Leopard Attack – शिरूर तालुक्यातील पश्चिम भागातील मलठण येथील शिंदेवाडी शिवारात बिबट्याने केलेल्या भीषण हल्ल्यात तीन गाभण शेळ्यांवर हल्ला झाल्याची घटना शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली. या हल्ल्यात एक शेळी जागीच ठार झाली असून दोन शेळ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून शेतकरी कुटुंबाचे सुमारे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.शेतकरी महिला अदिती संजय चोरामले यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे त्यांना जाग आली. त्या आणि त्यांचा मुलगा कार्तिक शेतातील दावणीकडे धावले असता, बिबट्याने एका शेळीला ठार केले होते. त्यानंतर बिबट्याने इतर दोन शेळ्यांना मका पिकात ओढत नेले. यावेळी १७ वर्षीय कार्तिक चोरामले याने बॅटरीच्या उजेडात एका बाजूने शेळी ओढून धरली, तर दुसऱ्या बाजूला बिबट्या ओढत होता. कुटुंबीयांच्या आरडाओरड्यानंतर बिबट्याने तिथून पळ काढला, मात्र तोपर्यंत दोन्ही शेळ्या मरणासन्न अवस्थेत पोहोचल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच वनरक्षक नारायण राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन रीतसर पंचनामा केला. वन परिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित परिसरात तात्काळ पिंजरा लावण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मृत शेळीची नुकसानभरपाई शासनाच्या नियमानुसार शेतकऱ्याला दिली जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांनी पाळीव जनावरांच्या सुरक्षिततेबाबत काळजी घ्यावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे.