विविधा : दिलीप पुरुषोत्तम चित्रे

कवी, कथालेखक, समीक्षक, चित्रकार, शिल्पकार दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचा आज जन्मदिन. दिलीप चित्रे यांचा जन्म बडोदा येथे 17 सप्टेंबर 1938 रोजी झाला, अभिरुची नियतकालिक चालविणाऱ्या पुरुषोत्तम चित्र्यांच्या घराण्यात. त्यांचे प्राथमिक शिक्षण बडोदा येथे झाले. कालांतराने ते कुटुंबासमवेत वर्ष 1951 मध्ये मुंबई येथे आले.
रुईया महाविद्यालयामधून 1958 मध्ये कला शाखेतील पदवी शिक्षण पूर्ण केले. 1960 ते 1963 या काळात इथियोपियात नोकरीसाठी जाऊन राहिले होते. वर्ष 1964 मध्ये ते मुंबईला परतल्यावर जाहिरात क्षेत्रात नोकरी आणि पत्रकारिता करू लागले. त्यामुळे त्यांचा तत्कालीन माध्यमांच्या विश्वात समावेश झाला. तसेच ते लेखनही करू लागले. त्यांनी लघुपत्रिका चळवळीत सक्रिय भाग घेतला. ते सिद्धहस्त कवी होते. कविता, कथा, समीक्षा आणि इंग्रजी स्फुट तसेच अनुवाद असे लेखन त्यांनी केले. अफाट प्रतिभा लाभलेले कवी म्हणून लघुपत्रिका चळवळीत प्रसिद्ध झाले होते. “ऍन ऍन्थॉलॉजी ऑफ मराठी पोएट्री'(1967), “आर्फियस’ (1968) हा कथा संग्रह; “शिबा राणीच्या शोधात'(1971) आत्मचरित्रात्मक प्रवासवर्णन लिहिले.
सत्यकथेतून त्यांनी पाश्चात्य कवी रॅम्बो, हॉपकिन्स, रिल्के, एझरा पाउंड, हार्ट क्रेन आदी कवींच्या काव्यविश्वाचा आधुनिक कवितेला “सात छेद’ या नावाने मराठी वाचकांना परिचय करून देणारी त्यांची लेखमाला प्रसिद्ध केली. परखड आणि चिकित्सक दृष्टीने त्यांनी जगाकडे, जीवनाकडे सकारात्मक पाहात देशातील विविध प्रवाहांशी सांगड घालत शेवटी संत तुकारामांच्या आणि संत ज्ञानेश्वरांच्या अस्सल देशीय काव्यपरंपरेशी ते एकरूप झाले. त्यांनी संत तुकारामांच्या कवितेचा इंग्रजी अनुवाद करून, तुकोबांच्या काव्याचा परिचय जगाला करून दिला.
क्वेस्ट, न्यू क्वेस्ट, थॉट, सेमिनार, इलस्ट्रेटेड वीकली अशा प्रसिद्ध नियतकालिकांतून त्यांनी राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर इंग्रजीत लेखन केले. “चाव्या’ (1982), “तिरकस आणि चौकस’ (1990), “शतकाचा संधिकाल’ ही चित्र्यांची सामाजिक आणि राजकीय स्थिती-गतीवरील भाष्ये आहेत. “मिठू मिठू पोपट’ (1989), “सुतक’ (1989) ही त्यांची नाटके आहे. “चतुरंग’ (1995) हे चार लघुकादंबऱ्यांचे संकलन आहे. चित्रकलेविषयी भरपूर लेखन आणि “गोदाम’ (1978) या चित्रपटाचे कथालेखन-दिग्दर्शन व संगीत दिग्दर्शनही त्यांनी केलेले आहे. त्यांनी ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवाचा अनुवाद केला. तसेच मराठी-इंग्रजी भाषांतून “पुन्हा तुकाराम’ (1990) व तुकारामांच्या कवितेचे मर्म “सेज तुका’ या लेखातून वाचकांना उपलब्ध करून दिले. त्यांचे काव्य अतिशय प्रगल्भ निरीक्षणावर आधारलेले असायचे. माणसाच्या अडीअडचणींचे तसेच त्याचे मनावरील होणाऱ्या परिणामाचे त्याच्या वर्तणुकीतून दिसणारे प्रतिबंब ते त्यांनी खुबीने मांडले होते. “एक माणूस’ या कवितेतून ते सांगतात, “रडण्याऐवजी चालत जातो पायाखाली येतील ते रस्ते त्याच्या प्रत्येक पावलाएवढा अश्रू सांडतो एकेक रस्त्यावर.’
साहित्य क्षेत्राच्या जोडीनेच त्यांनी चित्रकला या क्षेत्रातही विशेष कार्य केले आहे. त्यांच्या चित्रांची प्रदर्शने भारतात तसेच भारताबाहेरही भरविली गेली होती. त्यांच्या साहित्यसेवेसाठी, कार्यासाठी मराठी साहित्य अकादमीचा पुरस्कारही त्यांना लाभला आहे. “माझ्या एकूण कविता’ तब्बल 987 पृष्ठांच्या ग्रंथामध्ये त्यांच्या साहित्याचा मागोवा घेता येतो. 10 डिसेंबर 2009 रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले.





