Top 10 News: जरांगेंचा 11 सप्टेंबरचा अल्टिमेटम, फक्त हिंदूंच्या सणांमध्येच डीजे बंदी का? आणि Bigg Boss 20चं नवं घर आलं चर्चेत ,वाचा टॉप १० बातमी
Top 10 News: मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस असून, सरकारच्या शिष्टमंडळासोबत अडीच तास चर्चा झाली.

जरांगेंचा 11 सप्टेंबरचा अल्टिमेटम;
अंतरवालीत हायहोल्टेज ड्रामा
Top 10 News: मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस असून, सरकारच्या शिष्टमंडळासोबत अडीच तास चर्चा झाली. मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र, मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार जरांगेंनी व्यक्त केला. 11 सप्टेंबरपर्यंत सर्व मागण्यांची अंमलबजावणी करा, असा अल्टिमेटम त्यांनी सरकारला दिला. मागण्या मान्य झाल्यास 12 सप्टेंबरला गुलाल घेऊन मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, नोंदी सापडलेल्या मराठा बांधवांना 4 सप्टेंबरपासून जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे विखे-पाटील यांनी स्पष्ट केले.
वाढत्या महागाईने जनतेचं कंबरडे मोडले;
शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देश आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेवरून सरकारवर निशाणा साधला. वाढती महागाई आणि आर्थिक अडचणींमुळे सर्वसामान्य कुटुंबांचे बजेट कोलमडले असून, मूळ प्रश्नांवर चर्चा होऊ नये म्हणून सरकारकडून लोकांचे लक्ष विचलित केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. रुपयाची घसरण झाल्यास महागाई आणखी वाढेल, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. बारामतीत बोलताना पवारांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनासह विद्यार्थ्यांचे आंदोलन, साखरेचे वाढते दर आणि पावसामुळे निर्माण झालेल्या संकटावरही भाष्य केले. ऊस उत्पादकांना साखरेच्या वाढीव दराचा फायदा मिळावा आणि साखर आयातीला विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, तुकाराम मुंढे यांच्या कारवाईमुळे दुधातील भेसळ कमी झाल्याचेही पवार म्हणाले.
फक्त हिंदूंच्या सणांमध्येच डीजे बंदी का?
डीजे बंदीवर भाजपमध्येच मतभेद
नागपुरात डीजे बंदीवरून भाजपमध्येच मतभेद निर्माण झाले आहेत. मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांनी, फक्त हिंदूंच्या सणांमध्येच डीजे बंदी का?, असा सवाल करत पोलिसांची अधिसूचना मागे घेण्याची मागणी केली. ही बंदी 1 जानेवारी 2027 पासून सर्वांसाठी समान लागू करावी, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, भाजपचे माजी आमदार संदीप जोशी यांनी दटकेंच्या भूमिकेवर टीका केली. ‘एखाद्याने शेण खाल्ले म्हणून आपणही शेण खावे, ही भूमिका अयोग्य आहे,’ असे जोशी म्हणाले. पोलिसांच्या आदेशात गणेशोत्सव, ताजुद्दीन बाबा उत्सव आणि इतर समाजांच्या कार्यक्रमांनाही 1 नोव्हेंबरपर्यंत बंदी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
श्रीकृष्ण जन्माष्टमीला पावसाची हजेरी;
‘या’ जिल्ह्यांना झोडपून काढणार
राज्यात आज रात्री १२ वाजता जन्माष्टमीचा उत्सव साजरा होणार असून, श्रीकृष्णाच्या जन्मसोहळ्याला पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने आज विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि धुळे जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेश परिसरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील पावसाच्या स्थितीत बदल होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाप्रसाद,भंडाऱ्यासाठी परवानगी घ्यावी लागणार;
तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय Top 10 News:
सार्वजनिक ठिकाणी महाप्रसाद, भंडारा किंवा सामूहिक भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आता अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘स्टँडिंग ऑर्डर्स फॉर ऑल फेस्टिव्हल्स’ अंतर्गत हा निर्णय जाहीर केला आहे. केटररने स्वयंपाकासाठी लागणारा कच्चा माल कुठून खरेदी केला, याची माहितीही द्यावी लागणार आहे. सणांच्या काळात मिठाई, खवा, पनीर, तूप, सुकामेवा तसेच मांसाहारी पदार्थांमध्ये भेसळ रोखण्यासाठी वर्षभराचा ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. सणांचे राज्यव्यापी, प्रादेशिक आणि स्थानिक असे तीन स्तर करण्यात आले आहेत. सणाच्या 21 दिवस आधीपासून ते उत्सवानंतर 30 दिवसांपर्यंत तपासणी आणि कारवाई केली जाणार आहे.
तेलंगणाच्या वनमंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी;
रेवंत रेड्डींचा मोठा निर्णय!
तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी वनमंत्री कोंडा सुरेखा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली आहे. प्रदेश काँग्रेसच्या शिस्तपालन समितीच्या शिफारशीनंतर हा निर्णय घेण्यात आला. सुरेखा यांच्या मुलगी कोंडा सुष्मिता पटेल यांच्या रेवंत रेड्डी आणि त्यांच्या कुटुंबावरील वक्तव्यांनंतर काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाला होता. दरम्यान, नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष चिन्ना रेड्डी यांनाही पदावरून हटवण्यात आले असून, त्यांच्या जागी गडवाल विजयलक्ष्मी यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. सुरेखा यांनी पक्षाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत, आपले म्हणणे ऐकून घेतले गेले नसल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे तेलंगणा काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे.
‘डोकं फोडलं, तरी तुरुंगात गेलो नाही’;
हिंदुत्ववादी कार्यकर्त्याचा दावा
दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान एका आंदोलकाच्या वडिलांना मारहाण केल्याचा धक्कादायक दावा हिंदुत्ववादी कार्यकर्ता स्वतंत्र भारद्वाज याने केला आहे. पॉडकास्ट मुलाखतीत त्याने, “मी निशूच्या वडिलांचे डोके फोडले, तरी मला तुरुंगात जावे लागले नाही,” असा दावा केला. तसेच भाजप नेते कपिल मिश्रा, चिराग पासवान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आपल्याला पाठिंबा असल्याचेही त्याने म्हटले. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वाद निर्माण झाला आहे. मात्र, दिल्ली पोलिसांनी हे दावे फेटाळले आहेत. 23 जूनच्या घटनेत संजय कुमार यांच्या डोक्याला कड्यामुळे साधी दुखापत झाल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रकरणाचा तपास कायद्यानुसार सुरू असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
भारत-बेल्जियमचे 10 मोठे संरक्षण करार
करारामुळे पाकिस्तानला धक्का
भारत आणि बेल्जियममध्ये संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी सुमारे 10 महत्त्वाचे करार झाले आहेत. बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेव्हर यांच्या भारत दौऱ्यादरम्यान हे करार झाले. यात ड्रोन, काउंटर-ड्रोन, रडार, रॉकेट, दारुगोळा आणि सागरी सुरक्षेसाठीच्या तंत्रज्ञानाचा समावेश आहे. ‘जोरावर’ हलक्या रणगाड्यासाठी बेल्जियन 3105 बुर्जच्या उत्पादनावरही सहकार्य होणार आहे. थेल्स आणि कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टीम्स 70 मिमी रॉकेट भारतात तयार करणार आहेत. तसेच समुद्रातील खाणी शोधण्यासाठी रोबोटिक प्रणाली विकसित केली जाणार आहे. दारुगोळा निर्मितीसाठी भारतात प्लांट उभारण्याची योजना असून, त्याची वार्षिक क्षमता सुमारे 10 कोटी फेऱ्या असेल. त्यामुळे भारताच्या संरक्षण उत्पादनाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.
स्मृती मानधनाचा वर्ल्ड रेकॉर्ड!
विक्रमी शतक करणारी पहिली भारतीय खेळाडू
स्मृती मानधनाने महिला आशिया चषकात हाँगकाँग चीनविरुद्ध झंझावाती शतक ठोकत इतिहास रचला. तिने अवघ्या 57 चेंडूत शतक पूर्ण केलं आणि सामन्यात 124 धावांची विक्रमी खेळी साकारली. या खेळीत तिने 14 चौकार आणि 7 षटकार ठोकले. हे स्मृतीचं टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुसरं शतक असून, महिला आशिया चषकात शतक करणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली. या खेळीसह स्मृतीने महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा मिताली राजचा विक्रम मोडला. स्मृतीच्या एकूण आंतरराष्ट्रीय धावा 10,879 झाल्या असून, ती या यादीत अव्वल स्थानी पोहोचली आहे.
Bigg Boss 20चं नवं घर आलं चर्चेत!
यंदाची थीम मागील सीझन्सपेक्षा हटके Top 10 News:
सलमान खानचा बहुचर्चित रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 20’चा प्रीमियर 6 सप्टेंबरला होणार आहे. शो सुरू होण्यापूर्वीच नव्या घराची झलक समोर आली असून, यंदाची थीम मागील सीझन्सपेक्षा हटके आहे. रंगीबेरंगी सजावट, मोठ्या आकाराच्या कल्पक डिझाइन्स आणि फँटसी एलिमेंट्समुळे घराला स्वप्नवत रूप देण्यात आलं आहे. मोठा टी-पॉट, ऑक्टोपस, बुद्धिबळाच्या सोंगट्या आणि हॉट-एअर बलून यांसारख्या आकर्षक गोष्टी घरात पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे ‘रूम नंबर 20’नं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या खोलीत नेमकं काय आहे, याचं गुपित अद्याप कायम आहे. डिझायनर वर्षा जैन यांनी हे अनोखं डिझाइन साकारलं आहे.





