लक्षवेधी : ‘एआय’मुळे तैवानची भरभराट
जगातील सर्वात जास्त वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून तैवानचे नाव घ्यावे लागेल. कारण 2026 मध्ये तैवानची सर्वाधिक वेगाने प्रगती झाली आहे. तैवानचा जीडीपी वाढीचा वेग 14.36% आहे, जो भारताच्या तुलनेत अधिक आहे.

– हेमंत देसाई
जगातील सर्वात जास्त वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून तैवानचे नाव घ्यावे लागेल. कारण 2026 मध्ये तैवानची सर्वाधिक वेगाने प्रगती झाली आहे. तैवानचा जीडीपी वाढीचा वेग 14.36% आहे, जो भारताच्या तुलनेत अधिक आहे.
2026 मध्ये तैवानने सर्वाधिक वेगाने प्रगती करून दाखवली आहे. तैवानच्या वास्तविक जीडीपी किंवा राष्ट्रीय उत्पादन वाढीचा वेग 14.36% झाला आहे. ही वाढ वर्षअखेरपर्यंत किंचित कमी झाली, तरी 11 टक्के तरी वाढ होईल, असा अंदाज आहे. या तुलनेत भारतातील पहिल्या दोन तिमाहींतील वाढीचा वेग 8.6% आणि 7.8% इतका आहे.
तैवानपेक्षा भारत 90 पटींनी मोठा देश आहे आणि तैवानच्या 60 पट लोकसंख्या भारताची आहे. परंतु जीडीपीचा विचार केला, तर दोन्ही देशांमध्ये त्या प्रमाणात अंतर नाही. भारताचा जीडीपी चार ट्रिलियन डॉलर असून, तैवानचा एक ट्रिलियन डॉलर इतका आहे.
गेल्या वर्षी तैवानचा जगातील अर्थव्यवस्थांमध्ये 22वा नंबर होता. सिंगापूर, नॉर्वे आणि दक्षिण आफ्रिकेनंतर तैवानचा नंबर लागत होता. जगातील सेमीकंडक्टर उत्पादनातील ‘टीएसएमसी’ ही सर्वात मोठी कंपनी तैवानमध्ये आहे. ती सेमीकंडक्टर चिप्स बनवते. तैवानच्या जीडीपीमधील 10 टक्के वाटा या कंपनीमुळे येतो. 2025 पेक्षा या कंपनीचे उत्पन्न यंदा 43 टक्क्यांनी वाढून 175 बिलियन डॉलर्स इतके झाले आहे. जगात कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा एआयमध्ये जी गुंतवणूक तेजी आली आहे, त्यामध्ये टीएसएमसीचा मोठा वाटा आहे.
तैवानच्या सेमीकंडक्टर चीपच्या निर्यातीत 21% वाढ झाली असून, गेल्या सप्टेंबरमध्ये तैवानने आयात-निर्यात व्यापारात 23 बिलियन अब्ज डॉलरची शिल्लक दाखवली. तैवानमधील गुंतवणूक निर्यात आणि एकूण विकासात एआयचा मोठा वाटा आहे. एआय चालवण्यासाठी आणि तिच्या विकासासाठी सेमीकंडक्टर चिप्स अत्यावश्यक असतात. या चिप्स म्हणजे आधुनिक एआय तंत्रज्ञानाचा मेंदूच होय.
आपल्या कॉम्प्युटर किंवा मोबाइलमध्ये असणारे सीपीयू किंवा सामान्य प्रोसेसर एकावेळी एक किंवा काही मोजकीच कामे वेगाने करू शकतात. याउलट एआय अल्गोरिदम (उदाहरणार्थ चॅट जीपीटी किंवा इमेज जनरेटर) चालवण्यासाठी अब्जावधी गणिते एकाच वेळी करावी लागतात. त्यासाठी विशेष चिप्स वापरल्या जातात, ज्यांना एआय अॅक्सिलेटर्स किंवा एआय चिप्स म्हणतात. या क्षेत्रात तैवानने चमकदार कामगिरी करून दाखवली आहे.
सुरुवातीला एआय हे केवळ माणसाचे बिनडोक काम करणारे एक उपयुक्त तंत्रज्ञान आहे, असेच मानले जात होते. परंतु आता एआय हे केवळ दिलेले आदेश पाळण्यापुरते मर्यादित न राहता, स्वतः विचार करू शकणारे एक तंत्रज्ञान आहे, याचा प्रत्यय येऊ लागला आहे. 2021 साली कोड-दा विंची-002 या एका ओपन एआय प्लॅटफॉर्मचा अॅक्सेस काही एका मित्रांच्या गटाला देण्यात आला.
त्यांना कविता लिहिण्याचा एक प्रकल्प देण्यात आला. जगद्विख्यात कवी वर्डस्वर्थ आणि व्हिटमन यांच्या शैलीतील कविता एआयने लिहून दिल्या. त्यानंतर एआयच्या मार्फत दहा हजार कविता एका वर्षात प्रसिद्ध झाल्या. ‘आय अॅम कोड’ या नावाने हे कवितांचे पुस्तकही प्रकाशित झाले. एआय नेमका कुठवर पल्ला गाठू शकते, याची कल्पना त्यावरून आली!
कृत्रिम बुद्दिमत्ता ही दुहेरी तलवार असल्याचे मानले जाते. यातील धोके कमी करून संधींचा अधिकाधिक फायदा घेण्यावर भारत सरकारचा भर आहे. भारतात एआयची कौशल्ये विपुल आहेत. कल्पकतेला वाव देण्यासाठी अतिनियमन न करण्याचे भारत सरकारचे धोरण असून, ते योग्यच आहे. शक्य तितक्या किफायतशीर दरांमध्ये जीपीयू, म्हणजेच ग्राफिक प्रोसेसिंग युनिट उपलब्ध करून देण्याची खबरदारी घेण्यात आली आहे, ही चांगली बाब आहे.
मात्र एआय हा भारतासाठी धोका नसून, ती सुसंधीच आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. अर्थात, त्यासाठी सुस्पष्ट धोरणे आणि व्यापक कौशल्यविकासाच्या सोयी-सुविधांची आवश्यकता आहे. खासगी व शैक्षणिक क्षेत्र व धोरणकर्त्यांचे संयुक्त प्रयत्न आवश्यक असल्याचे अचूक प्रतिपादन भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. नागेश्वरन यांनी केले आहे. शैक्षणिक सुधारणेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीसाठी एआयचा स्वीकार करून, भारत जगाचे नेतृत्व करू शकतो, हे त्यांचे मत विचार करण्यासारखे आहे.
भारतातील रोजगारक्षम व्यक्तींची संख्या मोठी आहे, परंतु त्यांना नोकर्या नाहीत. म्हणूनच कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास आपोआप होऊ देण्याऐवजी तो व्यापक रोजगारनिर्मितीशी संलग्न करणे गरजेचेच आहे. एआयमुळे पारंपरिक कौशल्ये व त्यावर आधारित रोजगार कालबाह्य ठरू शकतील. परंतु त्यामुळे हे सर्व रोजगारच नष्ट होतील, असे नाही. त्याऐवजी कामांचे स्वरूप बदलेल आणि त्यातून नवीन संधी निर्माण होतील.
केंद्र सरकारने कॉम्प्युटर म्हणजे संगणकीय पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी 10 हजार 372 कोटी रुपयांचा कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा कार्यक्रम यापूर्वीच लाँच केला आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या उद्योग व्यावसायिकांना त्यांच्या डेटा सेंटरचे रूपांतर कॉम्प्युटर युनिट्समध्ये करण्यासाठी वेगवेगळी प्रोत्साहने दिली जाणार आहेत.
एआयच्या तंत्रज्ञानात जो श्रेष्ठ असेल, तो जगावर राज्य करील, असे रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी म्हटले होते. एआयच्या माध्यमातून शेतकर्यांच्या कष्टाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी, यासाठी महाराष्ट्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. अन्य राज्यांनीही याच दिशेने पावले टाकली पाहिजेत. केंद्र आणि राज्य यांच्या सहकार्यातून एआयबाबत देशात नवी क्रांती होऊ शकते.






