Abandoned Vehicles : क्षेत्रीय कार्यालयांतर्गत रस्त्यांवरील बेवारस वाहने हटविण्याची कारवाई क्षेत्रीय कार्यालयाकडूनच केली जात होती. परंतु, काही कारणास्तव वाहतूक पोलिसांकडे ती जबाबदारी दिली गेली आहे, अशी टोलवा-टोलवी प्रशासनाकडून सुरू आहे. त्यामुळे त्रिमूर्ती चौक ते धनकवडी पोस्ट ऑफिस चौक, भारती विद्यापीठ बॅक गेट ते सरहद कॉलेज चौक या दरम्यानच्या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा नो पार्किंग मध्ये उभ्या वाहनांसह अनेक दिवसांपासून एकाच जागी धुळखात उभ्या बेवारस वाहनांची संख्या वाढली आहे. अशा वाहनांमुळे अपघाताचा धोका असून प्रशासकीय यंत्रणांनी जबाबदारीचे वाटप करण्यापेक्षा ही समस्या सोडवावी, रस्त्यातील अडथळे हटवावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या परिसरात नामांकित शैक्षणिक संस्था असल्याने विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. मात्र, रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांमुळे विद्यार्थ्यांना, पादचाऱ्यांना चालण्यासाठीही जागा उरलेली नाही. अनेक महिन्यांपासून काही वाहने जागची हललेली नाहीत. ही वाहने धुळखात पडली असून, यामुळे केवळ रस्ता अरुंदच नाही तर परिसरात अस्वच्छता वाढली आहे. हा रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. बेशिस्त पार्किंगमुळे पीएमपी बसेसला वळण घेताना मोठी अडचण होत आहे. ‘रस्त्याच्या बाजूला अनधिकृतपणे उभी करण्यात आलेली वाहने तसेच अनेक दिवसांपासून बेवारस स्थितीत रस्त्यांच्या बाजूला उभी असलेल्या वाहन मालकांना नोटीस देऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल.’ – सोमनाथ पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सहकार नगर ‘धनकवडी-सहकार नगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत बेवारस वाहनांवर कारवाई करण्यात येत होती. मात्र, काही कारणास्तव वाहतूक पोलीस यांच्याकडे ती जबाबदारी आहे, वाहतूक पोलिसांनी सांगितले तर अतिक्रमण विभागातर्फे संयुक्त कारवाई करण्यात येईल.’ – सागर विभूते, अतिक्रमण निरीक्षक, क्षेत्रीय कार्यालय