महाराष्ट्रात रक्तरंजित थरार…! शेतीच्या वादातून तिघांचा बळी, काकू-चुलत भावाची हत्या, तर आरोपीची आत्महत्या

Wardha Crime : वर्धा जिल्ह्यातील निमसडा गावात शेतीच्या धुऱ्याच्या वाटपावरून उद्भवलेल्या वादाने जीवघेणे वळण घेतले. एका चुलत भावाने आपल्या काकू आणि चुलत भावाची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केली आणि नंतर स्वतः विष प्राशन करून जीवनयात्रा संपवली. या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मृतांमध्ये साधना सुभाष मोहिजे (वय 55) आणि त्यांचा मुलगा नितीन सुभाष मोहिजे (वय 27) यांचा समावेश आहे. ही हत्या त्यांचा पुतण्या महेंद्र मोहिजे याने केली. पोलीस तपासानुसार, महेंद्र आणि नितीन यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शेतीच्या वाटप आणि ठेक्याने शेती देण्याच्या मुद्द्यावरून तणाव होता.
शुक्रवारी सकाळी हा वाद टोकाला गेला. संतप्त महेंद्रने कुऱ्हाडीने साधना आणि नितीन यांच्यावर हल्ला करत त्यांचा खून केला. त्यानंतर त्याने स्वतः विष प्राशन करून आत्महत्या केली.
अल्लीपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. पोलीस अधीक्षक अनुराग जैन आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक राहुल चौहान यांनीही भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वर्धा जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलीस सध्या शेजारी आणि नातेवाइकांचे जबाब नोंदवत तपास करत आहेत.
बुलढाण्यात भावाचा भावावरच हल्ला
बुलढाणा जिल्ह्यातील हतेडी बुद्रुक गावातही एका धक्कादायक घटनेने गावकऱ्यांना हादरून सोडले. येथे एका भावाने आपल्या दोन मित्रांच्या साथीने सख्ख्या
भावावर आणि वहिनीवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात अरुण निकाळजे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना अरुण आणि त्यांच्या पत्नी शेतात जाण्यासाठी घराबाहेर रस्त्यावर उभे असताना घडली. अचानक अरुणचा सख्खा भाऊ आणि त्याच्या दोन मित्रांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे, ज्यामुळे पोलिसांना तपासात मदत होणार आहे.
कठोर कारवाईचे संकेत
या दोन्ही घटनांनी शेतीच्या वादातून उद्भवणाऱ्या हिंसक परिणामांचा धडा दिला आहे. वर्धा आणि बुलढाणा पोलिसांनी तपास तीव्र केला असून, संबंधित प्रकरणांमध्ये कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. शेतीच्या वाटप आणि मालकीहक्कावरून होणारे वाद टाळण्यासाठी सामाजिक जागरूकता आणि कायदेशीर मार्गांचा अवलंब करणे गरजेचे असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.





