Tirupati Mandir : “जिथे भक्ती नाही, तिथे पवित्रता देखील नाही..”; तिरुपती प्रकरणावर सद्गुरू स्पष्टच म्हणाले…

Tirupati Mandir : आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिराच्या प्रसादात (लाडू) प्राण्यांची चरबी आणि माशांचे तेल वापरण्यात आल्याचे समोर आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पवित्रतेवरील विश्वास उडाला आहे. अश्यातच आता, ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरु यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली असून मंदिराच्या प्रसादात गोमांस चरबी असणे अत्यंत घृणास्पद असल्याचे म्हटले आहे.
त्याचबरोबर भारतातील इतर मंदिरांवरही याचा परिणाम झाला असून प्रसाद बनवताना अधिक खबरदारी घेतली जात आहे. यासोबतच तिरुपती लाडू वादावर चंद्राबाबू नायडू सरकारही कारवाईत आले असून तपासासाठी एसआयटी स्थापन केली आहे.
याविषयी बोलताना ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरु म्हणाले, ‘मंदिरातील प्रसादात गायीची चरबी असणे घृणास्पद आहे. त्यामुळे मंदिरे सरकारने चालवली पाहिजेत, भक्तांनी चालवली पाहिजेत. जिथे भक्ती नाही तिथे पवित्रता नसते. हिंदू मंदिरे सरकारने नव्हे तर हिंदुत्वनिष्ठांनी चालवली पाहिजेत, अशी वेळ आली आहे. असं ते म्हणाले.
या घटनेनंतर देशभरातील मंदिरे आता अलर्टवर
तिरुपती मंदिराच्या प्रसादामध्ये (लाडू) प्राण्यांची चरबी आणि माशांच्या तेलाच्या समस्येचा भारतातील इतर मंदिरांवरही परिणाम झाला आहे. या घटनेनंतर देशभरातील मंदिरांमध्ये प्रसाद बनवताना कमालीची खबरदारी घेतली जात आहे. वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिरात अधिकारी अतिरिक्त दक्षता घेत आहेत.
प्रशासनाने मंदिरात बनवल्या जाणाऱ्या लाडूंची शुद्धता तपासण्यास सुरुवात केली आहे. वाराणसीचे एसडीएम (उप-विभागीय दंडाधिकारी) शंभू शरण सिंह यांनी स्वतः लाडू चाखले आणि प्रसादाची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी नियमित तपासणी करण्याचे आदेश दिले.
लाडूंमध्ये चरबीयुक्त तुपाची भेसळ कशी समोर आली?
तिरुपती बालाजी मंदिरात घडलेली धक्कादायक घटना उघडकीस आली कशी, असा प्रश्न देशभरातील लाखो हिंदू स्वतःला विचारत आहेत. लाडू बनवण्यासाठी वापरण्यात येणारे तूप प्राण्यांच्या चरबीत मिसळल्याचे प्रयोगशाळेत केलेल्या चाचण्यांमधून हा धक्कादायक खुलासा झाला.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एनडीडीबी (नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड) च्या अहवालावर आधारित चिंता व्यक्त केल्यावर हा वाद सुरू झाला. मंदिरात वापरले जाणारे तूप शुद्ध नसते, असे सांगण्यात आले. एआर डेअरी फूड प्रायव्हेट लिमिटेड या तूप पुरवठादारांपैकी एकाने मंदिराला पुरवल्या जाणाऱ्या तुपात प्राण्यांची चरबी मिसळल्याची पुष्टी तपासात झाली.
जेव्हा मंदिराला तूप पुरवठा करणारे उत्पादक बाजारभावापेक्षा खूपच कमी दराने तूप पुरवत होते, तेव्हा मंदिर संस्थेशी संबंधित लोकांना संशय येऊ लागला. अशा स्थितीत तुपाचा दर्जा तपासण्याची मागणी जोर धरू लागली.
संशय अधिक गडद झाल्याने मंदिरात तूप पुरवठा करणाऱ्या सर्व डेअरींच्या तुपाची चाचणी करण्यात आली. प्रीमियर ॲग्री फूड्स, कृपाराम डेअरी, वैष्णवी, श्री पराग मिल्क आणि एआर डेअरी फूड तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) ला तूप पुरवत असे.





