TikTok News: नेपाळने उठवली टिकटॉकवरील बंदी; मात्र ‘या’ नियम-अटींचे करावे लागणार पालन

काठमांडू – नेपाळने गुरुवारी टिकटॉक या लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साइटवर घातलेली बंदी उठवली. मात्र बंदी उठवण्यापूर्वी टिकटॉकवर काही अटी घातल्या आहेत. पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही अटींसह टिकटॉकवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यापूर्वी टिकटॉक आणि माहीती तंत्रज्ञान मंत्रालयामध्ये एक करार करण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले. धोरणात्मक निर्णय म्हणून ही बंदी उठवण्यात आली आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी कंपनीला आमच्या अटी पूर्ण कराव्या लागतील, असे माहिती तंत्रज्ञान मंत्री पृथ्वी सुब्बा गुरुंग यांनी सांगितले.
प्रत्येक सोशल नेटवर्क आता सोशल नेटवर्क ऑपरेशन गाइडलाइन २०८० च्या कलम 3 अंतर्गत मंत्रालयात सूचीबद्ध केली जाणार आहे. त्यानंतर कलम ६ अंतर्गत या सोशल नेटवर्क साइटसाठी आचारसंहिता केली जाणार आहे. टिकटॉकच्या प्रतिनिधींनी नेपाळमध्ये सूचीबद्ध होण्यास सहमती दर्शविली आणि कराराचा मुद्दा निश्चित केला, असे ते म्हणाले.
याशिवाय टिकटॉकसमोर सरकारने आणखी चार अटी ठेवल्या आहेत. सरकारने ठरवलेल्या अटींचा उद्देश पर्यटनाला चालना देणे, डिजिटल सुरक्षा आणि साक्षरता आणि माहिती तंत्रज्ञानावर आधारित सार्वजनिक शिक्षण देणे हा आहे, असे गुरुंग म्हणाले.
नेपाळने गेल्या वर्षी १२ नोव्हेंबर रोजी टिकटॉकवर बंदी घातली होती. टिकटॉक नेपाळमधील सामाजिक सौहार्द बिघडवण्यास जबाबदार आहे, असे सरकारने म्हटले होते. मात्र सरकारच्या या निर्णयावर सामान्य लोकांकडून मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.





