Top 10 News : राज्यात लवकरच राज्यात महाआधार, राज्यातील २७ जिल्ह्यांसाठी ५ दिवस महत्वाचे आणि ‘मुळशी पॅटर्न 2’ला मुळशीकरांचा विरोध, वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News : राज्यातील नागरिकांना आता डिजिटल ‘महा-आयडी’ देण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव आहे. हा स्वतंत्र ओळख क्रमांक नसून आधारशी जोडलेला एकात्मिक डिजिटल आयडी असेल

लवकरच राज्यात महाआधार ;
कागदपत्रांच्या दरवेळच्या कटकटीतून सुटका
Top 10 News : राज्यातील नागरिकांना आता डिजिटल ‘महा-आयडी’ देण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव आहे. हा स्वतंत्र ओळख क्रमांक नसून आधारशी जोडलेला एकात्मिक डिजिटल आयडी असेल. इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम प्रज्ञा विभागाच्या ‘महासारथी’ प्लॅटफॉर्मद्वारे त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. महा-आयडीच्या माध्यमातून नागरिकांना विविध सरकारी सेवांसाठी वारंवार कागदपत्रे, नोंदणी आणि ओळखपत्रे सादर करण्याची गरज कमी होणार आहे. अधिवास, उत्पन्न प्रमाणपत्र, शिधापत्रिका यांसारखी उपलब्ध माहिती पुन्हा मागवली जाणार नाही. विद्यार्थी, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना याचा विशेष फायदा होण्याची शक्यता आहे. या उपक्रमाची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.
सुखबीर सिंह बादल यांना एअरलिफ्ट करणार
नांदेडमधून पंजाबला नेण्यात येणार
नांदेडमध्ये पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंह बादल यांच्यावर १३ ऑगस्टला हल्ला झाला. मातासाहेब गुरुद्वारातून बाहेर पडताना ६२ वर्षीय जसपालसिंगने त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेत बादल यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली असून त्यांच्यावर यशोसाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आज सकाळी ११ वाजल्यानंतर त्यांना एअरलिफ्ट करून पंजाबला नेण्यात येणार आहे. मूळचा पुण्याचा असलेला जसपालसिंग पेशाने वकील असून, तो दोन वर्षांपासून गुरुद्वारात सेवा करत होता. पोलिसांनी त्याला घटनास्थळीच ताब्यात घेतले असून मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय
भूसंपादनापूर्वी पोटहिस्सा निश्चित होणार
राज्यातील भूसंपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांना त्यांच्या प्रत्यक्ष वहिवाटीनुसार मोबदला मिळणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकाच सातबारावर अनेक नावे असल्यास भूसंपादनापूर्वी जमिनीचा ‘पोटहिस्सा’ निश्चित केला जाईल. त्यानंतर प्रत्येक खातेदाराच्या प्रत्यक्ष वहिवाटीनुसार स्वतंत्रपणे मोबदला दिला जाणार आहे. त्यामुळे भाऊ-भावांमध्ये किंवा सामायिक खातेदारांमध्ये मोबदल्यावरून होणारे वाद आणि न्यायालयीन प्रकरणे टाळता येणार आहेत. दरम्यान, राज्यातील २ लाख ३१ हजार शेतकऱ्यांच्या ताब्यात जमीन असूनही सातबारा किंवा प्रॉपर्टी कार्डवर नाव नाही. पुढील तीन महिन्यांत त्यांची नावे नोंदवण्यासाठी विशेष योजना राबवली जाणार आहे.
सव्वादोन लाख मतदार मृत ;
नागपुरमध्ये SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
नागपूर जिल्ह्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (SIR) प्रक्रियेत धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रशासनाच्या तपासणीत २ लाख २५ हजार ६२७ मतदार मृत, ४ लाख ४८ हजार २२३ मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित, तर २ लाख ९९ हजार ६४७ मतदार त्यांच्या मूळ पत्त्यावर आढळले नाहीत. याशिवाय १ लाख ४ हजार ४४९ मतदारांची नावे दुबार असल्याचे आढळले. जिल्ह्यात एकूण ४६ लाख ३८ हजार ४५९ मतदार आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी SIR प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत मतदारांना प्रपत्रे जमा करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.
राज्यातील २७ जिल्ह्यांसाठी ५ दिवस महत्वाचे;
विदर्भासह महाराष्ट्रात काही ठिकाणी कमी पाऊस Top 10 News :
महाराष्ट्रात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस राज्यातील 27 जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण, विदर्भ, खान्देश, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचा जोर राहण्याचा अंदाज आहे. तर मराठवाडा, अहिल्यानगर आणि सोलापूरसह 9 जिल्ह्यांत किरकोळ पाऊस होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सून वाऱ्यांना बळकटी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑगस्टच्या अखेरच्या आठवड्यात राज्यात पावसाचा जोर वाढू शकतो.
‘मोदी-शहांना आम्ही वेडे करून सोडू’
राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली. दिल्लीत रचनात्मक काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलताना, मोदी आणि शहा राजीनामा देत नाहीत तोपर्यंत विरोधक त्यांना शांततेत झोपू देणार नाहीत, असा दावा त्यांनी केला. देशात सध्या ‘आदेश विरुद्ध अभिव्यक्ती’ असा संघर्ष सुरू असल्याचेही राहुल गांधी म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करताना त्यांनी संघावर अदानी आणि अंबानींच्या प्रभावाचा आरोप केला. तसेच नोटबंदी आणि जीएसटीमुळे छोट्या व्यावसायिकांचे नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला.
चमोली बोगद्यामध्ये मोठी दुर्घटना;
अनेक कामगार अडकले
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील मायापूर-पिंपळकोटी याठिकाणच्या बोगद्यामध्ये मोठी दुर्घटना घडली. बोगद्यात मातीचा ढिगारा आणि पाणी शिरल्याने सुमारे २० कामगार अडकले. दुर्घटनेनंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले असून, रात्री ८.३० वाजेपर्यंत १६ कामगारांची सुरक्षित सुटका करण्यात आली होती. उर्वरित कामगारांचा शोध सुरू आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस, SDRF, NDRF, ITBP आणि लष्कराची पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. जखमी कामगारांना गोपेश्वर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी घटनेची माहिती घेत बचावकार्य युद्धपातळीवर राबवण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी गौरव कुमार घटनास्थळी उपस्थित राहून बचावकार्यावर लक्ष ठेवत आहेत.
बांगलादेशात रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद ;
भारताकडे मागितली मदत
बांगलादेश सध्या गंभीर ऊर्जा संकटाचा सामना करत असून अनेक भागांत मोठ्या प्रमाणावर वीज कपात केली जात आहे. ग्रामीण भागात तब्बल ८ ते १० तास लोडशेडिंग होत असल्याने नागरिक, शेतकरी आणि उद्योगांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वीज बचतीसाठी सरकारने शॉपिंग मॉल्स, दुकाने आणि बाजारपेठा रात्री ८ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या संकटावर मात करण्यासाठी बांगलादेशने भारताकडे अतिरिक्त डिझेल पुरवठ्याची मागणी केल्याची माहिती आहे. लोडशेडिंगमुळे संतप्त नागरिकांकडून काही ठिकाणी वीज केंद्रांवर तोडफोड आणि जाळपोळ झाल्याच्याही घटना समोर आल्या आहेत.
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका ;
पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं
ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी बांगलादेशने मोठा धक्का दिला. डार्विनमधील सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या १९८ धावांत आटोपला. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज हसन महमूदने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत ५५ धावांत ६ विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक ७१ धावा करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. प्रत्युत्तरात बांगलादेशने दिवसअखेर १ बाद ९६ धावा केल्या. तंजीद हसन ३२ आणि मोमिनुल हक ३५ धावांवर नाबाद होते. विशेष म्हणजे, बांगलादेशविरुद्ध ऑस्ट्रेलियाची ही आतापर्यंतची सर्वात कमी धावसंख्या ठरली आहे.
‘मुळशी पॅटर्न 2’ला मुळशीकरांचा विरोध;
तालुक्याची बदनामी होत असल्याचा आरोप Top 10 News :
दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या आगामी ‘मुळशी पॅटर्न 2’ या चित्रपटाच्या नावाला मुळशी तालुक्यातील नागरिकांनी विरोध केला आहे. चित्रपटाच्या नावामुळे मुळशीची ओळख गुन्हेगारी तालुका अशी निर्माण होत असल्याचा दावा नागरिकांनी केला. पौड येथे झालेल्या बैठकीत प्रत्येक गावातील ग्रामपंचायतींच्या माध्यमातून चित्रपटाच्या नावाला विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘मुळशी पॅटर्न’मुळे तालुक्याची प्रतिमा गुन्हेगारीशी जोडली गेल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. यामुळे स्थानिक युवकांच्या नोकरी, व्यवसाय आणि विवाहाच्या संधींवरही परिणाम होत असल्याचा दावा करण्यात आला. चित्रपटाचे नाव बदलण्याची मागणी प्रवीण तरडे यांच्यासह राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि महाराष्ट्र चित्रपट महामंडळाकडे करण्यात येणार आहे.





