Top 10 News : एफडीएचा पुण्यात मोठा दणका ते अभिजीत दिपकेंवर शाईफेक..; वाचा आजच्या दहा टॉप बातम्या
Top 10 News : एफडीएचा पुण्यात मोठा दणका ते अभिजीत दिपकेंवर शाईफेक..; वाचा आजच्या दहा टॉप बातम्या

Top 10 News : 1) एफडीएचा पुण्यात मोठा दणका! १० हॉटेल, बेकरी, डेअरींचे परवाने निलंबित
पुणे विभागात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत मोठी कारवाई केलीय. १६ आणि १७ जुलै रोजी झालेल्या विशेष तपासणीत अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने १० हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी आणि डेअरींचे परवाने तत्काळ निलंबित करण्यात आले. पुण्यातील स्टार केटरिंग, अशोक बार अँड रेस्टॉरंट, गोल्डन बेकरी, विकिंग बिर्याणी, सिद्धार्थ ॲग्रो डेअरीसह सांगली, सातारा आणि कोल्हापूरमधील आस्थापनांवरही कारवाई झाली. एफडीएने अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देत ग्राहकांना तक्रारींसाठी टोल-फ्री क्रमांक 1800222365 वर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. नियमभंग करणाऱ्यांवर पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिलाय. (Top 10 News)
2) सुप्रिया सुळेंना ‘व्हॉइस रेस्ट’; पुढील दोन आठवडे भाषण-मुलाखती बंद
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या आरोग्याबाबत मोठी माहिती समोर आलीय. घशाला सूज आल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना पूर्णपणे ‘व्हॉइस रेस्ट’ घेण्याचा सल्ला दिलाय. त्यामुळे पुढील एक ते दोन आठवडे त्या भाषणे, मुलाखती आणि दीर्घकाळ बोलणे टाळणार आहेत. सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, डॉ. मिलिंद कीर्तने यांनी तपासणीनंतर व्हॉइस थेरपीचा सल्ला दिलाय. 20 जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असल्याने पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी इतर खासदारांवर येण्याची शक्यता आहे. शुक्रवारी त्यांनी दिल्लीत सोनम वांगचुक यांच्या आंदोलनालाही भेट देऊन पाठिंबा दर्शवला होता. (Top 10 News)
3) अचानक विहिरीतून यायला लागलं गरम पाणी, अकोल्यात भीतीचे वातावरण
अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील आलेगाव येथे एका खासगी विहिरीतील पाणी सलग तीन दिवसांपासून उबदार लागत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केलाय. ही विहीर पिण्यासाठी आणि घरगुती वापरासाठी असून, पाणी उपसल्यानंतर झऱ्यातून पुन्हा येणारे पाणीही गरम असल्याचे विहीर मालक अरुण मूर्तडकर यांनी सांगितले. या घटनेची माहिती पसरताच अनेक नागरिकांनी विहिरीवर गर्दी केली. ग्रामस्थांनी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा (GSDA) आणि आरोग्य विभागाने तातडीने तपासणी करून पाण्याचे तापमान, गुणवत्ता आणि भूगर्भीय कारणांचा शोध घ्यावा, अशी मागणी केलीय. तज्ज्ञांच्या मते, भूगर्भातील उष्णता, खनिजांचे प्रमाण किंवा भूगर्भीय बदलांमुळे अशी घटना घडू शकते. मात्र, नेमके कारण शास्त्रीय तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे. (Top 10 News)
4) आंदोलक अभिजीत दिपकेंवर शाईफेक, अर्वाच्य भाषेत शिवीगाळही
दिल्लीतील जंतर-मंतर येथे केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मराठी तरुण अभिजीत दीपके यांच्यावर अज्ञात महिलेने शाई फेकून हल्ला केला. शाईफेक करताना तिने अर्वाच्य भाषेत शिवीगाळही केली. प्राथमिक माहितीनुसार, आंदोलक सोनम वांगचुक यांची प्रकृती बिघडून त्यांना रुग्णालयात हलवण्यात आल्यानंतर संतप्त झालेल्या महिलेने आंदोलनकर्त्यांनाच जबाबदार धरत हा प्रकार केला. घटनेनंतर काही काळ तणाव निर्माण झाला होता. सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून संबंधित महिलेला ताब्यात घेतले असून, आंदोलनस्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. (Top 10 News)
05) अभिषेक बॅनर्जींच्या ५ मजली कार्यालयावर बुलडोझर; बंगालमध्ये खळबळ
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसलाय. खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्याशी संबंधित अमताला येथील पाच मजली पक्ष कार्यालयावर प्रशासनाने बुलडोझर कारवाई केलीय. बांधकाम नियमांचे उल्लंघन करून इमारत उभारल्याचा आरोप करत ही कारवाई करण्यात आली. दोन जेसीबी, मोठा पोलीस बंदोबस्त आणि केंद्रीय सुरक्षा दलाच्या उपस्थितीत बांधकाम पाडण्यात आले. प्रशासनाने यापूर्वी दोन नोटिसा बजावल्या होत्या, मात्र प्रतिसाद न मिळाल्याचा दावा केलाय. दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर पक्षातील फूट, आर्थिक व्यवहारांवरील निर्बंध आणि आता कार्यालयावरील कारवाईमुळे ममता बॅनर्जी यांच्या अडचणी आणखी वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. (Top 10 News)
06) होर्मुजमध्ये 2 तेल टँकरमध्ये स्फोट; इराणचा दावा
इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) होर्मुज सामुद्रधुनीत दोन तेलटँकर समुद्री सुरुंगांना धडकून स्फोट झाल्याचा दावा केलाय. मात्र, अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) हा दावा पूर्णपणे फेटाळत तो खोटा असल्याचे म्हटलेय. दरम्यान, अमेरिकेने सलग सातव्या रात्री इराणवरील हवाई हल्ले सुरू ठेवत लष्करी तळ, शस्त्रसाठे आणि सागरी क्षमतांना लक्ष्य केले. इराणने इशारा दिला आहे की, जमिनीवरून हल्ला झाल्यास कुवेत आणि बहरीनमधील अमेरिकन तळांवर प्रत्युत्तरात्मक कारवाई केली जाईल. चाबहार बंदरातील कंट्रोल टॉवरचे नुकसान झाल्याचे वृत्त असले तरी भारताशी संबंधित शाहिद बेहेश्ती टर्मिनल सुरक्षित असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलेय. युद्धामुळे मध्यपूर्वेतील तणाव आणखी वाढला आहे. (Top 10 News)
07) Royal Enfield Classic 350 झाली आणखी स्मार्ट! नव्या फीचर्ससह मिळणार जबरदस्त राइडिंग अनुभव
रॉयल एनफिल्डने 2026 ची Classic 350 नव्या फीचर्ससह सादर केली आहे. ड्युअल-चॅनेल ABS व्हेरिएंटमध्ये आता Assist & Slipper Clutch आणि USB Type-C फास्ट चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे. स्लिपर क्लचमुळे शहरातील ट्रॅफिकमध्ये क्लच वापरणे अधिक सोपे होणार असून डाउनशिफ्टवेळी बाईकवर चांगले नियंत्रण मिळेल. नव्या Type-C पोर्टमुळे प्रवासादरम्यान मोबाईल चार्ज करणेही अधिक सोयीचे होईल. बेस सिंगल-चॅनेल ABS व्हेरिएंटमध्ये हे फीचर्स उपलब्ध नसतील. बाईकमध्ये पूर्वीचेच 349cc J-Series इंजिन कायम ठेवण्यात आले असून ते 20.2 bhp पॉवर आणि 27 Nm टॉर्क निर्माण करते. किंमत 1.87 लाख रुपयांपासून सुरू होत असून टॉप व्हेरिएंटची किंमत 2.24 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. (Top 10 News)
08) ॲपल बॅक टू स्कूल सेल सुरू, एअरपॉड प्रो आणि पेन्सिल प्रो मिळवा मोफत
विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी Apple ने ‘Back to School’ सेल सुरू केला असून 16 जुलै ते 27 ऑगस्ट 2026 दरम्यान आकर्षक ऑफर्स उपलब्ध आहेत. या ऑफरमध्ये निवडक MacBook खरेदीवर AirPods 4 किंवा AirTag 4 मोफत, तर iPad Air किंवा iPad Pro खरेदीवर Apple Pencil Pro मोफत दिली जात आहे. शैक्षणिक सवलतीमुळे MacBook Air M5 ची किंमत ₹1,37,900, तर MacBook Pro M5 ₹2,27,900 पासून उपलब्ध आहे. iPad Air M4 ₹83,900 आणि iPad Pro M5 ₹1,27,900 पासून मिळणार आहे. ANC AirPods किंवा AirPods Pro 3 साठी अतिरिक्त रक्कम भरून अपग्रेडचा पर्यायही उपलब्ध आहे. ऑफरचा लाभ घेण्यासाठी पात्रता Apple च्या अधिकृत वेबसाइट किंवा रिटेल स्टोअरमध्ये तपासता येणार आहे. (Top 10 News)
09) सलमाननंतर आमिर खानलाही धमकी; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
बॉलिवूड अभिनेता आमिर खान यांना लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने कथित धमकी देण्यात आल्याची चर्चा रंगलीय. सोशल मीडियावर अर्जू बिश्नोई आणि टायसन बिश्नोई यांच्या नावाने व्हायरल झालेल्या पोस्ट आणि ऑडिओ क्लिपमध्ये आमिर खान यांच्यावर ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करण्यात आलाय. मात्र, या पोस्ट आणि ऑडिओची अधिकृत पुष्टी झालेली नाही. मुंबई पोलिसांनीही अद्याप आमिर खान किंवा त्यांच्या टीमकडून कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नसल्याचे सांगितले असून, माध्यमांतून समोर आलेल्या माहितीची पडताळणी सुरू आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी आमिर खान यांनी आपल्या विवाहांबाबत स्पष्टीकरण देत, सर्व विवाह विशेष विवाह कायद्यांतर्गत झाले असून कोणत्याही पत्नीने धर्मांतर केले नसल्याचे स्पष्ट केले होते. (Top 10 News)
10) रोहित शर्माच्या निवृत्तीच्या अफवांना पूर्णविराम; लॉर्ड्सवर शेवटचा सामना नाही!
रोहित शर्माच्या एकदिवसीय निवृत्तीच्या चर्चांवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अधिकृतपणे पडदा टाकलाय. रविवारी १९ जुलै रोजी लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध होणारा मालिकेतील शेवटचा सामना रोहितच्या कारकिर्दीतील अखेरचा सामना नसेल, असे बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट केलेय. सैकिया यांनी रोहितच्या निवृत्तीचे वृत्त पूर्णपणे फेटाळत सांगितले की, जोपर्यंत सिलेक्टर्स आणि संघ व्यवस्थापनाच्या नियोजनात रोहित बसेल, तोपर्यंत तो भारतासाठी खेळत राहील. रोहित सध्या आपल्या ३०० व्या एकदिवसीय सामन्याच्या ऐतिहासिक टप्प्यापासून अवघे १३ सामने दूर आहे. (Top 10 News)





