Toll hike : मुंबईत व्यावसायिक वाहनांच्या टोलमध्ये वाढ; वाहतूकदारांनी व्यक्त केला संताप
मुंबईत प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या व्यावसायिक वाहनांच्या टोल दरात १ ऑक्टोबरपासून वाढ केली जाईल, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने जाहीर केले.

Toll hike – मुंबईत प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या व्यावसायिक वाहनांच्या टोल दरात १ ऑक्टोबरपासून वाढ केली जाईल, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने जाहीर केले. वाहतूकदारांनी या निर्णयाला विरोध केला आहे. त्यांना मालवाहतुकीचे दर (फ्रेट चार्जेस) वाढवणे भाग पडेल आणि याचा अंतिम बोजा ग्राहकांवरच पडेल, असे त्यांचे म्हणणे आहे.
मुंबईच्या प्रवेशद्वारांवर खाजगी कार किंवा एसयूव्ही, तसेच सार्वजनिक वाहतुकीच्या बसेस, रिक्षा आणि टॅक्सींसाठी कोणताही टोल आकारला जात नाही. ऐरोली, मुलुंड एलबीएस, मुलुंड ईस्टर्न एक्सप्रेसवे, दहिसर आणि वाशी या पाच प्रवेशद्वारांवर हे सुधारित टोल दर लागू होतील.
माहितीनुसार, व्यावसायिक वाहन मालक ५० किंवा १०० टोल कूपन्स आगाऊ खरेदी करू शकतात; त्यांना अनुक्रमे २५ टक्के आणि ५० टक्के सवलत मिळेल. टोल नाक्यांवर सवलतीचे स्मार्ट कार्ड जारी केले जातील. या दरवाढीवर वाहतूकदारांनी टीका केली आहे. यामुळे त्यांच्या ऑपरेटिंग खर्चात आणखी वाढ होईल आणि अखेरीस ग्राहकांवर बोजा पडेल, असे त्यांनी म्हटले.
हा अतिरिक्त बोजा भरून काढण्यासाठी वाहतूकदारांना मालवाहतुकीचे दर वाढवावे लागतील आणि त्याचा अंतिम फटका ग्राहकांनाच बसेल, असे ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे सल्लागार आणि माजी अध्यक्ष बल मलकित सिंग यांनी सांगितले.
सिंग म्हणाले, वाहतूकदार आधीच वाढत्या परिचालन खर्चाचा सामना करत आहेत. त्यांनी महाराष्ट्र सरकारला विनंती केली की, लहान वाहनांना मिळणारी टोल सवलत अवजड व्यावसायिक वाहनांनाही लागू करावी.
रस्ते बांधकामाचा खर्च कंत्राटदारांनी खूप आधीच वसूल केला आहे आणि त्यामुळेच वाहतूकदारांवर अतिरिक्त बोजा टाकण्याचे कोणतेही समर्थन होऊ शकत नाही. टोल दरांमधील वाढीचा परिणाम अखेरीस जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होईल आणि मुंबईकरांवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडेल, असे सिंग म्हणाले.
सुधारित टोल दर :
वाहने ——— आधीचे दर —— नविन दर
हलकी व्यावसायिक वाहने——- ७५ रुपये ——- ९० रुपये
बस, ट्रक——– १५० रुपये —— १८० रुपये
अवजड वाहने———- १९० रुपये ———- २२५ रुपये





