nagar | वाळू वाहतुकीने खराब झालेले रस्ते दुरुस्तीसाठी निधी देऊ

श्रीरामपूर, (प्रतिनिधी)- राहुरी तालुक्यातील करजगाव येथील अधिग्रहण केलेल्या जागेस स्थगिती देण्यात आली असून, श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथील अधिग्रहित केलेल्या जागेचे भाडे तातडीने देण्यात येईल.च वाळू वाहतुकीने खराब झालेले रस्ते दुरुस्त करण्यासाठी निधी मिळावा म्हणून शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी आमदार लहू कानडे यांना दिले.
आमदार लहू कानडे यांनी श्रीरामपूर, राहुरी तालुक्यातील वाळूच्या प्रश्नासंदर्भात आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देताच प्रशासनाने त्याची दखल घेत जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी आ. कानडे यांच्याशी सविस्तर चर्चा करत सर्व मागण्या मान्य केल्या.
आमदार कानडे यांनी वाळूच्या प्रश्नासंदर्भात दोन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी यांच्यासह अप्पर जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना पत्र देऊन कार्यवाही करण्याची मागणी केली होती. आज आ. कानडे यांनी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची भेट घेऊन या प्रश्नासंदर्भात सविस्तर चर्चा केली.
श्रीरामपूर-राहुरी विधानसभा मतदारसंघात वाळू उपशामुळे कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले असून, अवैध वाळू उपसा त्वरित थांबविण्यात यावा, शासनाच्या नवीन वाळू धोरणानुसार राज्यातील पहिला डेपो नायगाव (ता. श्रीरामपूर) येथे उभारण्यात आला.
त्यावेळेस डेपोवरील अतिरिक्त वाहतुकीमुळे रस्ते नादुरुस्त झाल्यास ते दुरुस्त करून देऊ आणि वाळू डेपोसाठी दिलेल्या जागेचे त्वरित भाडे देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. परंतु ते पाळले गेले नाही. मातुलठाण, लाख अशा अनेक ठिकाणच्या वाळू डेपोवरील वाहतुकीमुळे रस्ते खराब होत आहेत.
आता पावसाळा सुरू होईल. त्यामुळे शेतकऱ्यांचे जाणे येणे मुश्कील होईल. तेव्हा ते रस्ते दुरुस्त करून मिळावेत तसेच नवीन वाळू धोरणांमधून जरी ग्रामसभेच्या ठरावाची अट रद्द केली असली तरी नदीकाठचा एखादा गाव विहिरीचे पाणी टिकावे म्हणून आणि पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी वाळू उपसा करू नये,
अशी शासनास विनंती करीत असेल तर जनतेचा सन्मान केला पाहिजे, परंतु करजगाव येथे महसूल अधिकाऱ्यांनी मनमानी करून ग्रामसभेचा ठराव असतानाही वाळू उचलण्यासाठी जागा अधिग्रहित केलेली आहे. ती तात्काळ रद्द करण्यात यावी, या मागण्या आ. कानडे यांनी केल्या होत्या. या सर्व मागण्या जिल्हाधिकारी सालीमठ यांनी मान्य करत त्याबाबत ठोस आश्वासन दिले.
यावेळी माजी नगरसेवक अशोक कानडे, ज्येष्ठ नेते वेनुनाथ कोतकर, बाळासाहेब इंगळे, सरपंच रा. ना. राशिनकर, चंद्रसेन लांडे, करजगावचे सरपंच गणेश कोतकर, माजी सरपंच नवनाथ कोतकर, उपसरपंच अण्णासाहेब देठे, शिवसेनेचे बबनराव लोंढे, सुनील प्रकाश लांडे, दत्तात्रय बोर्डे, लक्ष्मण पवार, सुरेश भरसाकळ,
बाबा शंकर लांडे, बबन आहेर, अविनाश आरंगळे, योगेश आरंगळे, प्रसाद लोंढे, सुरेश कोतकर, प्रसाद आरंगळे, अमोल कोतकर, चांद पठाण, कुलदीप कदम, बापूसाहेब गायके, किरण आरंगळे, प्रशांत आरंगळे, सोमनाथ कोतकर, बाळासाहेब कोतकर, महेश आरंगळे, अजय कोतकर, त्रिंबक कोतकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते





