Sukhbir Badal News : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला; मुख्यमंत्री फडणवीस यांचे चौकशीचे आदेश
शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये गुरद्वाराजवळ हल्ला करण्यात आला आहे.

Sukhbir Badal News – शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये गुरद्वाराजवळ हल्ला करण्यात आला आहे. या हल्यात बादल हे जखमी झाले आहेत. त्यानंतर बादल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेत आरोपीला तात्काळ अटक केली असून कोणत्या उद्देशाने हा हल्ला झाला, याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. बादल यांची प्रकृती चांगली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
एका निहंगने गुरुद्वारात बादल यांच्यावर कृपाणीने (वक्र पात्याची तलवार/खंजीर) हल्ला केला, असे नांदेडचे पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांनी सांगितले. बादल यांच्या हातावर दोन ते तीन टाके पडले आहेत. दुपारी १.४५ च्या सुमारास गुरुद्वारा माता साहिब देवान जी मुगत येथे बादल यांच्यावर हा हल्ला झाला.
नांदेडमधील तख्त श्री हजूर साहिब येथे सुखबीर सिंह बादल आणि त्यांची पत्नी खासदार हरसिमरत कौर बादल यांच्यासह काल गेले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बादल यांच्यावरील हल्ल्यासंदर्भात पोलीस अधीक्षकांकडून माहिती घेतली आहे.
याशिवाय फडणवीस यांनी बादल यांच्यासोबत फोनवर चर्चा केली असल्याची माहिती आहे. सुखबीर सिंग बादल यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी माहिती दिली आहे.
भोयर म्हणाले, घटना कदाचित आताच घडली असावी. मी पक्षाच्या बैठकीत भंडाऱ्यात उपस्थित होतो. घटनेची माहिती घेतली जाईल आणि संबंधितावर कडक कारवाई करण्यात येईल, अशी भूमिका भोयर यांनी मांडली.
दरम्यान, पंजाबमधील २००७ ते २०१७ या काळातील पक्षाच्या सत्तेदरम्यान झालेल्या चुकांसाठी अकाल तख्तने तनखा (धार्मिक शिक्षा) जाहीर केल्यानंतर, अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात सेवादार म्हणून सेवा बजावत असताना डिसेंबर २०२४ मध्ये बादल यांच्यावर झालेला हत्येचा प्रयत्नात ते थोडक्यात बचावले होते.





