आपण मुलांना मातृभाषा, इंग्लिश, विज्ञान, गणित, इतिहास, भूगोल असे अनेक विषय शिकवतो. कसं जेवायचं इथपासून ते चारचौघांत कसं वागायचं हे सांगतो. पण एक शिक्षण दिलं जात नाही.. आणि ते म्हणजे लैंगिक शिक्षण! Instruction in sex is as important as instruction in food- जॉर्ज बर्नार्ड शॉ ह्यांचं हे वाक्य आठवण्याचं कारण म्हणजे भारतात सतत होणारे बलात्कार. कोलकात्यात जो बलात्कार झाला त्यातील आरोपीने कबूल केले आहे की, बलात्कार करण्याआधी त्याने पॉर्न क्लिप पाहिली होती. अशा क्लिप अगदी शाळकरी वयातील मुलेही फक्त एक क्लिक करून पाहू शकतात. सिनेमांना जसं सेन्सॉर बोर्ड असतं तसं पॉर्नला नसतं. अशा फिल्म्सवर भारत सरकारचं नियंत्रण नाही. कारण यातील बहुतांश क्लिप विदेशात तयार होतात आणि ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या जातात. या फिल्म प्रौढ व्यक्तींपुरत्या मर्यादित नाही. त्या कोणीही पाहू शकते. लैंगिक शिक्षणाचा अभाव मुलांना लैंगिक शिक्षण का द्यायचं? कारण चुकीचं ज्ञान अज्ञानापेक्षा घातक असतं. योग्य लैंगिक शिक्षण दिलं तर मुलांकडून त्याचा योग्य स्वीकार होईल. मुलांना जेव्हा शरीरात आणि मनात प्रचंड बदल जाणवत असतो, तेव्हा त्यांना प्युबर्टी ही अवस्था नैसर्गिक असून इतरांसारखी ती माझ्यात आली आहे हे समजेल. मुले आपल्यापरीने लैंगिकता जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. मित्र, इंटरनेट या माध्यमातून माहिती मिळवतात. ही माध्यमे त्यांच्या भावना आणखी चेतावतात आणि ते सीमारेषा ओलांडायला उद्युक्त होण्याची शक्यता असते. लैंगिकतेसंबंधी काही विकृती जन्माला येतील. त्यातील एक भयंकर विकृती आहे, बलात्कार! कायदा बलात्कार झाल्यावर न्यायनिवाड्याचं काम करतो; पण बलात्कार थांबवणं कायद्याच्या कक्षेबाहेरचं आहे. बलात्कार किंवा इतर विकृती थांबवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक पालक आणि मुलांना लैंगिकतेची मूलभूत माहिती असायला हवी. लैंगिक साक्षरतेचं प्रमाण वाढायला हवं. सिग्मंड फ्रॉइड म्हणतो, बाळ जन्माला येतं तेव्हा त्याच्यासोबत कामभावना, लैंगिक इच्छा जन्माला येते. बाळ एखाद्या वस्तूत रमून शारीरिक आनंद मिळवत असतं. या अवस्थेला फ्रॉइडने पॉलिमॉर्फिक परव्हर्स असं नाव दिलं. बाळ मल-मूत्र विसर्जन करतं, शी-सू करतं तेव्हा त्याला शारीरिक आनंद मिळतो. ही अवस्था वयाच्या पाचव्या वर्षांपर्यंत टिकते. त्यानंतर बाळ (मुलगा आणि मुलगी) ओडिपस कॉम्प्लेक्सपर्यंत येतं. सोप्या भाषेत सांगायचं तर मुलाला किंवा मुलीला भिन्नलिंगी पालकाबद्दल किंवा संपर्कात येणार्या भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण होतं. लैंगिकतेच्या एकूण चार अवस्था असतात. स्व-कामक्रीडा, समलिंगी कामक्रीडा, भिन्नलिंगी कामक्रीडा आणि वार्धक्यातील कामक्रीडा नसलेलं जीवन. बाळ जन्माला आल्यानंतर ते या चार अवस्थांमधून जातं. आता विचार करू, बलात्कार करण्याची जास्त शक्यता केव्हा असते? निसर्गाला लैंगिक संबंधांमधून पुढची पिढी अपेक्षित असते. त्यामुळे निसर्गाने लैंगिकतेची भावना खूप लहान वयात निर्माण केलेली असते. मेंदूमधून रासायनिक संदेश पाठवला जातो आणि पुरुषाला (लहान मुलालासुद्धा) लैंगिक इच्छा होते. ही क्रिया शिकवावी लागत नाही. आपोआप घडते. स्वप्नामध्ये लैंगिक दृश्ये दिसू लागतात. मुलगा मोठा होत जातो तेव्हा अनेक माध्यमांतून त्याला लैंगिकतेची माहिती मिळत जाते. मित्रांकडून मिळणारी (साधारणपणे अपुरी/चुकीची) माहिती त्याच्या मेंदूत साठवली जाते. हल्ली प्रसारमाध्यमे सगळ्यांच्या हातात आहेत. त्यावर काय दाखवलं जातं? इंटरनेटवर यासंबंधांमध्ये जे व्हिडिओ किंवा क्लिप्स आहेत त्यांचं वर्णन हे ‘अवर्णनीय’ आहे. लहान मुलांच्या हाताला असे व्हिडिओ सहज लागू शकतात. आता प्रश्न येईल, अशा गोष्टींपासून आपल्या मुलाला कसं वाचवायचं? स्त्रीचा सन्मान राखणं, बलात्कार का होतात आणि त्यापासून दूर राहणं हे मुलांना समजावणं इत्यादी उपाय आहेत. कमी वयाच्या मुलांना लैंगिकतेची योग्य माहिती देणारी हेल्पलाइन तयार करावी लागेल. नाव न विचारता, विचारलेल्या प्रश्नावर योग्य उत्तर देणारी एक हेल्पलाइन अनेक तरुणांच्या इच्छेचं शमन करू शकते… दमन नाही! दमन म्हणजे ऊर्जा दाबणे… भौतिकशास्त्र सांगतं की ऊर्जा दाबली की तिचा स्फोट होतो. सध्या तेच होत आहे. मीडियामधून लैंगिकतेची इच्छा तीव्र केली जाते. तरुण मुले बलात्काराकडे वळू नयेत म्हणून फ्राइडचा सिद्धांत कामाला येऊ शकतो. लहान मुलं शारीरिक आनंद लुटतात… मल-मूत्र विसर्जन करूनसुद्धा! मग शारीरिक आनंद लुटण्यासाठी खेळाचं मैदान हा आणखी एक हुकमी उपाय आहे. फुटबॉलला लाथ मारल्यावर सगळी ऊर्जा बाहेर निघते. पोहणं, सायकलिंग, ट्रेकिंग असे खेळ मोठा परिणाम करू शकतात. पण मैदाने संपली, मुलं कॉम्प्युटर गेम खेळायला लागली. शारीरिक आनंद लुटण्याचे मार्ग बंद झाले आणि बलात्कार वाढत गेले, असे म्हणायला वाव आहे. दुर्दैवाने लैंगिकता हा विषय अश्लील समजला जातो. लैंगिकतेचं शिक्षण स्पष्ट, रोखठोक स्वरूपात दिलं जात नाही. डूज आणि डोन्ट्स सांगणारी अनेक उत्पादने विकली जातात, पण लैंगिकतेबद्दल डूज आणि डोन्ट डू सांगायची वेळ आली आहे का, याबाबतही विचार व्हावा. लैंगिकतेचं योग्य ज्ञान देण्यासाठी र. धों. कर्वे यांनी ‘समाजस्वास्थ्य’नावाचं मासिक सुरू केलं होतं. जुलै 1927 ते 1953 पर्यंत ते चालवलं. अनेक अश्लीलतेच्या कोर्ट खटल्यांमध्ये त्यांना दंड झाला. रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे ऊर्फ रँग्लर परांजपे यांनी कर्वेंना साथ दिली. स्त्रियांनादेखील लैंगिक भावना असतात असा विचार कर्वेंनी मांडला, जो अनेकांना पचला नाही. कर्वेंची हेटाळणी होत राहिली. ते विल्सन महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक होते. लैंगिक विषय जाहीरपणे मांडणे विल्सन महाविद्यालयाला पटलं नाही. त्यांनी प्रा. कर्वेंना राजीनामा द्यायला लावला. कर्वेंचा राजीनामा मागणे ही ऐतिहासिक चूक होती. जिचे परिणाम समाजाला आजही भोगावे लागत आहेत. आजही लैंगिक हा विषय जाहीरपणे बोलला जात नाही, त्यावर लिहिले जात नाही आणि चर्चा होत नाही. आता अशा चुका टाळल्या तर बलात्कार, लैंगिक अत्याचार रोखता येतील. म्हणूनच बलात्कार की लैंगिकतेच्या वस्तुस्थितीचा स्वीकार? कठोर कायद्याची मागणी करणार की आणि लैंगिक शिक्षणाचाही विचार करणार? निवड आपल्या हातात आहे.