आमदारांच्या अपात्रतेबाबत वेळकाढूपणा; कायदेतज्ज्ञ असिम सरोदे

मुंबई – सर्वोच्च न्यायालायाने शिवसेनेतील बंडखोरी प्रकरणी 141 पानांचा निकाल दिला होता. त्यात परिच्छेद 110 आणि 111 मध्ये रिझनेबल टाइममध्ये आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांना दिले होते.
पण, अद्यापही यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसून एक प्रकारे रिझनेबल टाइमचा गैरफायदा घेतल्याचे दिसून येत आहे. ही संवैधानिक अनैतिकता आहे, असे म्हणत कायदेतज्ज्ञ असिम सरोदे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला आहे.
आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना (ठाकरे गट) आणि एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना नोटीस बजावली. यानंतर शिंदे गटाच्या सदस्यांनी उत्तर देण्यासाठी मुदतवाढ दिली होती. यानंतर आता आमदारांच्या अपात्रेसंदर्भात ते सुनावणीला सुरुवात करणार आहेत.
मात्र, आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागू नये यासाठी राहुल नार्वेकर वेळकाढूपणा करत असल्याचा दावा असिम सरोदे यांनी केला आहे. दरम्यान, राहुल नार्वेकर हे आमदार अपात्रतेसंदर्भात पुढच्या आठवड्यापासून आमदारांच्या प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात करणार आहे. दररोज एका आमदाराची सुनावणी होणार आहे, अशी देखील माहिती समोर आली आहे.
ठाकरे गटाच्या आमदारांनी आपले उत्तर विधानसभा अध्यक्षांकडे सादर केले असल्याने आता त्यांची आधी सुनावणी होणार आहे. यामुळे ते कधी आणि कोणता निकाल देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे.
अपात्रतेचा निर्णय आता फास्ट ट्रॅकवर
विधीमंडळाकडून मुद्द्यांचा आराखडा तयार करण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे, अशीही माहिती समोर येत आहे. ज्या आमदारांवर कारवाईची नोटीस पाठवली होती, त्या आमदारांना कोणते प्रश्न विचारायचे, कशाप्रकारे सुनावणी घ्यायची याची आखणी केली जाणार आहे. ही सुनावणी भारतीय दंड संहितेनुसार घेण्यात येईल. सुनावणीच्या वेळी मुद्दे भरकटू नये याचीही काळजी घेण्यात येईल.





