Assam-Arunachal border : आसाम-अरुणाचल सीमेवर पुन्हा संघर्ष; पोलिसांकडून हवेत गोळीबार
अरुणाचल प्रदेशातील काही लोकांनी आसाममधील आंदोलकांवर दगडफेक केली. त्यात काही जण किरकोळ जखमी झाले.

Assam-Arunachal border – गुरुवारी आसामच्या धेमाजी जिल्ह्यात आसाम-अरुणाचल प्रदेश सीमेवर पुन्हा एकदा संघर्ष उफाळून आला. शेजारील राज्याविरुद्ध सुरू असलेल्या बेमुदत आर्थिक नाकेबंदीचा हा दुसरा दिवस होता. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी अरुणाचल प्रदेश पोलिसांनी हवेत तीन राऊंड गोळीबार केला.
हा संघर्ष शिलापाथर येथील लिकाबाली प्रवेशद्वारावर झाला. तिथे ताकम मिसिंग पोरिन केबांग आणि इतर स्थानिक गटांनी पुकारलेली नाकेबंदी आसाममधील आंदोलकांकडून राबवली जात होती.
नाकेबंदी सुरू असताना, अरुणाचल प्रदेशातील काही लोकांनी आसाममधील आंदोलकांवर दगडफेक केली. त्यात काही जण किरकोळ जखमी झाले. यामुळे दोन्ही बाजूंमध्ये झटापट झाली.
त्यानंतर, अरुणाचलच्या पोलिसांनी त्यांच्या बाजूच्या जमावाला नियंत्रित करण्यासाठी हवेत तीन राऊंड गोळीबार केल्याचे आम्ही पाहिले, असे आसाम सरकारच्या अधिकाऱ्याने सांगितले.
आंतरराज्य सीमेवर जमिनीवरील अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून अरुणाचल प्रदेशातील समाजकंटकांनी केलेल्या गोळीबारात आसाममधील १२ जण कथितरीत्या जखमी झाल्यानंतर, बुधवारी ही नाकेबंदी सुरू करण्यात आली होती.
अरुणाचल प्रदेशात ये-जा करणाऱ्या वाहनांना प्रवेशद्वारांवर रोखून धरले आहे. केवळ आपत्कालीन सेवा आणि शालेय वाहतुकीलाच परवानगी दिली जात आहे.
आसाम-अरुणाचल सीमावादाचे लवकरात लवकर निराकरण, गोळीबारात कथितरीत्या सहभागी असलेल्यांवर कारवाई आणि आसामच्या जमिनीवरील अतिक्रमण थांबवण्याची मागणी काही गट करत आहेत.





