Chandrashekhar Bawankule : शेतकरी कर्जमाफीबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान; ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार लाभ? नेमकं काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : धाराशिव येथील आयोजित एका सभेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकरी कर्जमाफीवर भाष्य करताना मोठी घोषणा केली आहे.

Chandrashekhar Bawankule : राज्यात सध्या जिल्हा परिषद निवडणुकांची धामधूम सुरू आहे. दोन दिवसांत प्रचारतोफा थंडावणार आहेत. अशातच धाराशिव जिल्ह्यातील एका जाहीर सभेत भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकरी कर्जमाफीवर भाष्य करत मोठं विधान केले आहे. त्यामुळे लवकरच कर्जमाफी महायुती सरकार जाहीर करणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गरीब शेतकऱ्यांची सरकारकडून कर्जमाफी केली जाणार आहे. शेतकरी कर्जमाफीचा दिलेला शब्द सरकार नक्की पाळेल, असे मोठं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. धाराशिव जिल्ह्यातील येणेगुर येथे त्यांनी हे वक्तव्य केले आहे. पुढील काळात शेतकऱ्यांना कर्ज घ्यावं लागू नये, असा विचारही सरकार करत असल्याचे बावनकुळे म्हणाले आहेत.
त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय महायुती सरकारकडून घेतला जाणार असल्याची आशा निर्माण झाली असून, फार्महाऊसधारक किंवा धनदांडग्या शेतकऱ्यांचा विचार न करता, वर्षानुवर्षे शेतात राबणाऱ्या गरीब शेतकऱ्यांसाठीच कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलताना स्पष्ट केले आहे.
कर्जावर व्याज आणि व्याजावर व्याज वाढत असल्यामुळे शेतकरी आत्महत्येचा विचार करतो, मात्र अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना एकटे सोडणार नाही, असा शब्द चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. त्यामुळे आता राज्य सरकार कर्जमाफीच्या निर्णयाची घोषणा कधी करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यामध्ये त्यांनी फक्त गरीब शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी मिळेल, असे म्हटले आहे. त्यामुळे यासाठी कोणते निकष लावले जाणार याची स्पष्टता करण्यात आलेली नाही.
लाडकी बहीण योजना सुरूच राहणार
विरोधकांकडून महायुती सरकारने जाहीर केलेली लाडकी बहीण योजना बंद होण्याचा सूर आवळला जात असून, यावर देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले काँग्रेस देशातील भाजपशासित राज्यांमध्ये मात्र ही योजना सुरू असून, महाराष्ट्रातही नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना सुरूच राहील, असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले आहे.





