Pune District : पद्मश्री ढसाळ आयुष्याच्या रणांगणावर लढणारे कवी

राजगुरूनगर : खेड तालुक्यातील सुपुत्र पद्मश्री नामदेव ढसाळ हे काचेच्या बंगल्यात, एसीत बसून लिहिणारा कवी नव्हते. तर ते आयुष्याच्या रणांगणावर लढणारे कवी होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी व समीक्षक केशव सखाराम देशमुख यांनी केले.
पद्मश्री नामदेव ढसाळ जयंती निमित्त महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या राजगुरूनगर शाखा व स्व. प्रा. नानासाहेब गोरडे सार्वजनिक ग्रंथालय तर्फे दिल्या जाणार्या विविध वाड्मय पुरस्कारांचे वितरण नुकतेच करण्यात आले. त्याप्रसंगी देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
शिवव्याख्याते गुलाबराव वळसे, साहित्यीक अरुण बोर्हाडे, अॅड. सतीश गोरडे, पुरुषोत्तम सदाफुले, डी. के. वडगावकर व साहित्य परिषदेचे अध्यक्ष संतोष गाढवे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी धनाजी घोरपडे, सचिन शिंदे, किरण भावसार, भारत सातपुते, संतोष आळंजकर, डॉ. राजेंद्र माने यांना साहित्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
तर पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले यांच्या जीवन गौरव पुरस्कारासह बाळासाहेब सांडभोर, राजन जांभळे, सुनंदा थिगळे, महेंद्र भारती,के.डी.सरोदे, वंदना वाघचौरे, अतुल गार्डी, आनंद वाव्हळ यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. कवी बाबाजी शिंदे, लखन जाधव, धर्मनाथ पवळे यांनी संयोजन केले. प्रा. कविता कडलग यांनी सूत्रसंचालन केले तर मधुकर गिलबिले यांनी आभार मानले.





