Top 10 news : १ . राज्यातील गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार गरीब शेतकऱ्यांची सरकारकडून कर्जमाफी केली जाणार आहे. शेतकरी कर्जमाफीचा दिलेला शब्द सरकार नक्की पाळेल, असा ठाम विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. फार्महाऊसधारक किंवा धनदांडग्या शेतकऱ्यांचा विचार न करता, वर्षानुवर्षे शेतात राबणाऱ्या गरीब शेतकऱ्यांसाठीच कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल,असंही त्यांनी स्पष्ट केलं. कर्जावर व्याज आणि व्याजावर व्याज वाढत असल्यामुळ शेतकरी आत्महत्येचा विचार करतो, मात्र अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना एकटे सोडणार नाही. गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकार करणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितले. पुढील काळात शेतकऱ्यांना कर्ज घ्यावं लागू नये, असा विचारही सरकार करत असल्याचं त्यांनी म्हटलं. २ . अजित पवारांची ओळख घड्याळामुळे नव्हे तर ‘या’ गोष्टीमुळे पटली बारामतीमधील विमान अपघाताच्या घटनेनंतर अजित पवार यांची ओळख नेमकी कशी पटली, याबाबत आता एक मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर येतीय. वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला अजित पवारांची ओळख त्यांच्या हातातील घड्याळामुळे पटली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. पण आता नवीनच माहिती समोर येतीय. विमान अमघातानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांची ओळख त्यांच्या हातावरील कुर्त्याच्या कापड्यामुळे पटल्याचं समोर आलंय… समोर आलेल्या माहितीनुसार, त्यांच्या उजव्या हातावरील कुर्त्याच्या कापडामुळे त्यांची प्रथम दर्शनी ओळख पटली. प्रत्यक्षात त्यांच्या डाव्या हातावर जे घड्याळासारखे दिसत होते, तो त्यांच्या शर्टचाच एक भाग होता. धक्कादायक बाब म्हणजे, मृत्यूनंतर आतापर्यंत अजित पवारांचं घड्याळ पडलेलेलं नाही. केवळ कापडावरून झालेली ही ओळख प्राथमिक होती. त्यामुळं या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन आणि पूर्णपणे खात्री पटवण्यासाठी प्रशासनाकडून DNA चाचणी करण्यात आली. ३ . ‘लाडकी बहिण योजनेला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नाव द्या महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने’ला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नाव देण्याची मोठी मागणी आमदार अमोल मिटकरींनी केलीये. अजितदादांच्या दुरदृष्टीतून आलेल्या या योजनेला ‘अजितदादांची लाडकी बहिण योजना’ असं नाव देत त्यांच्या स्मृती सरकारने वेगळ्या पद्धतीने जपाव्यात, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केलीये. अजितदादांना ही सरकार आणि राज्यभरातील लाडक्या बहिणींची ही आगळीवेगळी आदरांजली ठरणार असल्याचं आमदार अमोल मिटकरी म्हणालेत. दरम्यान , त्यांच्या या मागणीवर आता सरकारकडून काय निर्णय घेण्यात येतो हे पाहणं गरजेचं आहे. ४ . एकनाथ शिंदेंचे सत्ता स्थापनेतही लाडक्या बहिणींना प्राधान्य महापालिका निवडणूक पार पडल्यानंतर आता राज्यात महापौर निवडीची प्रक्रिया सर्व ठिकाणी सुरू असून ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या असलेल्या ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकेमध्ये यंदा अनपेक्षित पद्धतीने महिलाराज येणार आहे. महापौरपदासाठी महिला आरक्षण नसतानाही शिवसेनेचे पक्षनेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील लाडक्या बहिणींवर जबाबदारी देत इथे विश्वास दाखवलाय. ठाण्यातून शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड, कल्याण डोंबिवलीत हर्षाली चौधरी आणि उल्हासनगर याठिकाणी अश्विनी निकम यांची महापौरपदी वर्णी लागणार आहे. त्यामुळे, सत्ता स्थापनेतही लाडक्या बहिणींना प्राधान्य देत एकनाथ शिंदेंनी महिलांचे हात बळकट केलेत. ५ . सुनेत्रा पवारांची मंत्रालयात उपस्थितीची तारीख ठरली Top 10 news : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानं राष्ट्रवादीसह राज्याच्या राजकारणातही मोठा बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. दुसरीकडे पवार कुटुंबीय देखील दु:खातून सावरत राजकीय पाऊले टाकत आहेत. अजित पवारांचे दु:खद निधन आणि राज्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजची मंत्रिमंडळ बैठक होणार नाही. त्यामुळे, या बैठकीला नवनिर्वाचित उपमु्ख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहतील काय, या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. सुनेत्रा पवार पुढील दोन दिवस पुणे जिल्ह्यात दौरा करणार आहेत. तर, 9 फेब्रुवारी रोजी मंत्रालयात उपस्थिती लावणार असल्याचं सांगण्यात येतंय. ६ . दोन कोटी नागरिकांचा आरक्षणाचा मार्ग मोकळा? मराठा आरक्षणाच्या लढ्यात कागदोपत्री पुराव्यांच्या आधारे एक मोठं यश राज्य सरकारला मिळालंय. हैदराबाद गॅझेटिअर आणि निजामकालीन ऐतिहासिक कागदपत्रांच्या सखोल तपासणीनंतर राज्यभरात आतापर्यंत 58 लाख 89 हजार 641 मराठा-कुणबी नोंदी शोधण्यात समितीला यश आलंय. या नोंदींमुळे राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाचं समीकरण पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झालीय. समितीनं स्पष्ट केलंय कि, शोधलेल्या या 58 लाख नोंदी केवळ वैयक्तिक नसून त्या कौटुंबिक स्वरूपाच्या आहेत. नियमानुसार, एका व्यक्तीची कुणबी नोंद सापडल्यास त्याच्या कुटुंबातील सरासरी 4 व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतं. या हिशोबानं राज्यातील सुमारे 2 कोटींहून अधिक मराठा समाजातील नागरिकांना कुणबी प्रमाणपत्राचा थेट लाभ मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येतीय. ७ . सरपंचपदाची निवडणूक लढण्यासाठी बापानेच चिमुकलीला संपवलं सरपंचपदाची निवडणूक लढण्यासाठी नांदेडमध्ये एका जन्मदात्या पित्याने आपल्या सात वर्षाच्या मुलीला तेलगंणा राज्यात नेऊन कॅनॉलमध्ये फेकून देऊन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. पांडुरंग कोंडामंगले अस आरोपी पित्याचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुखेड तालुक्यातील रहिवासी असलेल्या आरोपी पित्याला ताब्यात घेतलय. हत्येचं कारण अद्याप ही अस्पष्ट आहे. मात्र, आरोपीला तीन अपत्य आहेत. त्याला गावातील सरपंचपदाची निवडणूक लढवायची होती. मात्र, महाराष्ट्रात तीन किंवा त्यापेक्षा जास्त अपत्ये असणाऱ्यांना निवडणूक लढवता येत नाही, असा नियम आहे. निवडणुकीत अडथळा होऊ नये या कारणातून पित्यानं मुलीची हत्या केल्याची चर्चा मुखेड तालुक्यात सुरु आहे. ८ . “आमच्या नादाला लागण्याआधी…एकदा होळकरशाही आठवा” भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे त्यांच्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. मात्र, आता त्यांनी आपला एक वेगळा पैलू जनतेसमोर आणलाय. सध्या ते एका जबरदस्त गाण्यामुळे चर्चेत आलेत, 2 फेब्रुवारी रोजी त्यांचं नवीन गाणं प्रदर्शित झालंय. “आमच्या नादाला लागण्याआधी… एकदा होळकरशाही आठवा” असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याची निर्मिती अत्यंत भव्य दिव्य पद्धतीनं करण्यात आली असून यात पडळकर स्वतः मुख्य भूमिकेत दिसत आहेत. गाण्याचं लेखन सचिन माळी यांनी केले असून गाणं मिलिंद शिंदे यांनी गायलंय. तर मिलिंद शिंदे, शीतल साठे आणि अनिकेत मोहिते यांनी या गाण्याला संगीत दिलंय. गाण्यातील नृत्य, कला दिग्दर्शन आणि गोपीचंद पडळकर यांचा पडद्यावरील वावर एखाद्या व्यावसायिक अभिनेत्याला टक्कर देणारा असल्याच चाहते म्हणत आहेत. गाणे रिलीज झाल्यापासून अवघ्या 24 तासांत याला दीड लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. कमेंट बॉक्समध्ये समर्थकांनी कौतुकाचा वर्षाव केलाय. ९ . देशातील सर्वात महागडी नंबरप्लेट प्रत्येकाला काही न काही गोष्टींचा छंद असतो.याच छंदातून एका व्यक्तीने देशातील सर्वात महागडी गाडीची नंबरप्लेट विकत घेतली आहे. आंध्र प्रदेशातील एका वाहनधारकाने आपल्या कारला सर्वात महागडी नंबरप्लेट बसवून घेतली आहे. या व्यक्तीच्या कारच्या नंबरप्लेटची किंमत २ कोटी रुपये आहे.या कारचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या कारचा नंबर DDC 001 आहे. ही देशातील सर्वात महाग नंबरप्लेट आहे. लक्झरी युज्ड कारचे लोकप्रिय शोरुम Big Boy Toyz नं नवीन वेंचर ऑक्शन हाउस सुरु केले आहे. हे भारतातील असे प्लॅटफॉर्म आहे जिथे महागडे आणि लक्झरी गोष्टींचा लिलाव होतो. यावेळी या इव्हेंटमध्ये एक नवीन रेकॉर्ड बनवला आहे. या लिलावात DDC 001 नंबरप्लेट २ कोटी रुपयांना विकली गेली आहे.आंध्र प्रदेशमधील गुंटूर येथील किरण कोलापाकुला यांनी या कारसाठी बोली लावली होती. भारताच्या इतिहासातील ही सर्वाधिक महागडी नंबरप्लेट आहे. १ ० . भारतावरील टॅरिफ 25 वरुन 18 टक्क्यांवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून संवाद साधल्यानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराची घोषणा केली. या करारानुसार, अमेरिका भारतावरील कर 25 टक्क्यांवरून 18 टक्क्यांपर्यंत कमी करणार असल्याच जाहीर केलंय. दोन्ही नेत्यांनी व्यापारासह विविध मुद्द्यांवर चर्चा केली. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींशी झालेल्या संभाषणाबाबत त्यांच्या ट्विटर अकाउंटवर एक सविस्तर निवेदन प्रसिद्ध केलं. त्यात ट्रम्प यांनी, “आज सकाळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलणे हा सन्मान होता. ते माझे सर्वात चांगले मित्र आहेत आणि त्यांच्या देशातील एक शक्तिशाली आणि आदरणीय नेते आहेत.” असं म्हटलं, दरम्यान, या घडामोडीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे शुल्क कमी केल्याबद्दल आभार मानले.