चिपळूणमध्ये पुन्हा वाघाच्या डरकाळ्या; पंजाचे ठसे आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातारवरण

रत्नागिरी – चिपळूण तालुक्यातील शिरगाव तळसर हे गाव पुन्हा वाघाच्या डरकाळ्यांनी दणाणून गेले आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या शिरगाव-तळसर या गावातील जंगल भागात वाघाच्या डरकाळ्या ऐकू येवू लागल्या आहेत तर त्याच्या पायाच्या पंजाचे ठसे आढळून आले आहेत. यामुळे परिसरात भितिचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत आता वन विभाग देखील सतर्क झाले आहे.
वनविभागाच्या प्राथमिक तपासणीनंतर, हा वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य जंगल पट्ट्यातून खाद्य व पाण्याच्या शोधात खाली उतरल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील काही दिवसांत ट्रॅप कॅमेऱ्यांमधून मिळणाऱ्या दृश्यांवरून वाघाच्या हालचालींचे अचूक निरीक्षण करण्यात येणार असल्याचे वन विभागाकडून सांगितले जात आहे.
मात्र, यापार्श्वभुमिवर वनविभागाने स्थानिकांना जंगल परिसरात अनावश्यक वावर टाळण्याचे तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित कळविण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या शिरगाव-तळसर या गावातील जंगल भागात मागील दोन दिवसांपूर्वी या भागात पट्टेरी वाघाची डरकाळी ऐकू आल्याचे सांगितले जात आहे. तसेच याच परिसर भागात वाघाच्या पंजाचे ठसे आढळून आले आहेत. या सर्व घटनेनंतर वनविभागाच्या पथकाने जाग्यावर जावून या सगळ्याची पाहणी केली.





