आम्ही ठरवलंय. सगळ्यात आधी तिला ‘निर्भया’ म्हणणं सोडून द्यायचं. 2012च्या डिसेंबर महिन्यात हे नाव तिला मिळालं. भीतीपासून मुक्त असा या शब्दाचा अर्थ. आपल्याकडे बरेच शब्द केवळ शब्द म्हणून जन्माला येतात असं वाटू लागलंय. त्या यादीत ‘निर्भया’ हा शब्द जाऊन पडणं आम्हाला परवडणारं नाही. या नावानं एक निधीही स्थापन झाला होता. या नावाची पथकंही तयार झाली होती. परंतु एवढं करूनही आडरस्त्यावर, कधी हॉस्पिटलमध्ये, कधी मंदिरात आणि आता तर शाळेतसुद्धा ती निर्भय राहिली नाही. उलट अधिक असुरक्षित झालीये. तिच्या वाट्याला असा प्रसंग आला की सगळ्यांना झोपेतून जाग येते. काही दिवस हलकल्लोळ माजतो. काही दिवसांनी तो निवळतो. खटले उभे राहतात, चालत राहतात आणि संपतात. 2012 च्या निर्भयाला आठ वर्षांनी न्याय मिळाला. खरं तर तिच्या मृत्यूनंतर लोकनियुक्त प्रतिनिधींनी बराच विचारविनिमय करून कायदे कडक केले होते. वेगवेगळ्या उपाययोजना केल्या होत्या. परंतु एवढं करूनही दिवसेंदिवस तिच्या वाट्याला येणार्या भयानक प्रसंगांची संख्या वाढतच का चाललीये, यावर गांभीर्याने विचार करायला कुणी तयार नाही. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोची आकडेवारी दरवर्षी प्रसिद्ध होते. त्यात महिलांविरुद्ध घडलेल्या गुन्ह्यांची संख्या वाढलेली दिसते. आम्ही कपाळावर आठ्या आणतो. ‘जरा सांभाळून गं बाई,’ असं घरच्या पोरीबाळींना सांगतो आणि प्राप्त परिस्थितीला हतबलपणे समोरे जातो. हे रहाटगाडगं असंच सुरू राहतं, याला आम्हीही बर्याच अंशी कारणीभूत आहोत. ज्यावेळी अशी एखादी घटना घडते आणि एखादी शिक्षणसंस्था मुलींनाच ड्रेसकोड लागू करते, आचारसंहिता लागू करते, तेव्हा पुरेशा मोठ्या आवाजात आम्ही निषेध नोंदवत नाही. ज्यांनी सांस्कृतिक एकरूपतेच्या नावाखाली सांस्कृतिक संकर घडवून आणला, त्यांच्याविषयी तर आम्ही काहीच बोलत नाही. म्हणून मग दिल्लीनंतर उन्नाव, हाथरस, हैदराबाद, पुन्हा दिल्ली, मग कोलकाता, बदलापूर अशा घटनांमागून घटना घडत राहतात. आणखी एक चूक आम्ही पुनःपुन्हा करतो. पीडितेची जात, तिचा धर्म, संशयिताचा जात-धर्म पाहून आमच्या निषेधाचा ‘व्हॉल्यूम’ ठरवतो. एखाद्या महिलेचा खून करून तिच्या शरीराची विल्हेवाट लावणार्यांमध्ये भेदाभेद करणं गैर आहे; या घटनांमधलं क्रौर्य एकसमान आहे, हे सांगणारे आवाज बरेच क्षीण झालेत. अशा वेळी जे आवाज मोठ्ठे होतात, ते हल्ली बहुतेक वेळा राजकीय असतात. घटना कोणत्या राज्यात घडली, तिथं सरकार कुणाचं या गोष्टी आमच्या डोक्यात सहेतुक घुसवणारे अतिहुशार लोक पैशाला पासरी मिळतात. म्हणूनच आम्ही ठरवलंय. मणिपूर आणि संदेशखाली यातलं अंतर संपवायचं. ‘निर्भया’ची जात, धर्म, शहर, राज्य आणि तिच्यावर गुदरलेल्या प्रसंगाचं ठिकाण यात कुठलाही भेदाभेद करायचा नाही. कारण तिच्यावर टपून बसलेले नराधम हा विचार कधीच करत नाहीत. आम्ही तसा विचार करत बसलो तर ‘निर्भया’ हे नाव कायमचं विसरावं लागेल, कारण भय संपणारच नाही. हे भय आमच्या घराभोवतीही घोंगावतंय. कुठूनही, कधीही घरात शिरेल. म्हणूनच आम्ही ठरवलंय, ‘निर्भया’ शब्द विसरायचा आणि त्याचा अर्थ शोधायचा!