पुणे जिल्हा | पावसात घराची भिंत कोसळून तीन मेंढ्यांचा मृत्यू

यवत, (वार्ताहर)- अवकाळी पावसामुळे दौंड तालुक्यातील भरतगाव, हाकेवाडी येथील वादळी वाऱ्यामुळे घराच्या आडोश्याला असलेल्या मेंढ्यांवर घराची भिंत कोसळून त्यामध्ये ३ मेंढ्या मृत्यूमुखी पडल्या, तर १० मेंढ्याचे पाय मोडून जखमी झाल्याची घटना घडली आहे.
काल दौंड तालुक्यातील खुंटबाव, नाथाचीवाडी, पिंपळगाव, यवत, लडकतवाडी,भरतगांव, बोरीएंदी, कासुर्डी या गावात वादळ वाऱ्यासह जोराचा पाऊस पडला. हाकेवाडी येथील मेंढपाळ सिंधू कोंडीबा हाके हे मेंढ्या चारण्यासाठी गेले असता त्यावेळी अचानक वादळी वाऱ्याचा जोरदार अवकाळी पावसात सुरुवात झाली. त्यामुळे चालण्यासाठी गेलेल्या मेंढ्यांचा कळप घराच्या आडोशाला जाऊन थांबल्या होत्या.
पावसामुळे घराची दगड भिंत मंडळांच्या कळपावर कोसळली. त्यामध्ये तीन मेंढ्या जागीच ठार झाल्या तर दहा मेंढ्याचे पाय मोडून जखमी झाले आहेत, अशी माहिती माजी सरपंच सावळाराम हाके यांनी दिली. अचानक पडलेल्या या अवकाळी पावसामुळे मेंढपाळाच्या पशुधनावर मोठे संकट येऊन मेंढपाळ अडचणीत आला आहे व त्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
गावातील माजी सरपंच सावळाराम हाके यांची देखिल कांद्याची वखार या वादळ वाऱ्यात उडून गेली असून कांदा वखारीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती माजी सरपंच सावळाराम हाके यांनी दिली.घटनेचे गांभीर्याने दखल घेऊन पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी डॉ. अजित पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन मेंढ्यांच्या शवविच्छेदन करून जखमी मेंढ्यांवर उपचार केले.





