Pune Crime : ‘जीवंत राहू देणार नाही….’; टिळक रोडवर मुलाखतीदरम्यान विद्यानंद बापटांना मारहाण
Pune Crime : पुण्यात टिळक रोडवर ध्वनिप्रदूषणाविरोधात भूमिका मांडणाऱ्या विद्यानंद बापट यांना टीव्ही मुलाखतीदरम्यान अनोळखी व्यक्तीने मारहाण केली. ‘जीवंत राहू देणार नाही’ अशी धमकी दिल्याची तक्रार.

Pune Crime : गणेशोत्सवातील डीजे आणि ध्वनिप्रदूषणाविरोधात भूमिका घेणारे विद्यानंद सुहास बापट (वय 37, रा. नारायण पेठ) यांना टिळक रोडवरील महाराष्ट्र मंडळाजवळ एका अनोळखी व्यक्तीने मारहाण केल्याची घटना गुरुवारी (दि. 3) घडली. बापट यांची दूरचित्रवाहिनीच्या प्रतिनिधीमार्फत ध्वनिप्रदूषणाबाबत मुलाखत सुरू असताना ही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बापट यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते हडपसर येथील एका कंपनीत कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरी करतात. आगामी गणेशोत्सवात डीजेमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाच्या विरोधात ते सोशल मीडियावर आपली भूमिका मांडत आहेत.
बापट यांची गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता टिळक रोडवरील बादशाही चौक परिसरात टीव्ही-9 मराठीचे रिपोर्टर योगेश बोरसे आणि कॅमेरामन मुलाखत घेत होते. मुलाखत सुरू असताना ते चालत महाराष्ट्र मंडळाजवळील महेश नागरी सहकारी बँकेसमोर आले. त्यावेळी गुलाबी रंगाचा शर्ट घातलेल्या अंदाजे 30 ते 35 वर्षांच्या व्यक्तीने बापट यांना अडविले.
‘तुम्ही पर्यावरणवादी असेच आहात, आमच्या गणेशोत्सवात अडथळा निर्माण करता का, डीजेच्या विरोधात बोलता का?’ असे म्हणत त्याने बापट यांना अचानक मारहाण करण्यास सुरुवात केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तसेच शिवीगाळ करून ‘तुला मारूनच टाकतो, तू कसा जिवंत राहतो ते पाहतोच,’ अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
मारहाणीनंतर बापट तेथून जात असताना आरोपीने पुन्हा त्यांना अडवून गालावर मारहाण केली. नागरिकांनी मध्यस्थी करून त्यांची सुटका केली. त्यानंतर बापट यांनी डायल 112 वर फोन करून पोलिसांची मदत मागितली. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.
मारहाण करणाऱ्या व्यक्तीला बापट ओळखत नसून, पुन्हा समोर आल्यास ओळखू शकत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे.





