पुणे जिल्हा | लोणारवाडी परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस

मलठण, (वार्ताहर) – मागील तीन चार दिवसांपासून संपूर्ण पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. दि.२५ रोजी सायंकळपासूनच लोणार वाडी, खडकी, मलठण, राजेगाव ,बोरीबेल परिसरात डोंगर भागावर अती मुसळधार पाऊस झाला. बुधवारी तर ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले होते.
दुपारनंतर अचानक आलेल्या पावसामुळे शेत मजूर, शाळकरी मुले, प्रवाशी यांची धांदल उडाली.काळेवाडी चौफुला ते खडकी गावाला जाणारा रस्ता, लोणार वाडी रेल्वे पुलाखाली पाच फुटांपर्यंत अती वेगाने पाणी वाहत असल्याने मार्ग बंद झाला होता.
दौंड तालुक्याच्या पूर्व भागात अनेक ओढे ,नाल्यांना पुराचे स्वरूप आले होते.त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना घरी जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागला. पावसामुळे उसाचे पीक भुईसपाट झाले आहे.
मागील पंधरवड्यात पावसाने विश्रांती दिल्यामुळे खरीप पिकांची काढणीला वेग आला होता. परंतु उशिरा पेरणी केलेल्या बाजरी,सोयाबीन,उडीद,मका या पिकांची काढणी सुरू असून वरून राजाच्या कृपेमुळे काहीसे नुकसान तर काही कामाला विलंब होत आहे.
काढायला आलेल्या मका पावसाने झोडपल्यामुळे लोळली असून मकाचेही नुकसान झाले आहे. सतत पडत असलेल्या पावसाने जनावरांचेही हाल होत आहेत.
सदर पावसाचे पर्जन्यमान किती मिलिमीटर झाले याबाबत महसूल विभाग व पाटबंधारे विभागाकडे सम्पर्क केला असता,वेग वेगळी आकडेवारी सांगण्यात आली.
अती पावसाने जनजीवन विस्कळित झाले असले तरी,प्रशासन अधिकारी मात्र याकडे विशेष लक्ष देत नसल्याचे आढळून आले . अनेक महसूल मंडळात अजून पर्जन्य मापक नसल्याचे दिसून येते.
मौजे लोणारवाडीतील वाळुंजकर वस्ती या रेल्वे पुलाखालुन बरीचशी वाहतुक वाढली आहे.शाळकरी मुळे,शेतकरी,दूध उत्पादक, कामगार,यांची या रस्त्याने मोठी वाहतूक आहे.
म्हणून सदर रस्त्यावर पाण्याच्या निचऱ्याचे काम लवकर व्हावे ही मागणी लोणारवाडी व परिसरातील नागरिकांची रेल्वे प्रशासनाकडे होत आहे. – सौ पूजा महेश धगाटे, सदस्य ग्रामपंचायत लोणारवाडी,तालुका दौंड





