Top 10 News : ठाकरेंच्या खासदारांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट, ‘हॉटेलमध्ये पिण्यायोग्य पाणी मोफत द्या’ आणि ‘तैयार हो, आ रही है ‘ईठा’ ,वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News :

ठाकरेंच्या खासदारांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट,
पावसाळी अधिवेशनापूर्वी ‘ऑपरेशन टायगर’वर फैसला होणार?
Top 10 News :पावसाळी अधिवेशनापूर्वी ऑपरेशन टायगरवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला फैसला करण्याची शक्यता आहे. टीएमसी आणि शिवसेना ठाकरेंच्या बंडखोर खासदारांच्या प्रकरणात पावसाळी अधिवेशनापूर्वी लोकसभा अध्यक्ष निर्णय घेतील अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. दोन्ही पक्षांची सुनावणी पूर्ण झाली आहे. टीएमसी आणि शिवसेना ठाकरेंच्या नेत्यांनी अध्यक्षांची दोन वेळा भेट घेतली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी अध्यक्षांना भेटून शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत सामील होण्याचे पत्र दिले आहे. लोकसभा सचिवालयातच कायदेशीर आणि घटनाविषयक तज्ज्ञांशी चर्चा सुरु आहे. डीएमके आणि टीएमसीच्या खासदारांना इंडिया आघाडीपासून वेगळे बसवण्याच्या प्रश्नावरही निर्णय होणार असल्याचं म्हटलं जातंय.
हॉटेलमध्ये पिण्यायोग्य पाणी मोफत द्या,
तुकाराम मुंढेंचा आदेश
राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट, धाबे आणि ज्या ठिकाणी अन्न प्रक्रिया केली जाते त्यांनी नियमांचे पालन करणं बंधनकारक आहे. त्याचं जर उल्लंघन केलं तर त्यांना कुणीही वाचवू शकणार नाही असा इशारा राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला. तसेच हॉटेल्सनी ग्राहकांना पिण्यायोग्य आणि सुरक्षित पाणी हे मोफत देणं गरजेचं आहे, तसा बोर्ड त्यांनी समोर लावावा, अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. राज्यातील नागरिकांना सुरक्षित अन्न मिळावं यासाठी अन्न व औषध प्रशासनाने ‘सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र’ ही मोहीम राबवली जात आहे. त्यासाठी सर्वांनीच नियमांची अंमलबजावणी करावी, अन्यथा कारवाई करण्यात येईल असं तुकाराम मुंढे म्हणाले.
केतन अग्रवाल केसमध्ये मोठी घडामोड
आरोपीच्या दुकानातील कामगार माफीचा साक्षीदार
लोहगड किल्ल्यावर व्यावसायिक केतन अग्रवाल याची दरीत ढकलून हत्या केल्याच्या प्रकरणाला आता अत्यंत नाट्यमय आणि महत्त्वाचं वळण मिळालं आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास करणाऱ्या पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेला या गुन्ह्यात एक ‘माफीचा साक्षीदार’ मिळाला आहे. मुख्य आरोपी चेतन चौधरीच्या दुकानात काम करणाऱ्या नीरज कुमार नावाच्या कामगाराने पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. पोलीस सध्या त्याचा अधिकृत जबाब नोंदवून घेत आहेत. नीरजची ही साक्ष केतनच्या हत्येचा कट रचणारी त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना फाशीच्या फंद्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कोर्टात सर्वात मोठा पुरावा ठरणार आहे.तपासादरम्यान समोर आलेले मोबाईल फोनचे डिटेल्स हेच या हत्येचे गुपित उघड करणारे ठरले आहेत.
अखेर मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय;
पुढील ५ दिवस या जिल्यात मुसळधार
गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला मान्सून अखेर संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय झाला आहे. गेल्या आठवड्यात ढगांची पुरेशी निर्मिती न झाल्यामुळे पावसाने ओढ दिली होती, मात्र आता कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्रातील बहुतांश भागांत मोठ्या प्रमाणावर ढग दाटून आले असून ठिकठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाचे (IMD) पुणे प्रमुख एस. डी. सानप यांनी आगामी ४ ते ५ दिवस राज्यात चांगल्या पावसाचे असणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.त्यासोबतच “मान्सून राज्यात पूर्णपणे सक्रिय झाल्यामुळे वाऱ्याचा वेग वाढला आहे. परिणामी वेगवान ढग निर्मिती होऊन पाऊस पडत आहे.”असेही त्यांनी म्हटले. यंदा मान्सून राज्यात दाखल होण्यास उशीर झाला होता. त्यातच जून महिन्याच्या सुरुवातीला पाऊस न झाल्याने गेल्या दोन दिवसांपर्यंत पावसात तब्बल ७२ टक्के तूट नोंदवली गेली होती. मात्र, येणाऱ्या ५ दिवसांत ही संपूर्ण तूट भरून निघेल, असा विश्वास हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
‘महिनाभरापूर्वीच ओमराजेंच्या बंडाचं प्लॅनिंग’
भावानेच केला मोठा गौप्यस्फोट Top 10 News :
खासदार ओमराजे निंबाळकरांनी शिंदे सेनेत प्रवेश केल्यानंतर धाराशीवमधील राजकीय वातावरण तापलंय. ओमराजेंच्या पक्षांतराबाबत खुद्द त्यांच्या बंधूंनी मोठा गोप्यस्फोट केलाय. ओमराजे निंबाळकरांचे चूलतबंधू मकरंदराजे निंबाळकरांनी मात्र त्यांच्याबाबत वेगळाच गौप्यस्फोट केलाय. खासदार ओमराजे निंबाळकरांचं बंडाचं प्लॅनिंग महिनाभरापासून सुरू होतं, असा मोठा दावा मकरंदराजे निंबाळकर यांनी केलाय. ठाकरेंची साथ सोडल्यानंतर ओमराजे निंबाळकर सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाले. मात्र शिंदे सेनेत जाण्याचा त्यांचा निर्णय एका रात्रीत झाला नाही. महिनाभरापासून त्याची रणनिती आखली जात होती हे उघड झालंय. ठाकरेंचा गड असलेल्या धाराशिवमध्ये ठाकरेंना नवे निंबाळकर मिळालेले असले तरी तळागाळात संपर्क असलेल्या ओमराजेंना रोखण्यात ते यशस्वी होणार का? पक्ष संघटना नव्यानं मजबूत करण्यात यश येणार का? हे पाहणं महत्वाचं आहे.
बांगड्यांचा ढिग अन् नेकलेस;
ZP सदस्याकडे सापडले ३ किलो सोन्याचे दागिने
कोलकातामध्ये सत्तांतर झाल्यानंतर टीएमसीला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. टीएमसीचे अनेक नेते सीबीआय आणि ईडीच्या रडारवर आलेत. आताही टीएमसीच्या एका झेडपी सदस्याच्या घरातून पैशांचं घबाड पोलिसांच्या हाती लागलंय.पश्चिम बंगाल पोलिसांनी नादिया जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सदस्य टीना भौमिक साहा यांच्या घरावर छापा टाकला. या कारवाईमध्ये तब्बल 4 कोटी रुपये किंमतीचे ३ किलो सोन्याचे दागिने सापडले आहे. याा कारवाईमुळे राजकारणात खळबळ उडालीय. टीना भौमिक साहा या तृणमूल काँग्रेसचे नेते सब्यसाची दत्ता यांच्या निकटवर्तीय आहेत. बिधाननगरमध्ये माजी महापौरांना अटक झाली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी टीना भौमिक साहा यांच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी पोलिसांनी ४ कोटी रुपयांचं सोनं जप्त केलंय.अवैध मार्गाने जमावलेला पैसा हा त्यांनी सोनं खरेदी करून गुंतवला असल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी दत्ताा यांचा एक फ्लॅट आणि बँक लॉकर जप्त केलंय. या लॉकरमधून सोनं खरेदीच्या पावत्या सापडल्या. तसंच मोठ्या प्रमाणात सोनंही आढळलं.
अरुणाचल प्रदेशात ढगफुटीसदृश्य पाऊस
गावे पाण्याखाली, हायवेवरील पूल वाहून गेला
अरुणाचल प्रदेशात ढगफुटीसदृश्य पावसानं कहर केला. मुसळधार पावसामुळं भूस्खलन आणि अचानक पूरस्थिती निर्माण झाली. राज्यातील सुबनसिरी आणि केयी पन्योर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळं अनेक गावं पाण्याखाली गेली. घरे आणि पिकांचं मोठं नुकसान झालं. मुख्य महामार्गावरील पूल वाहून गेल्याचीही माहिती समजते. हवामान खात्याच्या माहितीनुसार, अवघ्या तीन तासांत म्हणजेच सकाळी सहा ते नऊ वाजताच्या दरम्यान मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे नदीची पाणीपातळी वाढली आणि पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली.
व्हेनेझुएलात दोन शक्तिशाली भूकंप
10 हजार लोकांचा मृत्यू झाल्याची भीती
व्हेनेझुएलाची राजधानी आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या कराकस शहराला बुधवारी संध्याकाळी भूकंपाचे दोन शक्तिशाली धक्के बसले. 7.1 आणि 7.5 रिश्टर स्केल क्षमतेच्या भूकंपाच्या या धक्क्यांनी कराकस शहरातील इमारती आणि घरं अक्षरश: पत्त्यासारखी कोसळली. या दुर्घटनेत तब्बल 10 हजार नागरिकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जातीय. बुधवारी संध्याकाळीकराकस शहराला हे भूकंपाचे धक्के बसलेत. या शक्तिशाली भूकंपानंतर काही नागरिक त्यांच्या घरांमधून बाहेर पडत धावत रस्त्यावर आले. हे भूकंपाचे धक्के इतके शक्तिशाली होते की, अनेक इमारती पूर्णपणे कोसळल्या आहेत. कराकस शहरात सध्या फक्त इमारतींचे ढिगारे उरले आहेत. लोकांना आसरा घेण्यासाठीही जागा शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे भूकंपाच्या धक्क्यानंतर याठिकाणी नागरिकांना रात्रभर रस्त्यावरच राहावे लागले.
आयसीसी रँकिंगमध्ये भारताचा दबदबा;
शुभमन गिलने किंग कोहलीला टाकलं मागे
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच वनडे फलंदाजांची क्रमवारी जाहीर केलीये. यामध्ये पुन्हा एकदा टीम इंडियाच्या खेळाडूंचा दबदबा दिसून आला आहे. विशेषतः कर्णधार शुभमन गिल, विराट कोहली, रोहित शर्मा, ईशान किशन आणि यशस्वी जैस्वाल यांनी या क्रमवारीत आपली छाप सोडलीये.टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल वनडे क्रमवारीत आता पहिल्या क्रमांकाच्या अगदी जवळ पोहोचला आहे. 791 रेटिंग पॉईंट्ससह त्याने दुसरे स्थान मिळवलंय. सध्या न्यूझीलंडचा डॅरिल मिचेल 816 गुणांसह पहिल्या क्रमांकावर कायम आहे.अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे सिरीजपूर्वी गिल पाचव्या स्थानावर होता. मात्र या सिरीजपूर्वी पहिल्या सामन्यात त्याने 84 रन्स केले, तर दुसऱ्या सामन्यात 154 रन्सची तुफान खेळी साकारली. या कामगिरीमुळे त्याला मोठा फायदा झाला आणि तो थेट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. दुसरीकडे, दुखापतीमुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे सिरीजमध्ये विराट कोहलीला खेळता आलं नाही. त्याचा परिणाम त्याच्या क्रमवारीवर झाला आहे. विराटला एका स्थानाचं नुकसान सहन करावं लागलं असून तो आता 768 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर घसरलाय.
तैयार हो, आ रही है ‘ईठा’;
श्रद्धा कपूरची ठसकेबाज लावणी रिलीज Top 10 News :
लक्ष्मण उतेकरांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘ईठा’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘ईठा’ चा अधिकृत टीझर काल रिलीज झाला. हा चित्रपट लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित आहे. श्रद्धा कपूरने चित्रपटात विठाबाईंची भूमिका साकरली आहे. चित्रपटाचे दोन पोस्टरही समोर आले आहेत. ज्यात श्रद्धा कपूरचा कातिल अंदाज पाहायला मिळत आहे. ‘ईठा’ च्या टीझरला भरभरून प्रेम मिळत आहे.’ईठा’ च्या टीझरमध्ये श्रद्धा कपूरची ठसकेबाज लावणी पाहायला मिळत आहे. नऊवारी साडी, पायात घुंगरू, केसांत गजरा घालून श्रद्धा कपूर बेभान होऊन नाचताना दिसत आहे. गर्भावस्थेच्या शेवटच्या टप्प्यात असतानाचे दृश्य पाहून अंगावर काटा येतो. विठाबाईंना लावणी सुरू असताना प्रसूती कळा येतात. त्या स्टेजमागे जाऊन बाळाला जन्म देतात आणि पुन्हा स्टेजवर येऊन लावणी सादर करतात. श्रद्धा कपूरने ‘ईठा’ चित्रपटाचे पोस्टर शेअर करून, “तैयार हो, आ रही है ईठा” कॅप्शनमध्ये असं लिहिलंय.’ईठा’ हा चित्रपट २८ ऑगस्टला रिलीज होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ‘ईथा’ चित्रपटाचे शूटिंग नाशिक, सातारा येथे झाले आहे.





