात कधीही काहीही घडू शकतं, असं म्हटलं आहे. गुलाबराव पाटील यांना याबाबत काही संकेत मिळाले असतील, तर मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यांना विचारणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. दुसरीकडे, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास आपल्यापेक्षा आनंदी कोणी नसेल, अशी भावना व्यक्त केली. तर गुलाबराव पाटील यांनी एकनाथ शिंदे हे इंजिन असून ते ज्या दिशेने जातील, त्या दिशेने आपण जाऊ, असं म्हटलं आहे.
‘स्वच्छ हवा-पाण्यासाठी नागरिकांना संघर्ष का?’;
आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारला सवाल
देशातील वाढत्या प्रदूषणावरून शिवसेना (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. स्वच्छ हवा, पाणी आणि अन्न मिळवण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच एअर प्युरिफायर आणि वॉटर प्युरिफायरवर नागरिकांना अतिरिक्त खर्च करावा लागत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. हवामान बदलाच्या प्रश्नावर जीएसटी परिषदेच्या धर्तीवर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र राष्ट्रीय परिषद स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली. या परिषदेत सर्व राज्यांचे पर्यावरणमंत्री सहभागी व्हावेत आणि दर तीन महिन्यांनी हवामान कृती आराखड्याचा आढावा घ्यावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
संजय शिरसाट यांच्या घरावर मध्यरात्री दगडफेक!
तीन तरुण ताब्यात; दोन पोलीस कर्मचारी जखमी Top 15 News:
छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या गोलवाडी येथील निवासस्थानी गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजता तीन तरुणांनी दगड आणि काचेच्या बाटल्या फेकल्या. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. संशयितांना पकडण्याच्या प्रयत्नात दोन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले. पोलिसांनी तिन्ही तरुणांना ताब्यात घेतले असून, हल्ल्यामागील कारणाचा तपास सुरू आहे. दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी न पोहोचल्याने शिरसाट यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरही त्यांनी सवाल उपस्थित केले.
RNO – ‘निष्क्रिय लोकांना घरी पाठवणार’;
बावनकुळेंचा खासदार बळवंत वानखडेंना नाव न घेता टोला!
अमरावतीच्या राजकारणात आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवनीत राणा पुन्हा लोकसभेत जाणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच, ‘निष्क्रिय लोकांना घरी पाठवून काम करणाऱ्यांना संधी दिली पाहिजे,’ असे म्हणत विद्यमान खासदार बळवंत वानखडे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. यावेळी त्यांनी अमरावतीच्या विकासकामांसाठी फडणवीस सरकार कटिबद्ध असल्याचेही सांगितले.
RNO – तहसील कार्यालयात अस्वच्छता,
मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तहसील कार्यालयातील अस्वच्छता पाहून मंत्री गिरीश महाजन चांगलेच संतापले. पत्रकार परिषदेसाठी कार्यालयात पोहोचलेल्या महाजन यांना परिसरात धूळ, जाळी आणि कोळीष्टके साचल्याचे दिसले. एवढेच नव्हे, तर स्वच्छतागृहात दारूच्या बाटल्याही आढळल्या. यामुळे नाराजी व्यक्त करत त्यांनी हातात झाडू घेऊन स्वतःच स्वच्छता केली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत शासकीय कार्यालयातील अस्वच्छतेवरून खडे बोल सुनावले.
RNO – रायगडच्या डोंगररांगांना वनव्याचा विळखा!
नैसर्गिक गवत जळून खाक; जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर
रायगड जिल्ह्यातील डोंगररांगांमध्ये वनव्याच्या घटना वाढत असून नैसर्गिक गवत आणि जनावरांचा चारा जळून खाक होत आहे. एकीकडे दुष्काळाचे सावट असताना वनव्यामुळे चारा टंचाईचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. दरम्यान, वनव्यामुळे गवत नष्ट होण्यापूर्वी रोजगार हमी योजनेअंतर्गत त्याची कापणी करून जनावरांसाठी चारा उपलब्ध करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली आहे. यामुळे ग्रामीण भागात रोजगारही उपलब्ध होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
RNO – राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर हर्षवर्धन पाटील यांचे मोठे विधान;
म्हणाले, ‘आमच्याशी अद्याप कोणतीही चर्चा नाही’
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चेवर हर्षवर्धन पाटील यांनी महत्त्वाची भूमिका मांडली आहे. दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत अजित पवार यांची सकारात्मक भूमिका होती आणि त्यावेळी एकत्र येण्याचे ठरले होते, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, अजितदादांच्या निधनानंतर परिस्थिती बदलली असून, विलीनीकरणाबाबत सध्या कोणतीही बैठक किंवा चर्चा झालेली नाही, असे ते म्हणाले. आपण कोअर कमिटीचे सदस्य असून बैठक बोलावल्यास उपस्थित राहू. विलीनीकरणाचा अंतिम निर्णय पक्षाचे अध्यक्ष आणि पक्षीय प्रक्रियेनुसारच होईल, असेही त्यांनी सांगितले.
RNO – शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी आमदार राजेश बकाने आक्रमक;
दोन दिवसांत टेल एंडपर्यंत पाणी पोहोचवण्याचे निर्देश
निम्न वर्धा कालव्याचे पाणी शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांना मिळत नसल्याने आमदार राजेश बकाने यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. देवळी येथे संयुक्त आढावा बैठक घेत त्यांनी दोन दिवसांत टेल एंडपर्यंत पाणी पोहोचवण्याचे निर्देश दिले. कालव्यावर अनधिकृत पंप लावणाऱ्यांवर कारवाई, पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही दिला. तसेच पाणीवाटपावर संयुक्त पथकाने लक्ष ठेवावे, अशा सूचना केल्या. शेतकऱ्यांना पाणी मिळण्यात हलगर्जी झाल्यास हा प्रश्न विधानसभेत उपस्थित करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘२०२९ आधी सगळ्यांनाच नजरकैदेत ठेवणार?’ ;
वांगचुकांच्या दाव्यावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
लडाखमधील पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपल्याला घरात नजरकैदेत ठेवल्याचा दावा केला आहे. त्यांच्या घराबाहेर सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यावर कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी सरकारवर निशाणा साधला. ‘२०२९ पूर्वी हे सरकार प्रत्येकाला नजरकैदेत, ताब्यात किंवा अटकेत ठेवणार आणि सोशल मीडिया खात्यांवर निर्बंध आणणार, असे दिसते,’ असा टोला त्यांनी एक्सवरून लगावला. तसेच, आपण वांगचुकांच्या पाठीशी असल्याचे सांगत त्यांचा व्हिडिओ शेअर केला. वांगचुक यांनी लेहमधील हिंसाचाराच्या चौकशी अहवालाला होणारा विलंब आणि निवडणुकांवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.
पुढील १० वर्षांत कॅन्सर, अल्झायमर इतिहासजमा होणार?
AI च्या मदतीने वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती
AI मुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती घडण्याची शक्यता आहे. Anthropic चे CEO डारियो अमोडेई यांच्या मते, पुढील दशकात कॅन्सर, अल्झायमर, हृदयरोग आणि मानसिक आजारांवर मात करण्याच्या दिशेने मोठी प्रगती होऊ शकते. AI मुळे रोगांचे लवकर निदान, औषध संशोधन आणि नवीन उपचार विकसित करणे अधिक वेगवान होईल. मात्र, हे आजार दहा वर्षांत पूर्णपणे संपतील, याला अद्याप वैद्यकीय पुरावा नाही. नवीन औषधांची सुरक्षितता आणि परिणामकारकता सिद्ध करण्यासाठी प्रयोगशाळा आणि मानवी चाचण्या आवश्यकच राहणार आहेत.
Nvidia चे CEO जेनसेन हुआंग यांचा राजीनामा;
चिनी गुप्तहेर महिलेशी प्रेमसंबंधांच्या चर्चेने खळबळ
Nvidia चे CEO जेनसेन हुआंग यांनी १२ नोव्हेंबर रोजी पदाचा राजीनामा दिल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे. त्यांच्या जागी CFO कॉलेट क्रेस अंतरिम CEO म्हणून जबाबदारी स्वीकारणार असल्याचेही म्हटले आहे. एका चिनी उद्योजक महिलेशी प्रेमसंबंध आणि ती महिला गुप्तहेर असल्याच्या संशयामुळे हुआंग चर्चेत होते. मात्र, या दाव्यांना अधिकृत दुजोरा नसल्याने त्यांची सत्यता स्पष्ट नाही. हुआंग हे Nvidia चे सहसंस्थापक असून AI आणि चिप उद्योगातील कंपनीच्या विस्तारात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.
भारत-पाकिस्तान महामुकाबला!
गतवर्षीच्या पराभवाचा वचपा घेण्याची टीम इंडियाला संधी
१९ वर्षांखालील आशिया कप २०२६ च्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. भारताने उपांत्य फेरीत अफगाणिस्तानचा ८ विकेट्सने पराभव केला, तर पाकिस्तानने बांगलादेशला हरवून अंतिम फेरी गाठली. कर्णधार लक्ष्य रायचंदानीने अफगाणिस्तानविरुद्ध ९३ धावांची खेळी केली. गतवर्षी पाकिस्तानकडून अंतिम सामन्यात झालेल्या १९१ धावांच्या पराभवाचा वचपा घेण्याची भारताला संधी आहे. भारताला आठव्यांदा विजेतेपद पटकावण्याची संधी असून, यंदा चषक जिंकण्याचे आव्हान संघासमोर आहे.
अभिनेत्री प्रिया भवानी शंकर विवाहबंधनात;
बॉयफ्रेंडसोबत गुपचूप लग्न Top 15 News:
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री प्रिया भवानी शंकर हिने बॉयफ्रेंड राजवेल राजसोबत लग्नगाठ बांधली आहे. चेन्नईत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा खासगी विवाहसोहळा पार पडला. ११ नोव्हेंबर रोजी प्रियाने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. ‘तर, अखेर हे घडलं!’ असं कॅप्शन देत तिने लग्नाची तारीखही जाहीर केली. या फोटोंवर चाहत्यांसह कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. प्रिया लवकरच ‘डिमाँटे कॉलनी ३’ या हॉरर-थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे.





