Top 10 News: 25,000 कार्यकर्त्यांनी हाती घेतला धनुष्यबाण , महाराष्ट्राला पुढील ५ दिवस पावसाचा इशारा आणि ‘द महाराष्ट्र फाईल्स’ला सेन्सॉर बोर्डाकडून कात्री, वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News: राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार गटासह महाविकासआघाडीला मोठा हादरा बसलाय.

सर्वात मोठा पक्षप्रवेश;
25,000 कार्यकर्त्यांनी हाती घेतला धनुष्यबाण
Top 10 News: राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार गटासह महाविकासआघाडीला मोठा हादरा बसलाय. एकनाथ शिंदे आगामी काळासाठी संपूर्ण महाराष्ट्रात मोठी ताकद लावत असून, लातूर जिल्ह्यात पक्षाने आपले पूर्ण लक्ष केंद्रित केलंय. लातूरच्या अहमदपुरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यकर्ता मेळाव्यात 25 हजारहून अधिक कार्यकर्त्यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला असून हा आता पर्यंतचा सर्वात मोठा आणि ऐतिहासिक पक्षप्रवेश मानला जातोय. या मेळाव्यातून विरोधकांवर कडाडून टीका करताना आमचा अजेंडा खुर्ची नसून जनतेची सेवा हाच आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यासोबतच मेळाव्यात बोलताना शिंदेनी,”विरोधकांच्या डोळ्यात जर कचरा गेला असेल, तर त्यांनी अहमदपूरमध्ये येऊन हा जनसागर पाहावा. ही लोकं कोणत्याही लालसेने नव्हे, तर शिवसेनेच्या प्रेमापोटी गोळा झालीयेत. आज सर्वत्र शिवसेनेला भरभरून प्रेम मिळत असल्याचं त्यांनी म्हटलं.
पुण्यात २४ तासांत ८ जणांचा संशयास्पद मृत्यू;
दोन सख्ख्या भावांचाही समावेश
पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरव आणि फुगेवाडी परिसरावर गेल्या दोन दिवसांपासून जणू मृत्यूचे सावट पसरले आहे. मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या दुर्दैवी घटनांच्या सत्रामुळे अवघ्या काही तासांत आठ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. २ जणांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. एकापाठोपाठ झालेल्या या मृत्यूंमुळे संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला असून नागरिकांमध्ये कमालीचा धक्का आणि भीतीचे वातावरण आहे. सध्या पोलीस आणि स्थानिक प्रशासन या मृत्यूंमागच्या कारणांचा शोध घेत असून, परिसरात शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या सामूहिक मृत्यूंमागे अवैध आणि बंदी असलेली हातभट्टीची गावठी (विषारी दारू) कारणीभूत असल्याचा थेट आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
नीट पेपरफुटीचा आणखी एक बळी
नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर याचे गंभीर परिणाम आता समोर येत आहेत. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील गोदावरी तांडा येथील प्रथमेश मोहन राठोड या 19 वर्षीय तरुणाने नीट परीक्षेत पास होईल का? या विवंचनेत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेनंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या आठवणीत हंबरडा फोडलाय. पेपर फुटल्यानंतर आता कसे होईल? असे तो म्हणत होता, असे त्याच्या कुटुंबियांने सांगितले. प्रथमेश नांदेड येथे नीटची तयारी करीत होता. चार दिवसापूर्वी तो गावाकडे आला होता. बुधवारी रात्री जेवण करून झोपल्यानंतर त्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचं सांगण्यात येतंय. दरम्यान, पोटच्या मुलानं असं टोकाचं पाऊल उचलल्याने सर्व राठोड कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मान्सून २ दिवसांत धडकणार!
महाराष्ट्राला पुढील ५ दिवस पावसाचा इशारा
ज्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले असताना मान्सूनची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. केरळमध्ये मान्सून पुढील २ ते ३ दिवसांत दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पुढील काही दिवसांमध्ये विदर्भातील उष्णतेची लाट कमी होण्याचे संकेत आहेत. आज विदर्भातील वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांत उष्ण लाट, तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. तसेच पुढील ५ दिवस राज्यात पावसाची शक्यता असून माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान तयार होत आहे.मान्सूनचाप्रवास कालपर्यंत लक्षद्वीपपर्यंत पोहोचला होता. मात्र आज त्याची पुढील वाटचाल थोडी मंदावली. तरीदेखील अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार झाले असून पुढील २ ते ३ दिवसांत तो आणखी पुढे सरकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
इन्स्टाची ‘क्वीन रील स्टार’ चक्क चोरटी निघाली Top 10 News:
नीट घोटाळ्यातील आरोपी शिवराज मोटेगावकरच्या कारनाम्याची चर्चा देशात सुरु असतानाच आता लातूर जिल्ह्यात पुन्हा एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी हजारो इन्स्टाग्राम फॉलोअर्स असलेल्या 19 वर्षीय तरुणीला तांब्याची तार चोरल्याच्या आरोपाखाली अटक केली. प्रिया जितेंद्र कांबळे असं आरोपीचं नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रिया ‘क्वीन रील स्टार’ या नावाने इन्स्टाग्रामवर सक्रिय होती. तिच्या अटकेमुळे परिसरात चर्चा सुरू झाली आहे. बांधकाम साईटवरून तांब्याची तार चोरुन भंगार विक्रेत्याला विकून त्यातून ती पैसे कमावत असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. दरम्यन , आरोपीने किती वेळा चोऱ्या केल्या आणि यात इतर कोणी सामील होते का, याचा तपास पोलीस आता करत आहेत.
कॉक्रोच जनता पार्टीला अर्बन नक्षलवाद्यांचा छुपा पाठिंबा?
गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडिया आणि राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेचा विषय असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीवर आता अप्रत्यक्षपणे एक गंभीर आरोप करण्यात आला आहे. अभिजीत दिपके यांनी सुरु केलेल्या कॉक्रोच जनता पार्टीचे थेट शहरी नक्षलवाद्यांशी लागेबांधे असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलील, नक्षलविरोधी विभाग आणि गुप्तचर संघटनांना तसा संशय असल्याने त्यादृष्टीने तपासणी सुरु असल्याची माहिती आहे. तरुणांची माथी भडकवण्याच्या आणि स्थापित व्यवस्थेविरोधात बंड उभारण्याच्या आपल्या जुन्या हेतूला साध्य करण्याचा यातून प्रयत्न करण्यात येत असून नक्षलवाद्यांच्या युनायटेड फ्रंट मधील काही नेते सध्या सक्रियतेने या पार्टीचा प्रोपोगंडा वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याच यंत्रणांच्या लक्षात आल्याचं महाराष्ट्राच्या नक्षल विरोधी अभियानाचे प्रमुख आणि स्पेशल आयजी संदीप पाटील यांनी म्हटलंय.
फेसबुक-इन्स्टासाठी पैसे मोजावे लागणार?
सोशल मीडिया युजर्सना मोठा धक्का
आवडत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करण्यासाठी तुमच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. कारण,मेटा कंपनी आता आपल्या सगळ्याच लोकप्रिय अँप्सचे ‘प्लस’ व्हर्जन लॉन्च करत आहे. यामध्ये पैसे देणाऱ्या युजर्सना काही खास टूल्स आणि कस्टमायझेशन फीचर्स मिळतील. मात्र जे युसर्ज मोफत व्हर्जन वापरत आहेत, त्यांना खास कस्टमायिझ फीचर्स मिळणार नाहीत. ‘इंस्टाग्राम प्लस’ आणि ‘फेसबुक प्लस’साठी युजर्सना दरमहा भारतीय चलनानुसार सुमारे ३८७ रुपये मोजावे लागतील. तर ‘वॉट्सॲप प्लस’साठी दरमहा सुमारे २९० रुपये द्यावे लागतील. दरम्यान, मेटाने अद्याप भारतासाठीच्या अधिकृत किंमती जाहीर केल्या नसून, त्या लवकरच समोर येतील.
अमेरिका आणि इराण 60 दिवसांच्या युद्धविरामासाठी सहमत
अमेरिका आणि इराण 60 दिवसांच्या युद्धविराम करारावर सहमत झाले आहेत. ॲक्सिऑसच्या अहवालानुसार, केवळ अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अंतिम मंजुरी बाकी आहे. दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करारावर (एमओयू) सहमती झाली आहे. अहवालात म्हटले आहे की, करारावर निर्णय घेण्यासाठी ट्रम्प यांनी काही दिवसांची मुदत मागितली आहे. इराणने अद्याप याला अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही. प्रस्तावित करारानुसार, होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये सागरी वाहतूक विनाअडथळा सुरू राहील. इराणला 30 दिवसांच्या आत सागरी सुरुंग हटवावे लागतील आणि जहाजांकडून टोल आकारला जाणार नाही. बदल्यात, अमेरिका आपली सागरी नाकेबंदी हळूहळू उठवेल आणि इराणच्या तेल विक्रीवरील काही निर्बंध शिथिल करण्यावर चर्चा करेल. या करारामध्ये इराणने अण्वस्त्रे विकसित न करण्याचे वचन देण्याचाही समावेश आहे. सुरुवातीचे 60 दिवस उच्च संवर्धित युरेनियम आणि युरेनियम संवर्धनावरील चर्चेवर लक्ष केंद्रित करतील.
हार्दिक पंड्याचं इन्स्टा अकाउंट अचानक गायब!
मुंबई इंडियन्स सोडणार की ट्रोलिंगला कंटाळला?
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या सध्या मैदानाबाहेरही मोठ्या वादात सापडला आहे. हार्दिकचे इन्स्टा अकाउंट अचानक दिसेनासे झाल्याने सोशल मीडियावरील क्रिकेट चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली. अनेक युजर्सना त्याच्या प्रोफाईलवर ‘युझर नॉट फाऊंड’ असा मेसेज दिसला, तर काहींना त्याचे प्रोफाईल फोटो आणि पोस्ट्स गायब असल्याचे दिसले. या घटनेनंतर हार्दिकने अकाउंट डिलीट किंवा डीएक्टिव्हेट केल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या, मात्र काही तासांनंतर त्याचे अकाउंट पूर्ववत झाले.हार्दिक पंड्यासोबत घडलेली ही घटना अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२६ मध्ये अत्यंत निराशाजनक प्रदर्शन केले.
‘द महाराष्ट्र फाईल्स’ला सेन्सॉर बोर्डाकडून कात्री;
रिलीजच्या १ दिवसाआधी प्रदर्शनाची तारीख बदलली Top 10 News:
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला ‘द महाराष्ट्र फाईल्स’ या सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. येत्या २९ मे रोजी प्रदर्शित होणारा ‘द महाराष्ट्र फाईल्स’ हा सिनेमा सेन्सॉर बोर्डाच्या विलंबामुळे आता या दिवशी प्रदर्शित होणार नसल्याचं समोर आलंय. मात्र लवकरच नव्या तारखेसह हा सिनेमा रसिकांच्या भेटीस येणार आहे. सेन्सॉर बोर्डाच्या विलंबामुळे चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर गेल्याने निर्मात्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. बंजारा समाजाच्या न्यायासाठी लढणारा हा सिनेमा असून याच्या प्रदर्शनाच्या तारखेकडे आता प्रेक्षकांचेही लक्ष लागून राहणार आहे. चित्रपटाची टीम आलेल्या अडथळ्यावर काम करत असून लवकरच प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर करतील.





